एका आईसाठी तिचं मूल तिचं सर्वस्व असतं. मग ती आई भारतीय असो, अमेरिकन असो जॅपनीज असो किंवा कुणीही. बाओ ही कथा एका अशाच आगळ्या वेगळ्या आई आणि आगळ्या वेगळ्या पिल्लाची आहे. बाओ हा लघुपट अॅनिमेटेड आहे. आणि यामध्ये खूपच गोड पद्धतीने आई आणि मुलाचं नातं दाखवण्यात आलं आहे.
एकेदिवशी एक बाई आपलं रोजचं काम करत असते. ती "बाओ" (मोमो प्रमाणे एक चायनीझ पदार्थ) बनवून जेवणाच्या टेबलवर आणते, तिचा नवरा नेहमीप्रमाणे तिच्याकडे लक्ष न देता जेवतो आणि निघून जातो. ती तिच्या वाटचा "बाओ" उचलते इतक्यात तिला त्यामध्ये चिमुकले हात-पाय दिसायला लागतात, डोळे दिसतात आणि तिला अचानक लक्षात येतं, हे तर एक छोटंसं बाळ आहे. (कता नक्कीच इमॅजिनरी आहे, मात्र त्यातील संदेश सुंदर आणि सादरीकरण उत्तम आहे.)
तर इथून सुरु होतो प्रवास बाओ आणि त्याच्या आईचा. ती त्याला अगदी आपल्या बाळा सारखं जपते, त्याची काळजी घेते, त्याला सगळं हवं नको ते बघते. हळू हळू बाओ मोठा होत असतो. त्याचं त्याचं आयुष्य सुरु होतं. आणि कुठेतरी हा आईवेडा बाओ आईहून दूर जातो. आणि अचानक एकेदिवशी तो लग्न करतो आणि आपल्या बायको सोबत निघून जातो, आपल्या रडणाऱ्या आईला एकटं सोडून. (इथे लक्षात असू देत कि बाओ म्हणजे कुणी माणूस नाही तर एक खाद्य पदार्थ आहे.. विचित्र वाटतं ना? मात्र बघताना आनंद होतो.)
मात्र या कथेचा शेवट खूपच सुंदर आहे. पुढे काय होतं ते मी नाही सांगणार ते जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वत:च बघा.. "बाओ".
अॅनिमेशन मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या पिक्सार कंपनीचा हा लघुपट आहे. तसेच याचं दिग्दर्शन केलं आहे डोमी शी यांनी केले आहे. सोशल मीडियावर बाओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि अनेकांनी "बाओ" बघत असतानाचे आपले अनुभव देखील शेअर केले आहेत. बाओ एक सुंदर अनुभव आहे. नात्यांची किंमत सागणारा, एकाकी एकटेपणा असलेल्या आयुष्याची जाणीव करुन देणारा, आणि निरागतसता, गोडवा दाखवणारा. एकदा तरी नक्कीच बघावा असा हा लघुपट.
- निहारिका पोळ