अनाथांची ‘सावली’

    05-Aug-2018   
Total Views |


 

सावलीत येणाऱ्या मुलांना फक्त आधार देण्याचे नव्हे, तर त्यांना जगण्याची नवी उमेद देणे, स्पर्धेच्या युगात धावायला तयार करणे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. या प्रकल्पात मुलांसाठी संगणक कक्ष, वाचनालय, अभ्यासिका, आरोग्य तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध आहे.
 

समाजात अनेक निराधार, गरजू लोक आपण नेहमी पाहात असतो. त्यांना ना राहायला घर असते ना खाण्याची सोय असते. मिळेल ते खाणे, फूटपाथ, बस स्थानके, रेल्वे स्थानके अशा मिळेल त्या ठिकाणी ही मंडळी आला दिवस ढकलत असतात. अशा निराधार आणि वंचित लोकांना पाहिले की, मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि आपण यांच्यासाठी काहीच करू शकत नाही याची चीड निर्माण होत असते. मात्र, आजही समाजात असे काही अवलिया आहेत, जे या वंचितांचे, अनाथांचे, निराधारांचे संगोपन करतात, त्यांचे पालकत्व स्वीकारतात. आजचा आपला ‘माणूस’देखील असाच आहे, जो गेल्या अठरा वर्षांपासून अनाथांचा नाथ आणि सावली म्हणून जगतो आहे. आपले सर्वस्व त्यांच्यासाठी वाहिले आहे, अशा या अवलियाचे नाव आहे नितेश बनसोडे.

 

नितेश बनसोडे हा तरुण अहमदनगरमध्ये अनाथ, निराधार मुलांसाठी ‘संकल्प प्रतिष्ठान’ अंतर्गत ‘सावली’ नावाचा प्रकल्प चालवतो. याची मुहूर्तमेढ अठरा वर्षांपूर्वी म्हणजे २००१ साली अहमदनगरमधील निमगाव वाघा येथे फक्त तीन मुलांना घेऊन रोवण्यात आली होती. ‘‘आपण सतत म्हणत असतो, बदल झाला पाहिजे! मात्र, जोपर्यंत बदलाची सुरुवात आपण स्वत:पासून करत नाही तोपर्यंत बदल होणे शक्य नाही.’’ असे नेहमी नितेश यांचे मत असते. ते म्हणतात, ‘‘प्रत्येकाला बदल हवा असतो. मात्र, बदल करून घ्यायला कोणी तयार नसते.’’ या वाक्यानुसारच नितेश यांना समाज परिवर्तन व्हावे, बदल घडावेत असे नेहमी वाटायचे; मात्र, त्यांनी याची सुरुवात स्वत:पासून केली आणि आज वंचितांच्या, निराधारांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी नितेश यांनी या बदलाला सुरुवात केली. अनाथ बालके दिसली की, त्यांना तुटल्यासारखे व्हायचे, त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण व्हायची. त्यांनाही मायेची ऊब मिळाली पाहिजे असे नेहमी वाटत राहायचे. या अनाथांची आपण सावली बनले पाहिजे. त्यांच्या उजाड आयुष्यात प्रकाश फुलवला पाहिजे. याच जाणिवेतून त्यांनी पुढे नगरमध्ये शिक्षण घेत असताना घरच्यांकडून मिळालेल्या ‘पॉकेटमनी’वर तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. नितेश हे अनाथ मुलांचा सांभाळ करतात हे हळूहळू आजूबाजूच्या परिसरात पोहोचले आणि त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली.

 

‘सावली’त येणारी मुले ही अनाथ असल्याने ती अनेक आजारांनी बाधित झालेली असायची. कोणाला त्वचारोग, कोणाला एड्स, तर कोणी कुपोषित. अशा नानाविध प्रकारची मुले नितेश यांच्याकडे येऊ लागली. येणाऱ्या प्रत्येक मुलाला जीव लावणे, त्यांना आंघोळ घालणे, स्वच्छ करणे, जखमा पुसणे, जेवू घालणे, औषधे देणे अशी सर्व कामे स्वत: नितेश करायचे आणि आज अठरा वर्षानंतरही ते स्वत: व त्यांचे कुटुंबीय करतात. निमगाव वाघा येथून ३ मुलांपासून सुरू केलेला ‘सावली प्रकल्प’ आज भूषणनगरमध्ये स्वतःच्या जागेत व दोन मजली इमारतीमध्ये चालू आहे. आजपर्यंत दोनशे अनाथ मुलांच्या आयुष्यात सावली व प्रकाश नितेश यांनी फुलवला आहे. सावलीत येणाऱ्या मुलांना फक्त आधार देण्याचे नव्हे, तर त्यांना जगण्याची नवी उमेद देणे, स्पर्धेच्या युगात धावायला तयार करणे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. या प्रकल्पात मुलांसाठी, संगणक कक्ष, वाचनालय, अभ्यासिका, आरोग्य तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध आहे. आजच्या घडीला ‘सावली’त ६ ते १८ वर्षे वयोगटातील ५० मुले-मुली असून शिक्षणासोबतच त्यांना गायन, कराटे, शिवणकाम, ग्रिटींग, चित्रकला, हातमाग, चरखा, शेती, कागदी व कापडी पिशव्या बनवणे, स्वयंपाक शिकवणे अशी विविध व्यावसायिक प्रशिक्षणे दिली जातात. येणाऱ्या प्रत्येकाला मायेची ऊब देण्याबरोबरच त्यांना चांगले शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभा करण्याचा नितेश यांचा मानस आहे.

 

आर्थिक चणचण, अडचणी, अपमान या सर्वांवर मात करत नितेश यांचा बदलाचा हा प्रवास अविरत सुरू आहे. शिक्षणापासून, आईवडिलांच्या मायेपासून दूर राहिलेल्या या मुलांना घडवायचा हा प्रवास सुरूच राहणार आहे. मात्र, यात त्यांना त्यांच्या घरच्यांची, समाजातील दानशूरांची आणि मित्रांची मदत महत्त्वाची वाटते. ‘‘त्यांच्या सर्वांच्या पाठिंब्यावर मी हे सगळे करू शकलो,’’ असे नितेश म्हणतात. नितेश बनसोडे आणि ‘सावली परिवारा’च्या प्रामाणिक प्रयत्नांना ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...!

विजय डोळे

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब सब एडिटर म्हणून कार्यरत, ३ वर्षांपासून मेन स्ट्रीम मीडिया व डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव असून पुणे विद्यापीठामधून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. अनेक लघुपटांसाठी, विविध वेबसाईटसाठी लेखन, डिजिटल मीडिया तसेच शॉर्ट फिल्म प्रॉडक्शन आदी कामाचा अनुभव...

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121