स्मृती कारगिल युद्धाच्या

    04-Aug-2018   
Total Views | 66


 

जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. याआधी इतक्या उंचीवर कोणतेही युद्ध झालेले नाही. या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजारांहून अधिक सैनिक मारले गेले, तर भारताचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. १३०० हून अधिक भारतीय सैनिक/अधिकारी यात गंभीर जखमी झाले होते. या युद्धात सुरुवातीला लेफ्टनंट सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्याने कुठंपर्यंत घुसखोरी केली आहे, हे शोधून काढण्याची कामगिरी सोपविण्यात आली.

 

२६ जुलै २०१८ ला कारगिल युद्धाला १९ वर्षे पूर्ण झाली. मात्र, अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जीवंत आहे. आजपर्यंतच्या युद्धांपैकी केवळ कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फूट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमिनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० सेल्सिअस इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्या सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत होते. पण, कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले.

 

२६ जुलै ‘कारगिल विजय दिवस’

 

भारतीय सैन्याला ही गोष्ट समजल्यानंतर भारतीय हद्दीतून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ ही मोहीम राबविली. सुरुवातीला हे आमचे सैनिक नसून दहशतवादी असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. पाकिस्तानी सैन्याच्या नॉर्दन लाईट इन्फंट्रीच्या अकराहून अधिक बटालियन्सनी (एका बटालियनमध्ये ७५० ते १००० सैनिक असतात) कारगिलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने १० ते १५ हजार सैनिकांच्या दोन तुकड्या युद्धभूमीवर उतरवल्या होत्या. २६ जुलै १९९९ रोजी शेवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्याने हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

 

५४३ अधिकारी आणि जवान युद्धात शहीद

 

जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. याआधी इतक्या उंचीवर कोणतेही युद्ध लढले गेले नाही. या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजारांहून अधिक सैनिक मारले गेले, तर भारताचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. १३०० हून अधिक भारतीय सैनिक/अधिकारी यात गंभीर जखमी झाले होते. या युद्धात सुरुवातीला लेफ्टनंट सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्याने कुठंपर्यंत घुसखोरी केली आहे, हे शोधून काढण्याची कामगिरी सोपविण्यात आली. कारगिल युद्धातला दुसरे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा हे होते. सिंहाइतका शूर असल्याने बत्रा यांना त्यांचे सैनिक ‘शेरशहा’ म्हणत असत. कारगिल युद्धाच्या केवळ दीड वर्षे आधी भारतीय सैन्यात सामील झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली. कारगिलचे पहिले शिखर जिंकल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना ‘पुढे काय?’ असे विचारले असता, जेवढा प्रदेश जिंकला तेवढा पुरेसा नाही. ‘ये दिल माँगे मोअर’ अशी प्रतिक्रिया कॅप्टन बत्रा यांनी दिली. त्यांच्यामुळेच ‘ये दिल माँगे मोअर’ हे वाक्य प्रसिद्ध झाले. त्यानंतर पॉईंट ५१४०च्या वरती असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर चालून जाण्याची कामगिरी कॅप्टन बत्रा यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी पॉईंट ५१४०ने जिंकला. मात्र, त्यात ते शहीद झाले. “युद्धाआधी, मी भारताच्या ध्वजामध्ये लपेटूनच परत येईल,” असे कॅप्टन बत्रा म्हणाले होते. या युद्धातले सगळ्यात पहिले परमवीर चक्र कॅप्टन बत्रा यांना प्रदान करण्यात आले.

 

युद्धभूमीला भेट द्या!

 

त्यानंतर लेफ्टनंट विजयंत थापर यांना ‘थ्री पिंपल्स’ या शिखरावर पाठविण्यात आले. यात त्यांच्या दोन राजपूतांना रायफल्सच्या कंपनीचे कमांडर मेजर आचार्य शहीद झाले. २२ वर्षांचे विजयंत काही महिन्यांपूर्वीच सैन्यात अधिकारी झाले होते. विजयंन यांनी ‘थ्री पिंपल्स’ या सतरा हजार फूट उंचीवर असलेल्या शिखरावर भारताचा झेंडा फडकवला. पाकिस्तानचे १५० सैनिक असलेल्या या शिखरावर चढण्यासाठी थापर यांनी तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच सर्वांत अवघड कड्याची निवड केली होती. विजयंत यांच्या शौर्याबद्दल त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले. मात्र, त्यात त्यांना वीरगती प्राप्त झाली. विजयंत यांनी मोहिमेवर जाण्याआधी आपल्या कुटुंबीयांसाठी एक पत्र लिहिले होते. ‘‘मी परत आलो नाही, तरच हे पत्र माझ्या कुटुंबीयांना पाठवावे,’’ असे त्यांनी सांगितले होते. या पत्रात त्यांनी आपले वडील निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर यांना ‘‘युद्ध संपल्यानंतर आम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये लढलो हे पाहण्यासाठी या युद्धभूमीला भेट द्या,’’ असे म्हटले होते. ७८ वर्षे वयाचे निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर हे दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल येथील अठरा हजार फुटांवरच्या वीरभूमीवर जाऊन सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ते पत्र अजरामर झाले आहे.

 

परमवीर कॅप्टन मनोज पांडे, ग्रेनेडीयर योगेंद्रसिंग यादव, शिपाई संजय कुमार यांची वीरगाथा कॅप्टन मनोज पांडे यांनी खालुबर नावाच्या शिखरावर हल्ला करून ते शिखर पाकिस्तानकडून परत मिळवले. त्यात कॅप्टन मनोज पांडे यांना वीरगती प्राप्त झाले. त्यावेळी आपल्या तुकडीतील सैन्याला उद्देशून शेवटचे दोन शब्द काढले होते. ते शब्द ‘ना छोडनू..’ असे होते. नेपाळी भाषेतील या शब्दांचा अर्थ ‘दुश्मनांना सोडू नका,’ असा होता. २४ वर्षांच्या मनोज पांडे यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. या युद्धात ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव यांनी आपल्या प्लाटूनबरोबर टायगर हिलवर हल्ला केला होता. त्यांनी टायगर हिलवरती भारताचा तिरंगा फडकवला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. तेरा जॅक रिफच्या शिपाई संजय कुमार यांना पॉईंट ४८७७वर जाण्याचा आदेश मिळाला. संजयकुमार यांनी पाकिस्तानी सैन्यावरती जोरदार हल्ला करून तीन जवानांना यमसदनी धाडले. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. या युद्धात अनेक अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले होते. मेजर डी. पी. सिंग यांना गंभीर जखमी झाल्यानंतर आपला एक पाय गमवावा लागला होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. ते आजही कृत्रिम पाय लावून धावण्याच्या शर्यतीत भाग घेत ते भारताचे अग्रणी ब्लेड रनर म्हणून ओळखले जातात. गंभीर जखमी झाल्यानंतर अवयव गमावलेले अनेक जवान आहेत. आपल्या अपंगत्वावर मात करत ते जीवन जगत आहेत.

 

तरुण अधिकारी आणि शूर जवानांचे युद्ध

 

कारगिल युद्ध हे तरुण अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या शूर जवानांचे युद्ध होते. हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात शहीद झालेले जवान आणि अधिकारी २० ते २६ या वयोगटातील होते. आपले ३६ अधिकारी, ५७६ सैनिक आणि हवाई दलाचे पाच जवान शहीद झाले. शहीद झालेल्या अधिकाऱ्यांची रँक लेफ्टनंट, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल अशी होती. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारताच्या अनेक बुद्धिमान अधिकारी, सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि ५२ सेना मेडलस प्रदान करण्यात आले होते. या युद्धात १८ ग्रेनेडियर्स, दोन राजपूतांना रायफल्स, १३ जम्मू आणि काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स आणि आठ शीख रेजिमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला. मोठा पराक्रम गाजवल्याने या तुकड्यांचा युनिट सायटेशनने गौरविण्यात आले.

 

गरज शूर सैनिक आणि देशप्रेमी नागरिकांचीही

 

या युद्धात आपले रक्त सांडून आपल्या तरुण अधिकारी आणि सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. लढाईत शस्त्र आणि सैनिक हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मात्र, कोणतेही शस्त्र चालविण्याकरिता असणारा सैनिक सर्वांत जास्त महत्त्वाचा असतो आणि सैनिक सदैव सतर्क असतील, तर देश सुरक्षित राहतो. म्हणूनच भारतीय नागरिकांनी आणि सरकाने आपल्या सैनिकांची काळजी घेतली पाहिजे. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे. २६ जुलै ‘कारगिल विजय दिवसा’च्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणाऱ्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली!

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

 

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121