बिमस्टेक देशांना पंतप्रधान मोदींचे आश्वासन
काठमांडू: आपण सर्व विकसनशील आणि कृषीप्रधान देश आहोत. आपल्याला एकमेकांसोबतच पुढे जायचे आहे. ‘नेबरहूड फर्स्ट’ आणि ‘अॅक्ट इस्ट’ हे भारताचे धोरण असून बिमस्टेक देशांसोबत खांद्याला खांदा लावून वाटचाल करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिमस्टेक राष्ट्रांना आश्वासित केले. नेपाळची राजधानी काठमांडू येथे बिमस्टेक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
बिमस्टेक (द बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकोनॉमिक को-ऑपरेशन) या भारत, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ आदी देशांच्या संघटनेच्या परिषदेचे उद्घाटन गुरूवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व बिमस्टेक देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी या परिषदेला हजेरी लावली. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिमस्टेक देशांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सामरिक सहकार्याबाबत सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, व्यापारी, आर्थिक, वाहतूक, डिजिटल ‘कनेक्टीव्हिटी’ या सर्व क्षेत्रांत बिमस्टेक देशांना वेगाने काम करावे लागेल. या देशांतील उद्योजकांसाठी ‘बिमस्टेक स्टार्टअप कॉन्क्लेव्ह’ भारतामध्ये आयोजित करण्याची कल्पना पंतप्रधानांनी यावेळी मांडली. बंगालच्या उपसागराबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आपण सर्व बिमस्टेक देश सभ्यता, इतिहास, कला, भाषा आणि संस्कृतीच्या अतूट बंधनाने जोडलेलो आहोत. या भौगोलिक क्षेत्रात एकीकडे ऐतिहासिक हिमालय पर्वतरांग आणि दुसरीकडे बंगालचा उपसागर आहे. उपसागराचे हे क्षेत्र आपल्या सर्वांच्याच विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. भारताच्या 'नेबरहूड फर्स्ट’ आणि ‘अॅक्ट इस्ट’ या दोन्ही धोरणांचा संगम बंगालच्या उपसागरात होत असल्याची भावना मोदी यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, वातावरणातील बदलांतून निर्माण झालेल्या समस्यांशी आज आपण सर्वच झुंजत आहोत. यासंदर्भात कृषी अनुसंधान, शिक्षण आणि विकासातील सहकार्यासाठी भारत एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करेल. तसेच, डिजिटल क्षेत्रात भारत आपले राष्ट्रीय जाळे श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, भूतान आदी देशांमध्ये वाढवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. ऑगस्ट, २०२० मध्ये भारतात ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्याची महत्वपूर्ण घोषणादेखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. तसेच, बिमस्टेक देशांनी याच्या आयोजनामध्ये सन्मानपूर्वक भागीदार व्हावे, असे निमंत्रणही त्यांनी दिले. तसेच, बिमस्टेक देशांतील युवा विद्यार्थ्यांसाठी नालंदा विश्वविद्यालयात ३० शिष्यवृत्ती आणि संशोधन पाठ्यवृत्तीदेखील पंतप्रधानांनी जाहीर केल्या. तसेच, बंगालच्या खाडीलगतच्या क्षेत्राच्या संस्कृती, सागरी कायदे आणि अन्य विषयांच्या अभ्यासासाठी नालंदा विद्यालयात ‘सेंटर फॉर बे ऑफ बंगाल स्टडीज’ असे केंद्र स्थापन करण्यात येणार असून बिमस्टेक देशांच्या इतिहास, पर्यटन, भाषा, संस्कृतीबाबत येथे अभ्यास करता येईल, असे पंतप्रधानांनी घोषित केले.
पंतप्रधानांच्या महत्वपूर्ण घोषणा
- ऑगस्ट, २०२० मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्हचे आयोजन
- बिमस्टेक युथ समिट, बिमस्टेक बँड फेस्टिव्हल, बिमस्टेक वॉटर स्पोर्ट्सच्या
आयोजनाचा प्रस्ताव
- नालंदा विश्वविद्यालयात बिमस्टेक देशांतील युवा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- उद्योजकांसाठी बिमस्टेक स्टार्टअप कॉन्क्लेव्हचा प्रस्ताव
- नालंदा विद्यालयात ‘सेंटर फॉर बे ऑफ बंगाल स्टडीज’ असे केंद्र स्थापन करणार
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/