मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर ठाणे खाडीवरील दोन पूल सध्या वाहतुकीस अपुरे पडत असल्याने या खाडीवर आता तिसरा पूल बांधण्यात येणार असून त्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याखेरीज, वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेचे बांधकाम या प्रकल्पांनाही शासनाने मान्यता दिली तसेच, खाडीपुलाचे बांधकाम येत्या एक महिन्यात सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करून वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तसेच, या बैठकीत मान्यता देण्यात आलेला वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम द्रुतगती मार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे बस स्थानकावरून जोडणारा नवीन रस्ता पश्चिम द्रुतगती मार्गावरून (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना-नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिका
खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे बांधकाम करण्यात येणार आहे. खालापूर टोलनाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणाऱ्या दोन टप्प्यातील बोगद्यांचे व त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलाचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी ११ कि.मी. असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी दोन कि.मी. आहे. देशातील सर्वात मोठा असा ६५० मीटरचा केबल स्टेड पूल पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.
मुंबईची वाहतूक घेणार मोकळा श्वास..
* ठाणे खाडीवर वाशी येथे तिसरा पूल बांधणार बांधकामास
* वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण करणार
* वांद्रे ते वर्सोवा असा सागरी सेतू (सी-लिंक) बांधणार
* वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब सी-लिंक
* पश्चिम द्रुतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना-नानीपार्क येथे
सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करणार
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/