कालांतराने ‘इसिस’च्या धडाक्याने दोघांनाही खाडकन जाग आली. आता काहीही झालं तरी एकत्र येण्याशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव झाली. दोघांनाही एकमेकांची गरज होती. त्यामुळे दोघे पुन्हा एकत्र आले व कोबानच्या युद्धात ‘वायपीजी’ला ‘एफएसए’ने अत्यंत गरज असताना संकटकाळी साहाय्य केले. परिणामी, ‘इसिस’चा पराभव करून कोबानवर महत्त्वपूर्ण विजय मिळवला.
रोजावा कुर्दांच्या पीवायडी व एफएसएमध्ये 29 जून ते जुलै 2012 मध्ये अफ्रिन भागात चकमकी उडाल्या. तसेच अलेप्पोमधील अश्रफिया जिल्ह्यातही 26 ऑक्टोबर 2012 ला ‘वायपीजी’ व ‘एफएसए’मध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू झाली. पीवायडीने अफ्रिनमध्ये मोर्चा काढला व त्यात ’फ्री सेनेला नकार, सीरियन सेनेला नकार, कुर्दिश प्रतिकार दीर्घायुषी होवो,’ अशा घोषणा देण्यात आल्या. खरंतर दोन्ही गट असाद शासनाच्या विरोधी होते व सीरियामध्ये दोघांनाही धर्मनिरपेक्ष लोकशाही अपेक्षित होती. रोजावाला आपल्या प्रदेशात त्यांचा लोकशाही संघवादाचा स्वयंशासनाचा प्रयोग राबवायचा होता की, जो तसं म्हटलं तर सीरियाच्या अखंडतेला आव्हान नव्हता व त्यात सर्व वंश-धर्मांना सामावून घेतले गेले होते. लोकशाही शासनप्रणालीचा वेगळा प्रयोग इतकाच काय तो फरक होता. ‘वायपीजी’ व ‘एफएसए’मध्ये होणाऱ्या या संघर्षाचा ‘वायपीजी’ने स्पष्टपणे धिक्कार केला. कारण हा संघर्ष सीरियन राज्यक्रांतीला हानिकारक असून त्यामुळे अंतर्गत बंडाळी माजून ती पुन्हा सीरियाला अराजकाकडे घेऊन जाईल. त्यात सीरियाच्या शासनाविरुद्ध आधीच ‘वायपीजी’ व ‘एफएसए’चे स्वतंत्र प्रयत्न अपुरे पडत होते. त्यात ‘एफएसए’मध्ये फाटाफूट होऊन ‘इसिस’मध्ये सामील होत होते, तर ‘वायपीजी’ला एकाचवेळी असाद राजवट, तुर्कस्तान, ‘इसिस’ आणि आता ‘एफएसए’ अशा चार आघाड्यांवर लढायला लागत होते. यापैकी ‘वायपीजी’ व ‘एफएसए’चे उद्दिष्ट जवळजवळ सारखे असल्याने एकमेकांविरुद्ध होणारा हा संघर्ष उद्वेगजनक, हानिकारक व निरर्थक होता. तसं म्हटलं तर ‘एफएसए’लाही कुर्द प्रदेशातील भागात कोणासोबत संघर्ष नको होता, पण काही जणांना अश्रफियामध्ये अरब व कुर्दांमध्ये संघर्ष होऊन त्यात त्यांचा एकमेकांचा किंवा एकाचा तरी निकाला लागावा, असा मनसुबा होता. थोडक्यात सुंठीवाचून खोकला गेला तर हवाच होता.
सुदैवाने लवकरच काहींना हा आपापसातील संघर्ष थांबवून एकत्र येऊन असाद व ‘इसिस’विरोधी लढा द्यावा, असे वाटू लागले. Kurdish Youth Movement (TCK)चा सदस्य बदर मुस्तफाने रुदाँ (Rudaw) वार्ताहराला असे सांगितले की, दोन्ही बाजूंनी परस्पर संमतीने त्यांचे आपापसातील मतभेदांचे निराकरण करावे. कारण, दोघांनाही युद्धाची नवीन आघाडी उघडण्याची आवश्यकता नाही, कारण अजूनही हुकूमशाही राजवट आहे, जी दोघांचीही शत्रू आहे. त्याप्रमाणे 5 नोव्हेंबर 2012 ला ‘वायपीजी’ व ‘एफएसए’मध्ये युद्धबंदी करून 10 कलमी तह करण्यात आला. ज्याअन्वये एकमेकांचे बंदीवान सोडून देण्याचे मान्य करून असाद राजवटीविरोधात एकत्र सहकार्य करण्याचेही ठरविण्यात आले. ‘एफएसए’च्या हालचालींना अडथळा निर्माण करणारे तपासणी नाके काढून टाकणे किंवा ‘वायपीजी’ व ‘एफएसए’चे एकत्र तपासणी नाके स्थापन करणे, जप्त केलेली शस्त्रं व वाहने त्यांच्या-त्यांच्या मालकाला परत करणे, माध्यमांमध्ये एकमेकांविरुद्ध मोहीम सुरू करण्यास बंदी, सरकारी सेनेतून फुटून बाहेर पडणार्यांना व अरब-कुर्दिश कार्यकर्त्यांना साहाय्य करणे, संयुक्त सैन्य आयोग स्थापन करून सर्व प्रकारचा तणाव नष्ट करणे. (Syrian Rebels and Kurdish Group Sign Truce, Rudaw, 5 November 2012) काहीवेळा दोन्ही बाजूने कराराचे उल्लंघन झाले व त्यातून पुन्हा संघर्षही उद्भवला. पण, कालांतराने ‘इसिस’च्या धडाक्याने दोघांनाही खाडकन जाग आली. आता काहीही झालं तरी एकत्र येण्याशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव झाली. दोघांनाही एकमेकांची गरज होती. त्यामुळे दोघे पुन्हा एकत्र आले व कोबानच्या युद्धात ‘वायपीजी’ला ‘एफएसए’ने अत्यंत गरज असताना संकटकाळी साहाय्य केले. परिणामी, ‘इसिस’चा पराभव करून कोबानवर महत्त्वपूर्ण विजय मिळवला.
कुर्दांना साहाय्य व पाठिंबा देण्यावरून ‘एफएसए’मध्ये दोन गट तयार झाले होते, त्यातील एक गट कुर्द म्हणजे रोजावा व ‘वायपीजी’च्या बाजूने होते तर काही गट चक्क ‘वायपीजी’च्या विरोधात जाऊन संघर्ष करत होते, कारण मागे सांगितल्याप्रमाणे त्यांचा असा आक्षेप होता की, असादविरोधात सामान्य सीरियन जनतेमध्ये असंतोष उफाळून आलेला असताना व त्यासाठी लोकं रस्त्यावर उतरलेली असताना सीरियन कुर्द मात्र या क्रांतीत तितक्या उत्साहाने सामील झाले नव्हते. त्यांच्या या संशयाला कारणीभूत एक घटना म्हणता येईल, ती म्हणजे सीरियामध्ये याआधी कुर्दांना नागरिकत्वाचे अधिकार दिलेले नव्हते. पण, अरब क्रांतीचे लोण सीरियामध्ये पोहोचल्यावर धूर्त असादने एक चाल खेळली आणि कुर्दांना लगेच नागरिकत्वाचे अधिकार देऊन टाकून आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. रोजावाच्या सनदेमध्येही असाद राजवटीला प्रखर विरोध असा प्रत्यक्ष उल्लेख कुठेही नव्हता. उलट नंतर अल-हसकाहसह रोजावा स्वायत्त प्रदेशातील तेलविहिरींशी संबंधित ठिकाणी तर त्यांनी थेट सीरिया शासनाशी तेलविहिरी उत्पन्न, तेलशुद्धीकरण, वाहतूक व वाटणीचा करार केला होता.
त्यात अजून एक असा कंगोरा होता की, ‘एफएसए’ला आधी रस्तानच्या युद्धात असादविरुद्ध माघार घ्यावी लागली होती. या माघार घेतलेल्या ‘एफएसए’ सैनिकांना मागे उल्लेख केल्याप्रमाणे तुर्कस्तानने आश्रय दिला होता. पण, तुर्कस्तान तर रोजावा क्रांतीचा कट्टर विरोधक. त्यामुळे तुर्कस्तानचा पाठिंबा असणारा एक गट म्हणजे 'Turkish-backed Free Syrian Army Sultan Murad Division' ‘वायपीजी’च्या विरोधात उतरली. यामुळे प्रत्यक्षात ठरल्याप्रमाणे खरंतर ‘एफएसए’चे 200 लढाऊ सैनिक कोबानमध्ये ‘वायपीजी’ला साहाय्य करण्यासाठी प्रवेश करणार होते, पण या अंतर्गत मतभेदांमुळे प्रत्यक्षात ‘एफएसए’चे केवळ 50 लढाऊ सैनिक कोबानमध्ये पोहोचले होते. पण असे असले तरी जे साहाय्य मिळाले, तेही कुर्दांसाठी अनमोल होते. कुर्दांनी याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन ‘इसिस’चा पराभव केला. जानेवारी 2018 ला तुर्कस्तानने अफ्रिनवर केलेल्या सैनिकी कारवाईत तुर्कस्तानचा पाठिंबा असलेला ‘एफएसए’ गट सहभागी झाला होता. 'Syrian Observatory of Human Rights' च्या रमी अब्दुल रेहमानच्या अनुसार तुर्कस्तानने ‘एफएसए’मधील काही लोक, ‘इसिस’च्या आणि अल-कायद्याच्या माजी मूलतत्त्ववाद्यांसोबत सैनिकी युती केली आहे. यातील ‘एफएसए’ लढाऊ सैनिक अफ्रिनमधील कुर्दांना त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास व इस्लाम न स्वीकारल्यास शिरच्छेद करून धमकावत आहेत.
‘वायपीजी’शी सहयोगी ‘एफएसए’ संबंधित गट
Army of Revolutionaries
Jabhat al-krad
Northern Sun Battalion
Northern Democratic Brigade
Jabhat Thuwar al-Raqqa
Liberation Brigade
Syrian Elite Forces
वायपीजी विरोधातील एफएसए संबंधित गट
Turkish-backed Free Syrian Army Sultan Murad Division
Free Idlib Army Mountain Hawks Brigade
Northern Division
13th Division
23rd Division
Levant Front
Hamza Division
Elite Army
Army of Victory
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/