कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील धोकादायक पत्रीपूल पाडण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शंभर वर्षांपूर्वीचा पत्रीपूल धोकादायक झाल्याने रेल्वेने या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याच्या सूचना महापालिकेसह एमएसआरडीसीला दिल्या होत्या. त्यानुसार पालिका आयुक्तांकडे झालेल्या संयुक्त बैठकीत दि. २५ ऑगस्टपासून पत्रीपूल पाडण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, रविवारी पादचार्यांसाठी दि. २५ सप्टेंबरपर्यंत पूल खुला करण्याचे रेल्वेच्यावतीने जाहीर करण्यात आले. पूल पाडण्याच्या अनुषंगाने पुलावरील वाहतूकही बुधवारपासून बंद करण्यात आली होती. पूल वाहतुकीसाठीही बंद केल्यानंतर त्यावरील पथदिवे, दूरध्वनी, वीजवाहिन्या आदी काढण्यास सुरुवातही झाली होती. शनिवारी पूल पाडण्यासाठी रेल्वेचे अधिकारी पत्रीपुलावर दाखल झाले. मात्र, गणपती उत्सव आणि मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत हा पूल सुरू ठेवावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वेकडे केली होती. त्यामुळे आता कल्याणमधील धोकादायक पत्रीपुलाच्या पाडण्याच्या कामाला २५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
जुना पत्रीपूल पाडण्याचे काम शनिवारपासून सुरू होईल, असे रेल्वेने जाहीर केल्यानंतर सर्व स्तरांतून या पुलाच्या पाडण्याच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी जोर धरत होती. एकीकडे मुंब्रा बायपासचे काम सुरू असल्यामुळे नवी मुंबई आणि पुण्याकडून भिवंडी, नाशिककडे जाणार्या वाहतुकीचा भार कल्याण शहरावर पडला आहे. त्यातच पत्रीपूल बंद केल्यापासून कल्याण शहरात अभूतपूर्व वाहतूककोंडी होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आता आयआयटी मुंबईच्या ज्या तज्ज्ञांनी पत्रीपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते, त्यांच्याकडून पुन्हा एकदा पुलाची तपासणी केली जाणार आहे आणि तात्पुरती डागडुजी करणे शक्य असल्यास मुंब्रा बायपासचे काम आणि गणपती उत्सव संपेपर्यंत हा पूल हलक्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/