माझं माहेर मोलाच
बाई माहेर मोलाच
राजा भिमाच्या तोलाच
ग बाई भिमाच्या तोलाचं
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
श्रावणमास आला की, सासुरवाशिणीला माहेरची ओढ लागते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि श्रावणी सोमवार ते शनिवार आणि अगणित सण, व्रत-वैकल्यांच्या दिवशी माहेरी काय चालले असेल, याची हुरहूर लगते. ‘गेले ते माहेरचे दिन’ अशी खंत आणि माहेरसोबतच सासरी अडकलेले अर्धे काळीज अशी अवस्था सासुरवाशिणीची होते. अर्थात, कालौघात हे चित्र बदलले असेल. पण सासुरवाशिणीला माहेरची असलेली ओढ यात तिळमात्रही फरक पडलेला नाही. शहराच्या धकाधकीत आज प्रत्येक सासुरवाशिणीला माहेरची कितीही ओढ असली तरी श्रावणातल्या सणासुदीनिमित्त माहेरी जाता येत नाही. त्याला अनेक कारणे आहे. मुख्य कारण आताच्या ‘सुनबाई’ या नुसत्या ‘गृहिणीच’ नसतात, तर त्या घराच्या कर्तबगार पुरुषासोबत कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी अर्थाजन करत असतात. वेळ कुणाला आहे? शहरातील या सासुरवाशिणींना माहेरची आठवण येतेच, पण ती आठवण डोळ्यांच्या कडा पुसत मनातच दाबून ठेवावी लागते. पर्याय नसतो. श्रावणात माहेरी होणारी ‘मंगळागौर’ तर या लेकीसुनांच्या मनात पिंगा घालत असते. पण माहेरी जाणे शक्य नसते. हे आणि हेच चित्र मुंबई शहरातही जाणवते.
या पार्श्वभूमीवर शाळेने एक स्तुत्य उपक्रम आयोजित केला. तो म्हणजे ‘खेळ श्रावणातले.’ या खेळामध्ये सहभागी होतात, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या ‘मातृशक्ती.’ कार्यक्रमाच्या तयारीला शाळेचा शिक्षक-पालक संघ तयारीला लागतो. बैठका होतात. कार्यक्रमाचा ठराव संमत होतो. ‘खेळ श्रावणातले’ कार्यक्रम कधी करायचा? कसा करायचा ? याचे नियोजन होते. ‘खेळ श्रावणातले’ कार्यक्रमाची रूपरेखा आणि इतरही सर्व आयोजन यामध्ये व्यस्त असलेल्या शाळेच्या शिक्षिका सुवर्णा देवकुळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन कसे केले, हे सांगितले.
‘खेळ श्रावणातले’ कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मातांचे इयत्तेनुसार स्वतंत्र पाच गट तयार केले गेले. प्रत्येक गटाला स्वतंत्ररित्या मंगळागौरीची काही गाणी दिली गेली. प्रत्येक गटाला वेगळी वेगळी गाणी दिली होती. त्यातून प्रत्येक गट एक गाणे आणि एक खेळ निवडतो. या प्रत्येक गटातील हातावरच्या बोटावर मोजता येणाऱ्या मातांना सोडून बाकीच्या मातांनी यातली गाणी किंवा खेळ सात पिढ्यांत कधीही ऐकलेली नव्हती. मग हे खेळ खेळायचे कसे? शाळेने यावर एक तोडगा काढला. या गटातील ज्यांना ‘मंगळागौर’ उर्फ ‘खेळ श्रावणातले’ येतात, त्या मातांना गटप्रमुख केले गेले. त्या आपापल्या गटांना किंवा सर्वच गटांना हे ‘श्रावण खेळ’ शिकवले. त्यासाठी इच्छुक महिला पालक दररोज ८ ते १० दिवस शाळेत येत होत्या, या खेळांचा सराव करत होत्या. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी आकर्षक पण पारंपरिक नऊवारी, नथ, ठसठशीत कुंकू-टिकली लेऊन महिला वेळेआधी उपस्थित राहिल्या. कार्यक्रम सुरू झाला की त्यांची आई आणि पत्नीची भूमिका बाजूला सारून त्या फक्त माहेरवाशीणी झाल्या. आज ‘खेळ श्रावणातले’ खेळताना बालवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या मातांनी ‘आगोटा पागोटा, फू बाई फू फुगडी फू, लुकूलुकू’ आदी सादर केले. पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या मातांनी ‘आंबा पिकतो, अग अग सूनबाई, तिखट मीठ मसाला, तर दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या मातांनी किस बाई किस, चला झिम्मा खेळूया गं, बंधू येईल माहेरी न्यायला’ या गाण्यावर सादरीकरण केले. तिसरीच्या पालकमातांनी ‘गौरीमध्ये गवरबाई, लाट्या बाई लाट्या, हतुश पान बाई हतुश’ आणि चौथीच्या पालकमातांनी ‘नाच ग घुमा, खुर्चीक मिरची, पिंगा ग पोरी पिंगा’ यांवर सादरीकरण केले. शाळेच्या इतर दिवसांपेक्षा आज या महिला खूप वेगळ्या वाटत होत्या. ऊर्जा, आत्मविश्वास आणि जीवनातला हरवलेला अवखळपणा त्यांच्या प्रत्येक लयीत जाणवतो. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महिला शिक्षक आणि पालक मातांनी मिळूनच केले होते. ‘खेळ श्रावणातले’ खेळणाऱ्या ही महिलाच आणि पाहणाऱ्या ही महिलाच. एकंदर सर्वत्र सुंदर नटलेली सजलेली आणि उत्साहाने तळपणारी स्त्रीशक्ती प्रकटली होती.
एक प्रकारे ‘मंगळागौरीच’ असते. ‘मंगळागौरी’ला खेळले जाणारे ‘खेळ’च या कार्यक्रमात होतात. पण नाव मात्र ‘खेळ श्रावणातले.’ याबाबत या कार्यक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे यांच्याशी चर्चा केली, तर ते म्हणाले, ” ‘मंगळागौररीची पूजा करणे, महिलांनीं एकत्र येणे आणि विरंगुळ्यासाठी विविध कलांच्याद्वारे व्यक्त होणे ही सांस्कृतीक परंपराच आहे. आमची मराठी माध्यमाची शाळा. महारनगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांनी प्रवेश घ्यावा, शाळेची पटसंख्या वाढावी, यासाठी शाळेतले सर्व शिक्षक, अधिकारी,कर्मचारी आणि संचालकवर्गही अष्टोप्रहर कार्यरत आहे. मुलं शाळेत कधी येतील? जेव्हा पालकांना ही शाळा ‘आपली’ वाटेल. पालकांना ही शाळा ‘आपली’ केव्हा वाटेल? तर जेव्हा त्यांचे मन भावना आणि विचारही या शाळेशी जुळतील. शाळेमध्ये येणारी बहुतांशी मुलं ही अतिसामान्य सामाजिक आणि आर्थिक स्तरातून येतात. त्यांनी शाळेत प्रवेश घेतला की त्याच दिवसापासून ती शाळेचीच मुलं होतात. शाळा त्यांचे पालकत्व स्वीकारते. पण या सगळ्या घडामोडीत पालकांचा त्यातही मुलांच्या आईचा सहभाग असणे, जास्त गरजेचे असते. कारण मुलांना शाळेत सोडणे आणणे आणि इतरही जबाबदाऱ्या ती माऊलीच पार पाडते. सगळ्या पालक महिलांशी शाळेचा वैयक्तिक स्नेह संपर्क असल्याने एक गोष्ट नजरेस आली. या माता कष्टकरी माता आहेत. कुटुंबाची घडी बसावी, म्हणून त्या घरातही राबतात आणि बाहेरचीही छोटी मोठी कामे करतात. कित्येक माता या धुणीभांड्यांची कामे करतात. या सर्वजणींचे माहेर असूनही माहेरी त्यांचे जाणे होत नाही. त्यांना क्षणाचाही आराम नाही की विवचंनेतून सुटका नाही. या मातृशक्तीला श्रावणात काही तास का होई ना, ‘माहेरपण’ मिळवता यावे, यासाठी काही उपक्रम करावा असे मनात आले. शाळेमध्ये विविध धर्म आणि पंथाची मुलं शिकत असल्याने सर्व माताभगिनींनी सहभागी व्हावे, म्हणून ‘खेळ श्रावणातले’ कार्यक्रम करायचा ठरवले.
मुख्याध्यापक विठ्ठल कांबळेच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम शब्दातीत यशस्वी झाला हे मात्र नक्की. याच कार्यक्रमात मला सीमा जाबरे, सारिका सरोदे भेटल्या. नटून थटून दोघीही फुगड्या घालत होत्या. त्या आवर्जून म्हणाल्या, ”आम्हाला हे खेळ माहिती नव्हते. घरी, समाजात हे खेळ खेळताना कधी पाहिलेही नाही, तर सहभागी व्हायची गोष्टच दूर. इथे मुंबईत लग्न झालं. सासर जीवनात उतरलं पण माहेर मनातलं मनातच राहिलं. कितीही वाटलं तरी माहेरी जाता येत नाही. आईचं आणि माहेरचं कौतुक आठवत आठवत दिवस जात होते. नवीन शहर, नवीन समाज इथे कसे होईल?खूप अगतिक वाटायचे. पण शाळेमध्ये मुलांना घेऊन आलो. इथल्या शिक्षकांनी आम्हाला त्यांच्या बरोबरीची वागणूक दिली. आमच्या माहेरासारखे ते सारखा सर्व बाबतीत भक्कम उभे राहतात. मुंबईत राहूनही शाळेच्या रूपाने आम्हाला आमचं माहेर मिळालं. काहीजण म्हणतात हे खेळ तुम्ही का खेळता? पण या ‘श्रावणातल्या खेळा’ने मन फिरून लहान होतं. आईची माया आठवते. त्यामुळे आवर्जून ‘खेळ श्रावणातले’ खेळायला येतो.“ काही महिला म्हणाल्या साडी, खोटे का होई ना, पण त्यावरचे दागिने घालण्याइतक्या आम्ही श्रीमंत नाही हो, पण हौसेला मोल नसते ना? या ‘खेळ श्रावणातले’ कार्यक्रमासाठी आम्ही हे सारं कसं कसं जमवतो. नाही जमले तर मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून तासाभरासाठी घेतो. प0ण तयार होऊनच येतो. कारण वर्षभरात जगलोय का मेलोय हे बघायलाही आम्हाला फुरसत नाही. आज ‘खेळ श्रावणातले’ या कार्यक्रमामुळे एक दिवस आम्ही आमच्या सारख्याच मैत्रिणींसोबत मनासारखे जगतो. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात चमक होती आणि अश्रूही होते. त्यांची किंमत होऊच शकत नाही. या सासुरवाशिणींना माहेरचे क्षण देणाऱ्या ‘खेळ श्रावणातले’कार्यक्रमाने डोळे आणि मन आपसूक भरून आले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
Pakistan occupied Kashmir only issue bilateral talks with Pakistan..