महादेव आणि महादेवाशी
संबंधित हिंदु धर्मातील चिन्हसंकेतांचा घेतलेला आढावा...
भारतीय वैदिक संस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. र. गो. भांडारकर आणि लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते ‘शिव’ या दैवत संकल्पनेचे आणि शैव संप्रदायाचे मूळ आर्येतर सिंधू संस्कृतीत आहे. या दोघांच्या मते, ‘महादेव’ म्हणजेच ‘शिव’ हा त्रिमूर्तीमधील ब्रह्मा आणि विष्णू बरोबरच हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एक प्रमुख देवता असली तरीही वैदिक आर्य संस्कृतीचा प्रभाव मात्र ‘शिवदेवता’ या संकल्पनेवर आणि शैव संप्रदायावर फारसा पडलेला नाही. पाश्चात्य संशोधकांना ‘विश्वाचा निर्माता’ ही संकल्पनाच समजून घेता आली नाही. त्यामुळे मात्र सातत्याने महादेवाला ‘विध्वंसक प्रवृत्तीची देवता’ असे संबोधित केले गेले. महादेवाचे 'भैरव' हे रुद्ररूप, त्याच रौद्ररूपातील त्याची सहचारिणी ’महाकाली‘ या दोघांच्या गळ्यातील कवट्याच्या माळा, हातातील शस्त्रे या प्रतिमांच्या प्रतिकशास्त्राचा (आयकॉनॉलॉजी) अभ्यास न करताच भूतगणांसह त्यांच्या स्मशानातील नृत्याविषयी चवीने लिहिले गेले. प्रत्यक्षात, निर्मिती अधिक स्थिती अधिक लय अधिक पुन्हा निर्मिती म्हणजेच सृष्टी-स्थिती-संहार-विलय (माया)-अनुग्रह (मुक्ती) या त्रिमूर्तींच्या पंचक्रियांचा अभ्यास आणि योग्य मांडणी फार थोड्या परदेशी अभ्यासकांना जमली होती. सृष्टीतील निर्मिती आणि लय यामधील ताळमेळ साधण्याचे काम हे ‘महादेव’ या देवतेच्या संकल्पनेचे बीज आहे.
तैत्तरीय संहितेनुसार महादेव म्हणजे साक्षात अग्नी, ज्याची दोन रूपे आहेत, पहिले भयंकर विनाशक ज्याला ‘घोर’ असे संबोधित केले गेले, तर दुसरे ‘शिव’ म्हणजे सौम्य आणि कल्याणकारी स्वरूप. सूर्य आणि अग्नी हे रुद्राचे रूपक, तर शीतल चंद्र हे शांत शिवाचे रूपक. पंचमहाभूतांपैकी अग्नी हा उत्क्रांतीच्या काळात मानवाने निसर्गात अनुभवलेला विध्वंसक शत्रूच होता. कालांतराने, म्हणजे काही लक्ष वर्षांच्या कालावधीनंतर, या अग्नीचे कल्याणकारी स्वरूप मानवाच्या लक्षात आले असावे आणि त्यानंतर या अग्नीचे दैवतीकरण झाले आणि त्यानुसार अग्नी हा धर्मसंस्कृतीतील प्रथम क्रमांकाची देवता म्हणून लोकमानसात स्वीकृत झाला आणि मग याच अग्नी देवतेच्या प्रखर आणि सौम्य प्रकाशाची-चैतन्याची-ऊर्जेची देवता म्हणून महादेव त्यांच्या ‘रुद्र’ आणि ‘शिव’ या विग्रहात या अग्नीचे प्रतिक बनले. याच महादेव-शिव-नटराजाच्या प्रतिमेतील चिह्नसंकेतांचा स्पष्ट उल्लेख तैत्तरीय संहितेमध्ये उपलब्ध आहे.
या संहितेनुसार स्त्रीचे गर्भाशय (योनि) हे अग्नीस्वरूप मानले गेले आहे. इथे नटराजाच्या स्त्रीसंमिश्र प्रतिमेतील डाव्या हातात अग्निशिखा आणि डाव्या कानातील स्त्रीच्या कर्णभूषणाचा संदर्भ सहज स्पष्ट होतो. याच स्त्रीसंमिश्र युगूलधर्मात पुरुषबीजाला ‘इंदू’ असे संबोधित केले गेले. इंदू म्हणजेच चंद्र, अर्थात सोम म्हणजेच नटराजाच्या उजव्या कानातील पुरुषाची कर्णभूषणे आणि शिरोभागी धारण केलेला चंद्र. हे विश्व अग्नी आणि सोम या दोन तत्त्वांपासून बनले आहे. या संकल्पनेचे बृहजाबालोपनिषद या संहितेत सविस्तर विश्लेषण केले आहे. अग्नी आणि सूर्य या तत्त्वांचा ‘रुद्र’ हे रूपक आहे, तर ‘शिव’ हे चंद्र आणि सोम यांचे रूपक आहेत. विश्वाच्या निर्मिती-उत्पत्तीपर्वात आणि मानवाच्या उत्क्रांती काळात स्त्री-पुरुषांच्या कामरूप क्रीडा अस्तित्वात होत्याच. याच कामरूप युग्मातून सृष्टी निर्माण झाली. सर्वशक्तिमान महादेव-शिव, अर्धनारीनटेश्वर म्हणजेच स्त्रीसंमिश्र देह स्वरूपात विश्वाचा निर्माता झाले. याच मूलभूत संकल्पनेतून शिवाची ‘योनिस्थित लिंग’ या प्रतीकाची पूजा ही सर्वशक्तिमान विश्वनिर्मात्याची आराधना आणि पूजा म्हणून काही हजार वर्षांपासून आर्येतर लिंगपूजक संप्रदायाच्या उपासना आणि उपचारात स्वीकारली गेली. आजही शैव, शाक्त आणि स्मार्त संप्रदायातील साधक महादेवाच्या मंदिरातील पूजा आणि उपासना उपचारात फक्त ‘योनिस्थित लिंग’ याच प्रतीकाची पूजा करतात. श्रीराम आणि श्रीकृष्ण या श्रीविष्णूच्या दोन विग्रहांच्या प्रतिमा अथवा मूर्तीप्रमाणे महादेवाच्या मंदिरात शिवाची प्रतिमा अथवा मूर्ती ठेवलेली सहसा दिसत नाही.
‘त्रिमूर्ती’ या विलक्षण संकल्पनेतील चिह्नांचा, चिह्नसंकेतांचा आणि त्याच्या प्रतिकमूल्यांचा अभ्यास फार अद्भुत अनुभूती देतोच. त्याबरोबरच देवी-देवतांच्या चित्र, शिल्प, प्रतिमा आणि मानव रूपातील मूर्तींचे दर्शनसुद्धा चैतन्यमयी आणि ऊर्जादायी असते. या चित्र आणि प्रतिमांमधील देवतेची व्यष्टी (खास स्वतःची) वैशिष्ट्ये यासह हातातली आयुधे-अलंकार-सजीव प्राणी अथवा निर्जीव वस्तू यांचे सान्निध्य आणि त्या सर्वांचे चिह्नसंकेत यांचा अविष्कार असाच ऊर्जादायी असतो. महादेव अर्थात शिवाची भक्ती उपासना सामान्यत: ‘योनिस्थित लिंग’ या प्रतीकाने होते. मात्र, महादेवाच्या मानव रूपातील शिल्प, चित्र, मूर्ती आणि प्रतिमा सर्वत्र प्रचलित आहेत. वर वर्णन केलेली सर्वच व्यष्टी वैशिष्ट्य महादेवाच्या असंख्य विग्रह प्रतिमांमधून व्यक्त होतातच. प्रत्येक विग्रहामध्ये असलेल्या चिह्नांचा, चिह्नसंकेतांचा आणि त्याच्या प्रतीकमूल्यांचा संदर्भ वेगळा असू शकतो. महादेवाच्या या प्रतिमेत दिसणारी सजीव-निर्जीव चिन्हे ही महादेवाची वैशिष्ट्ये आहेत. यातील काही अलंकार आहेत, तर काही वैशिष्ट्ये अंगभूत आहेत.
शिवाचे संपूर्ण शरीर स्मशानातील चितेतील भस्माने लेपलेले असते. शिवाची ही अलौकिक-पारलौकिक अशी क्षमता आहे, कारण चितेमध्ये भस्म झालेला मानवी देह हे या विश्वाचे अंतिम वास्तव आहे, प्रत्येक सजीव आणि निर्जीव यांचा अंत निश्चित होणार आहे. असे हे चितेतील भस्म शरीराला लेपून घेतले तरी शिवावर मात्र त्याचा कुठलाही परिणाम होत नसतो. कारण, हे विश्व त्याच्यापासूनच निर्माण झालेले आहे. तोच सर्वशक्तिमान आहे, सर्वत्र आहे. या चितेतील भस्म संदर्भात आधुनिक वैज्ञानिकांनी काही संशोधन केले आहे. मात्र, याची सत्यता पडताळून पाहता आलेली नाही. शिवाचे वसतिस्थान सर्वात उंच बर्फाळ पर्वतावर आहे. तिथे अतिनील किरणांचा उत्सर्ग सजीवांच्या शरीराला अपायकारक असतो. वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगात सर्वांगाला लेपलेल्या चितेतील भस्मामधील खनिजांमुळे मानवी त्वचा आणि डोळे यांना अशा अतिनील किरणांचा त्रास होत नाही, असा निष्कर्ष काढला गेला आहे. चितेतील भस्माबद्दल काही सहस्र वर्षांपूर्वीच्या या उल्लेखीला असा काही निश्चित विज्ञाननिष्ठ आधार असावा, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
आदियोगी शिवाच्या गुंता झालेल्या केसांच्या जटा हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य आहे. शिवाच्या नटराजमुद्रेतील प्रमाणयोग्य प्रतिमेत बैराग्याच्या या अस्ताव्यस्त जटांच्या तीन बटा वार्यावर उडताना दिसतात. योगसाधनेमध्ये आवश्यक अशा तन-मन आणि आत्मिक शक्ती याच्या एकत्रित प्रभावाने निर्माण होणारी चेतना आणि ऊर्जा याचा हा संकेत, योगशास्त्राचा निर्माता आदियोगी शिव, जटांच्या या उडणार्या तीन बटांतून देत असतो. शिवाने मस्तकावर गंगा धारण केली आहे, जिचा सौम्य प्रवाह त्याला सतत अभिषेक करत असतो. हिंदू संस्कृती मान्यतेमध्ये गंगा नदीला ‘माता’ म्हटले आहे. योग्य वेळी-योग्य उपचाराने गंगेत स्नान करणे हे पापक्षालन, पावित्र्य, शुद्धता याचे लक्षण मानले गेले आणि ज्ञानप्राप्ती आणि अंतिम मुक्ती यासाठी गंगेची आराधना हा एक उपासना मार्ग सिद्ध झाला. याच संकेताने शिवाच्या मस्तकावरील गंगा दर्शक आणि उपासकाला शांती, विचार शुद्धता आणि ज्ञानप्राप्तीचा आणि ज्ञानसंचयाचा संदर्भ देत असते. शिवाच्या मस्तकावर त्याने धारण केलेला चंद्र हा त्याचा एक अलंकार आहे, त्यांचे अंगभूत वैशिष्ट्य नव्हे. याचा चिह्नसंकेत फार परिपूर्ण आहे. चंद्राच्या कला त्याच्या पृथ्वीभोवताली होणार्या संक्रमणामुळे आपण दृष्यस्वरूपात पाहू शकतो. या चंद्रकला निर्मिती-लय-पुनर्निर्मिती या शिवाच्या एका तत्त्वाचे प्रतीके आहेत. शिव स्वतः काळाचा कर्ता आहे. त्यामुळे मानवी जीवन आणि निसर्ग यातील नियमित कालचक्राचे प्रतीक असलेली चंद्रकोर त्यांच्या मस्तकावर शोभून दिसते.
7400173637