आज स्वातंत्र्य दिन. आपल्यासाठी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य दिन नेहमीच खूप महत्वाचा असतो. कुणासाठी ऑफिसची सुट्टी म्हणून तर कुणासाठी तीन रंगाचे कपडे घालून ऑफिसला जाण्यासाठी, कुणासाठी शाळेतील कार्यक्रम म्हणून तर कुणासाठी इतर काही कारणासाठी मात्र खरा स्वातंत्र्य दिन कुठला? त्याचा खरा अर्थ का? हेच उलगण्यात आलं आहे या लघुपटात.
या लघुपटात कोणी प्रसिद्ध कलाकार नाहीत, या लघुपटाला कथा म्हणून काही ठळक कथा नाही, मात्र लघुपटाचा संदेश अगदी स्पष्ट आहे. स्वातंत्र्यदिनी एक ऑटोरिक्शाचालक वेगवेगळ्या लोकांना घेऊन जात असताना त्याला आलेले अनुभव या लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत.
त्याच्यासाठी त्याची नोकरी, त्याची खाकी वर्दी खूप अभिमानाची असते. देशासाठी आपण काहीतरी चांगलं करतोय, ईमानदारीने करतोय याची जाणीव करून देणारी असते. त्याच्या ऑटोतून प्रवास करणारा मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा फ्रर्स्टेटेड युवक असू देत, नाही तर सेल्फी काढणाऱ्या मुली, किंवा त्रस्त असलेले काका. स्वातंत्र्यदिनासाठी असलेलं देशप्रेम त्यांच्याडोळ्यातून कुठूनही दिसत नाही. इतक्यात त्याला एक छोटा मुलगा झेंडा विकत असताना दिसतो. पहिल्यांदा रिक्शाचालक नाकारतो, मात्र पुन्हा एकदा बघितल्यानंर त्यांच्या डोळ्यातील देशप्रेम त्याने हाताने केलेल्या झेंड्यातून दिसून आले, आणि खऱ्या अर्थाने त्याचा स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
जगदीश मिश्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटाला यूट्यूबवर साधारण १० हजार व्ह्यूज आहेत. एक वेगळा संदेश देणारा आणि खऱ्याअर्थाने स्वातंत्र्यदिनाचे महत्व या लघुपटाने सांगितले आहे. एकदा तरी नक्कीच बघावा असा हा लघुपट आहे.
- निहारिका पोळ