आंदोलकांवर गोळीबार करण्याचा शासकीय व सैनिकी आदेश पाळण्यास नकार देऊन सेनेतून फुटून वेगळ्या झालेल्या सैनिकी अधिकाऱ्यानी२९ जुलै २०११ मध्ये असाद शासन उलथवून टाकण्यासाठी कर्नल रियाद अल-असादच्या अधिपत्याखाली ‘फ्री सीरियन आर्मी’ची स्थापना केली. निःशस्त्र आंदोलकांना संरक्षण देणे व असाद राजवटीचा पाडाव करणे, ही दोन उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली.
‘सीरियन आर्मी’ने रोजावाला कोबानच्या युद्धात ‘इसिस’विरोधात लढताना साहाय्य केले. त्यामुळे रोजावाला कोबानची कोंडी फोडून ‘इसिस’चा पराभव करणे सोपे गेले, पण असे असले तरी ‘फ्री सीरियन आर्मी’ व रोजावाच्या वायपीजीचे संबंध सौख्याचे अजिबात नव्हते. ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात नाझीवादाच्या महाराक्षसाला समूळ नष्ट करण्यासाठी चर्चिल म्हणाले होते की, “मी सैतानाशीही हातमिळवणी करीन व खरोखर त्याप्रमाणे एकमेकांचे कट्टर विरोधक ब्रिटन- रशिया/ सोव्हिएत युनियन व अमेरिका-रशिया/सोव्हिएत युनियन केवळ नाझीवादाचा भस्मासूर संपवायला एकत्र आले होते, तसेच इथे ‘इसिस’चा महाराक्षस, भस्मासूर संपवायला एकमेकांचे विरोधक एफएसए व वायपीजीचे एकत्र आले होते. पण, त्याआधी ‘एफएसए’ची स्थापना कुठल्या पार्श्वभूमीवर झाली, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर व विचारसरणीवर प्रकाश पडण्यास साहाय्य होईल आणि त्याअन्वये एफएसए व कुर्द-रोजावा संबंधही समजून घेण्यास साहाय्य होईल.
‘फ्री सीरियन आर्मी’ची स्थापना
२०११ ला अरब क्रांतीचे लोण सीरियामध्ये पोहोचले होते. सीरियाच्या नैऋत्य दिशेला सीरिया-जॉर्डनच्या सीमेलगत ‘दरा’ हे शहर आहे. १५ युवकांनी शाळेच्या भिंतीवर असाद राजवटीच्या विरोधात ग्राफिटी रेखाटली, त्यामुळे ६ मार्च २०११ ला त्या १५ युवकांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी, मित्रपरिवार व पाठिराख्यांनी १५ मार्चला मोर्चा काढून त्यांच्या सुटकेची मागणी केली. युवकांच्या अटकेच्या निषेध मोर्चाचे रुपांतर अन्यायी असाद राजवटीविरोधात झाले. १५ मार्चला लोकशाहीच्या स्थापनेसाठी दमास्कस व अलेप्पो या सीरियातील मोठ्या शहरातही मोर्चे काढण्यात आले. मोर्चात ‘परमेश्वर, सीरिया, स्वातंत्र्य, सामान्य राजकीय अधिकार व वैयक्तिक स्वातंत्र्याची मागणी’ या घोषणेसह अध्यक्ष असाद व कुटुंबीयांना भ्रष्टाचारासाठी उत्तरदायी धरून भ्रष्टाचार विरोधी घोषणा देण्यात आल्या. सीरियन सेनेने मोर्चावर गोळीबार केला, ज्यात प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे अंदाजे पाच जणांचा मृत्यू झाला व शेकडो जखमी झाले. जखमींना रुग्णालयातून हिसकावून नेऊन अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. दररोज मोर्चे काढण्यात येऊ लागले व असाद शासनाने ते निर्दयीपणे दडपण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते टॉमी विटोर व संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी शांततामय निषेध मोर्चा काढणार्यांवर हिंसक हल्ला करून ते दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या असाद शासनाचा निषेध केला. हळूहळू लोकांचे मोर्चे वाढू लागले, तसतसा शासनाचा ते चिरडण्याचा प्रयत्नही वाढत चालला. च्या अनुसार आंदोलन चिरडण्यासाठी बंदूकधारी सैनिकांसह रणगाडे व विमानविरोधी तोफांचाही उपयोग करण्यात आला.
पण, यादरम्यान शासनाच्या सेनेतील काही सैनिकांनी आंदोलकांवर गोळीबार करण्यास स्पष्टपणे नकार दिला व ते शासकीय सेनेतून वेगळे झाले. अशाप्रकारे आंदोलकांवर गोळीबार करण्याचा शासकीय व सैनिकी आदेश पाळण्यास नकार देऊन सेनेतून फुटून वेगळ्या झालेल्या सैनिकी अधिकार्यांनी २९ जुलै २०११ मध्ये असाद शासन उलथवून टाकण्यासाठी कर्नल रियाद अल-असादच्या अधिपत्याखाली ‘फ्री सीरियन आर्मी’ची स्थापना केली. निःशस्त्र आंदोलकांना संरक्षण देणे व असाद राजवटीचा पाडाव करणे, ही दोन उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली. सामान्य लोकांशी समन्वय साधून त्यांच्याशीच निष्ठावान राहून प्रतिष्ठा व स्वातंत्र्य मिळवणे यासाठी एफएसए प्रयत्नशील राहील, असे सांगण्यात आले. तसेच असाद शासन सेनेत असणाऱ्या सैनिकांना व सैनिकी अधिकार्यांना आपल्याच लोकांवर गोळीबार न करता स्वातंत्र्य मिळविण्यासाठी एफएसएमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. असाद राजवटीचे सैनिक व एफएसएचे सैनिक यात झालेले रस्तानचे युद्ध आजपर्यंतचे सर्वात प्रदीर्घ काळ चाललेले प्रखर युद्ध होते की, ज्यात एफएसएला आठवड्याभराच्या चिवट झुंजीनंतर रस्तानमधून माघार घ्यावी लागली. एकेकाळच्या सीरियाच्या जवळच्या मित्रराष्ट्राने म्हणजे तुर्कस्तानने या माघार घेतलेल्या एफएसएच्या सेनेला आश्रय दिला. तुर्कस्तानने दहशतवादी घोषित केलेल्या अब्दुल्ला ओकलानला सीरियाच्या असाद राजवटीने काही काळ आश्रय दिला होता व आता असादविरोधात बंड केलेल्या एफएसए सेनेला आता तुर्कस्तानने आश्रय दिला. तुर्कस्तानने आपल्या देशाच्या दक्षिणेला व सीरियाच्या सीमेलगत असणाऱ्या हताय प्रांतात एफएसएला त्यांचे मुख्यालय काढण्यास अनुमती दिली. याचा फायदा घेऊन एफएसए सीरियाच्या शासकीय सेनेवर हल्ले करू लागली व तुर्कस्तानातील या जागेचा सुरक्षितरित्या लपण्यासाठी उपयोग करू लागली. एफएसएकडे तोपर्यंत 15 हजारांची सेना जमा झाली होती. एफएसएमध्ये ९० टक्के सुन्नी मुस्लीम होते, उर्वरितांमध्ये शिया अलवाईटस, ड्रूझ, ख्रिश्चन, कुर्द व पॅलेस्टाईनी होते. दि. ६ जानेवारी २०१२ ला सीरिया शासकीय सेनेचा जनरल मुस्तफा अल-शेख व ७ जानेवारी २०१२ ला सीरियन हवाई दलाच्या लॉजिस्टिक विभागाचा कर्नल अफिफ मोहम्मद सुलेमा आपल्या ५० साथीदारांसह फुटून एफएसएमध्ये सामील झाला. अल-जझिरा अरेबिक वृत्तवाहिनीवर थेट प्रक्षेपणात त्याने असे सांगितले की, “आम्ही सेनेमधील आहोत व सरकार नागरी आंदोलकांना ठार मारत आहेत म्हणून आम्ही त्याचा त्याग केलाय.” पण असे असले तरी त्यांच्याकडे शस्त्रसज्ज वाहने नव्हती, त्यांच्याकडे केवळ हलकी वाहने व युद्धसाहित्य होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला गनिमी काव्याचा वापर केला. हळूहळू त्यांना शस्त्रास्त्र, लॉजिस्टिक, वाहने यांची कमतरता भासू लागली व सैनिकांना पगार द्यायलाही पैसा नव्हता. एफएसएमध्ये असाद सरकारच्या सेनेतील सैनिकांसोबत सामान्य लोकही सामील होऊ लागले होते. त्याचा परिणाम असा झाला की, या सामान्य नागरिकांना अर्थातच सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव नसल्याने ते सैनिकी तंत्र, युद्धशास्त्र व शस्त्र चालवणे यात पारंगत नव्हते. त्यांना प्रशिक्षित करण्यात बराच कालावधी, प्रशिक्षण तळासाठी जमीन व पैसा लागला असता. त्यामुळे एफएसएमध्ये समन्वयाचा व एकतेचा अभाव जाणवू लागला. अशा वेळी अमेरिकेने १२३ अमेरिकन डॉलरचे अमारक साहाय्य दिले व अमेरिकेचे सहकारी देश कतार व सौदी अरेबियाने एफएसएचा सेनाध्यक्ष सलीम इद्रिसमार्फत सर्व मारक साहाय्य देण्याचे मान्य केले. एफएसएमधील उणिवेचा कोणी फायदा करून घेतला व नंतर एफएसए रोजावाच्या कोबान युद्धात कुर्दांना साहाय्य करण्यास का तयार झाली, जाणून घेऊ पुढील लेखात.