मानो या ना मानो...

    08-Jul-2018   
Total Views | 24

 

 

समाज आणि धर्म म्हटलं की, मतमतांतरांचा आणि वैज्ञानिक विचारशैली अंगीकारणारा विचार हा तसा वैश्‍विकच! असेच एक दैवी अस्तित्वाला धुडकावून देत कोणी मला देव दाखविला तर राजीनामाच देतो, असे जाहीर वक्तव्य करणारे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्यूटर्टे. 

देव आहे किंवा नाही, त्याचे अस्तित्व स्वीकारायचे अथवा नाकारायचे हा सर्वस्वी, ज्याच्या-त्याच्या भक्तिभावाचा, दृष्टिकोनाचा प्रश्‍न. त्यावरून एखादी व्यक्ती आस्तिक किंवा नास्तिक आहे, असे सरसकट आपण ठरवून मोकळेही होतो. त्यातही काहींचे म्हणणे पडते की, मला जोपर्यंत दैवी प्रचिती येत नाही, माझ्या आयुष्यात चमत्कार-साक्षात्कार घडत नाही, तोपर्यंत मी देव आहे, असे मानणार नाही. याउलट ‘देव वसे कणोकणी’ असे अपरंपार निष्ठेत आकंठ बुडालेले धार्मिक कार्यात स्वत:चे अवघे आयुष्य देवाचरणी समर्पित करतात. त्यातही कोट्यवधी सामान्यांच्या अशा विविध जाती-धर्मातील वैयक्तिक भावभावनांच्या गुंतागुंतीत आपण जीवन जगत असतो. कोणाच्या श्रद्धेचा अपमान आपल्या कृतीतून अथवा बोलीतून होणार नाही, याची तेवढी संवेदनशीलता बाळगून पण, बरेचदा आपली अधार्मिक वैयक्तिक मते जेव्हा सार्वजनिक व्यासपीठांवर मांडली जातात, तेव्हा एकच गदारोळ उडतो. धर्ममार्तंडांचे पित्त खवळते आणि आंदोलने-निदर्शनांचा महापूर येतो. भारतात तर असे प्रकार आपल्यासाठी निश्‍चितच नवीन नाही. कारण, इथे तशा दोन गटांचा संघर्ष सुरूच असतो. परदेशातही याला काही अपवाद नाहीच म्हणा. आपल्याकडे हिंदू देवदेवता नाकारणे, चालीरीतींना झुगारले जाते, तसे तिथे येशूवर, चर्चच्या प्रणालीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे आहेतच की... कारण, आता नावावरून कळेलच की, हे मोठे महाशय साहजिकच ख्रिश्चनधर्मीय आहेत. विशेष म्हणजे, ज्या देशाचे हे राष्ट्राध्यक्ष आहेत, तिथे ख्रिश्चन अल्पसंख्याक नाही, तर सर्वाधिक आहेत. आशिया खंडातील सर्वाधिक ख्रिस्ती लोकसंख्येचा देश म्हणजे द. आशियातील फिलिपाईन्स. त्यामुळे ज्या देशातील तब्बल ८६ टक्के लोकसंख्या फक्त ख्रिश्चन धर्माचे पालन करते, त्याच देशाचे प्रतिनिधित्व करणारा, लोकांनीच निवडून दिलेला सर्वोच्च नेताच देवाचे अर्थात येशूचे अस्तित्वच नाकारण्याचा उद्दामपणा करतो, हे चर्चसाठीही तितकेच हादरवून सोडणारे. खरं तर रोड्रिगो त्यांच्या अशा जहाल, जहरी वक्तव्यांसाठी त्यांच्याच देशात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेतच. डोनाल्ड ट्रम्प यांची कार्बन कॉपी म्हणा हवं तर... परंतु, टीकेची कितीही झोड उठली तरी आपल्या वक्तव्यांवरून आणि कृतीवरून अजिबात मागे न हटणारे असे हे अडेलतट्टू राष्ट्राध्यक्ष...

 

रोड्रिगो यांनी शुक्रवारी तेथील डावाओ शहरात एका विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रमाला संबोधित करताना येशूच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर नवजात शिशूंवरही पापाचा डाग असतोच आणि तो केवळ बाप्टिझमने पुसला जातो, या चर्चच्या विचारांवरही त्यांनी सडकून टीका केली. यावर रोड्रिगो म्हणतात, “इथे देवाचा तर्क कसा लागू होतो? त्यामुळे मी आव्हान करतो की, एक असा माणूस दाखवा, जो छायाचित्रासह किंवा सेल्फीसह देवाचे अस्तित्व सिद्ध करू शकेल, जो देवाला प्रत्यक्षात बघू शकतो आणि त्याच्याशी संवाद साधू शकतो, अशी एखादी तरी व्यक्ती आढळली तरी मी राजीनामा देईन.” याआधीही या राष्ट्राध्यक्ष महोदयांची देवालाच ‘मूर्ख’ म्हणून अवहेलना करण्याइतपतही मजल गेली होती, हेही अजून त्यांचा देश विसरलेला नाही. त्यांच्या अशा श्रद्धेलाच धक्का देणार्‍या विधानांनंतर चहूबाजूने टीकेची झोड उठलीच, पण त्यांना झुगारतील ते रोड्रिगो कसले! त्यामुळे फिलिपाईन्समध्येही आगामी काळात धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यामध्ये संघर्षाची ही ठिणगी वणव्यात रूपांतरित होण्याचीच शक्यता नाकारता येत नाही.

 

रोड्रिगो यांचे मत काहीही असो, ते देवाला ‘मानो या ना मानो,’ पण, राष्ट्राध्यपदी विराजमान व्यक्तीने किमान आपल्याच देशातील आणि तेही बहुसंख्येने पालन केल्या जाणार्‍या धर्माचा, देवाचा असा जाहीर अपमान करणे देशहितासाठी मारक ठरू शकते. त्यामुळे केवळ सत्तास्थानी स्थिरावल्यामुळे आपल्यालाच जणू देवत्व प्राप्त झाले आहे, या दैवी विचारांत वावरणार्‍या रोड्रिगोसारख्यांनी जनमताचाही विचार करावा कारण, सत्तेच्या खुर्चीवर बसवणारे हेच जनमत, त्या खुर्चीचा पाया खिळखिळाही करू शकते, हे विसरून कसे चालेल?

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121