पुस्तक परिचय : 'प्रवास वर्णनांचा प्रवास : मराठी मुलुखगिरीचा धांडोळा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018   
Total Views |

 


 
 
पृथ्वीवर जीवसृष्टी स्थिरस्थावर होण्याच्या सुरुवातीच्या काळात वनस्पती वगळता अन्य सजीवांची हालचाल प्रामुख्याने अन्न मिळवण्यासाठी केली गेलेली हालचाल होती.. अन्न मिळवण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्ती/टोकाचे हवामानबदल यापासून वाचण्यासाठी नुसती हालचाल नाही तर स्थलांतरं सुरू झाली. पक्षी, प्राणी यांनी खंडच्या खंड ओलांडले ... माणसानेही सुरुवातीला हे केलं, पण नंतर शेतीचा शोध लागल्यामुळे त्याला काहीसं स्थैर्यही आलं. इतर जीवांपेक्षा मानवाचा मेंदू अधिक विकसित झाला असल्याने त्याची विचारांची झेप अधिक होती. केवळ जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टींच्या पुढे जाऊन तो अनेक गोष्टी करू लागला. साहजिकच त्याच्या स्थलांतरांतला प्रवासाचं स्वरूप प्राप्त होऊ लागलं. दुसऱ्याचा प्रदेश जिंकून घेण्यापासून ते व्यापार करण्यापर्यंत अनेक कारणांमुळे माणूस अपरिचित प्रदेशात जाऊ लागला. अर्थात भौतिक सुखलालसेच्या पुढे जाणारा आणि इतर प्राण्यांमध्ये नसणारा एक महत्वाचा गुण माणसाच्या अंगी असतो जो त्याला ओळखीच्या क्षितिजापलीकडे जायला प्रवृत्त करतो, तो म्हणजे 'कुतूहल'. या कुतुहलापोटीही अनेकांनी पुष्कळ प्रवास केला. अनेकदा आपण जे पाहिलं आहे त्याच्या नोंदी करून ठेवल्या. युआन श्वांग, मार्को पोलो यांनी केलेले प्रचंड प्रवास आणि करून ठेवलेल्या नोंदी आजही इतिहास अभ्यासकांसाठी महत्वाच्या ठरतात. जगभरातील अनेक भाषांमध्ये प्रवासवर्णनं लिहिली गेली. त्यापैकी मराठीतल्या प्रवासवर्णनांची सुरुवात कशी झाली, त्यात कालानुरूप कसे बदल होत गेले हे जाणून घेण्याच्या कुतूहलातून मुकुंद वझे यांनी मराठीतल्या प्रवासवर्णनांचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. त्याच अभ्यासातून साकारलं पुस्तक 'प्रवासवर्णनांचा प्रवास'.
 

प्रवासामागचा उद्देश आणि प्रवासाची साधनं

पहिल्या प्रकरणात मराठीतले पहिले प्रवासवर्णन कोणते याबद्दल उहापोह केला आहे. गोडसे भटजींनी १८५७च्या धामधुमीत केलेल्या प्रवासावर आधारित 'माझा प्रवास' हे मराठीतले पहिले प्रवासवर्णन मानले जात असले तरी ती हकीगत त्यांनी १८५७ नंतर २५ वर्षांनंतर लिहून काढली होती आणि त्यानंतर २५ वर्षांनी ती प्रकाशित झाली. त्यामुळे कथानका कालखंडाच्या दृष्टीने ते पहिलं प्रवासवर्णन असलं तरी तांत्रिकदृष्ट्या तास म्हणता येणार नाही. १८६७साली 'इंग्लंडातील प्रवास' हे करसनदास मूळजी यांचं प्रवासवर्णन मराठीत आलेलं असलं तरी तो मूळच्या गुजराती पुस्तकाचा अनुवाद आहे. काशीप्रकाश-महायात्रा वर्णन हे शामराव मोरोजी लिखित पुस्तक १८५२ साली प्रकाशित झालं होतं. त्यामुळे ते मराठीतलं पहिलं प्रवासवर्णन आहे असं म्हणायला वाव आहे (अर्थात द. वा. पोतदारांच्या एका पुस्तकात याहून जुन्या प्रवासलेखनाचे उल्लेख आहेत असा ओझरता उल्लेख लेखक करतो, पण त्याबद्दल अधिक माहिती न दिल्याने पहिल्या प्रवासवर्णनावर त्याहून अधिक प्रकाश पडू शकलेला नाही). काहीही असलं तरी मराठीतली प्रवासवर्णनं दीडशे वर्ष जुनी आहेत हे निश्चित आणि या कालखंडातल्या प्रवासवर्णनांचा प्रवास मनोवेधक आहे. प्रत्यक्ष प्रवासवर्णनांचा लेखजोखा करण्यास सुरू करण्यापूर्वी पहिल्या प्रकरणात 'पूर्वीच्या काळात प्रवास कसा आणि कोणत्या परिस्थितीत केला जाई' यावर एक अतिशय माहितीपूर्ण टिपण आहे. त्याकाळी प्रवास मुख्यत्वेकरून हेतू लग्न, मुंज, मृत्युपश्चातचे विधी अशा कौटुंबिक कारणांनी होत असे. प्रवासाची साधनं खूप अपुरी होती. आर्थिक चणचण ही मोठीच अडचण असायची. पायी प्रवास करणारे पुष्कळ जण होते. एकूणच प्रवासाच्या साधनांमध्ये टप्प्याटप्प्याने कसे बदल झाले ते पाहणं रंजक आहे.

 

उदा. १८५०च्या आसपास मेरठ ते पेशावर हा मोठा प्रवास पालखीने केला जायचा आणि तो रात्री व्हायचा. दर १०-१२ मैलांवर पालखी वाहणारे मजूर बदलले जायचे आणि तशी वेग फक्त ३ मैल एवढाच असायचा. पुढे गोविंद चिमणाजी भाटे यांनी रावळपिंडी ते श्रीनगर हा १९५ मैलांचा प्रवास घोडागाडीने केला तेव्हा त्यांना ५ दिवस लागले होते. रेल्वे भारतात विस्तारल्यावर प्रवासाच्या वेळात घेत झाली असली तरीही तरीही दूरचा प्रवास कटकटीचाच होता. १९४५ साली कोल्हापूर ते त्रिवेंद्रम प्रवास करण्यासाठी ना. सी. फडकेंना सहा वेळा गाडी बदलावी लागली होती. अशा प्रकारच्या नोंदींमुळे पहिलं प्रकरण विशेष लक्षवेधी झालं आहे.

 

प्रवासवर्णनांचे टप्पे

पुस्तकात प्रवासवर्णनांचे कालखंडानुसार १९५०पूर्व , १९५०-६० आणि साठोत्तरी असे तीन टप्पे केलेले आहेत आणि हळूहळू पण निश्चितपणे होत गेलेल्या बदलांच्या नोंदी करून करून ढोबळमानाने काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सुरुवातीच्या काळात प्रवासात भेट दिलेल्या स्थळांचे तपशील वाचकांना सांगून ज्ञानवृद्धी करण्याचा प्रवासवर्णनकारांचा उद्देश असायचा. पुढच्या काळात हळूहळू ही प्रवासवर्णनं प्रवासाच्या निमित्ताने 'स्व'च्या शोधाकडे जाणारी होत गेली. प्रवासाच्या ठिकाणी काय पाहिलं यापेक्षा ते पाहताना काय भाव उत्पन्न झाले, त्या अनुभवात आपला अंश कसा उतरला याचा शोध घेणं हा प्रवासवर्णनांचा उद्देश झाला असा लेखकाचा निष्कर्ष आहे. याशिवाय या टप्प्यांमध्ये प्रवासाच्या हेतूंमध्येही बदल होत गेले. हे या काळात पुस्तकांच्या शीर्षकांमध्ये झालेले बदलही लक्षात घेण्यासारखे आहेत.

 

पूर्वी पुस्तकांची शीर्षकं सरळसोट असायची आणि पुढे लेखकाचं आणि त्याच्या पदव्या किंवा भूषवलेली पदं अशी लांबलचक आगगाडी असायची. 
उदा. 'लंकेचे वर्णन व वृत्तांत' - ले. गोविंद चिमणाजी भाटे (डे. एज्यु. सोसायटी, पुणे हिचे सेवानिवृत्त तहहयात सभासद)...
किंवा
'नेपाळचा प्रवास' - ले. संपतराव गायकवाड, एफ. आर. एस. एल. एफ. आर. जी. एस. बार अॅट लॉ....
पुढे मात्र 'अगस्तीच्या अंगणात', 'पूर्वरंग' अशी अधिक लालित्यपूर्ण शीर्षकं पुस्तकाला मिळू लागली.

 

प्रवासवर्णनांचा तौलनिक अभ्यास

हे पुस्तक प्रवासवर्णनांचा प्रवास अभ्यासण्याचा दृष्टीने लिहिलेलं असलं तरी त्याचं स्वरूप एखाद्या साहित्यिक प्रबंधासारखं आहे. त्यातून काही एक निष्कर्ष निश्चितपणे काढले गेलेले असले तरी पुस्तकाचा बराचसा भाग प्रवासवर्णनांच्या तौलनिक अभ्यासाने व्यापलेला आहे. म्हणजे असं की एखाद्या मुद्द्याला धरून लेखकाने दोन किंवा तीन पुस्तकातल्या छोट्या छोट्या तपशिलांची, निरीक्षणांची तुलना केली आहे आणि एखाद्या विशिष्ट प्रसंगी लेखकांचे मत कसे भिन्न होते किंवा मांडणीत कसा फरक पडला हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य वाचकाच्या दृष्टीने यात एक अडचण आहे. वाचकाने ही पुस्तकं वाचली असतीलच असे नाही, त्यामुळे ही वाक्यं, हे उल्लेख यांच्याबद्दल तो पूर्णपणे अनभिज्ञ असतो. पुढे पुढे असे वाक्य वाक्यांचे तपशील खूपच वाढत गेल्यामुळे पुस्तकाची वाचकाला बांधून ठेवण्याची क्षमता कमी होते. सुट्यासुट्या वाक्यांच्या, उद्गारांच्या किंवा तपशिलांच्या तुलनेपेक्षा संपूर्ण पुस्तकाचं जे सार आहे त्याची तुलना लेखकाने केली असती तर पुस्तक अधिक गुंतवून ठेवणारं ठरलं असतं.

 

नेटक्या संपादनाची गरज

अनेक रंजक तपशील पुरवून वाचकाच्या ज्ञानात भर घालणाऱ्या या पुस्तकाची मांडणी, मुद्रितशोधन आणि एकूणच संपादन अतिशय ढिसाळ आहे. विरामचिन्हांच्या असंख्य चुका रसभंग करतात. प्रकरणांच्या नावांमध्ये सातत्य नाही उदा. 'प्रवासवर्णनांचे पहिले पर्व' अशा प्रकरणानंतर 'दुसरे पर्व', 'तिसरे पर्व' अशा स्पष्ट शीर्षकाचे एकही प्रकरण नाही. काही प्रकरणांची शीर्षकं इतकी ढोबळ आहेत की एकाचं नाव काढून दुसऱ्याला दिलं तर काहीही फरक पडणार नाही. उदा. 'प्रवास लेखनात येणारी सामाजिक निरीक्षणे' असं स्वतंत्र प्रकरण असतानाही 'प्रवासवर्णनपर लेखन केलेले लेखक' या पहिल्या प्रकरणात (आणि अन्यही प्रकरणांमध्ये) बरीच सामाजिक निरीक्षणं आलेली आहेत. मध्येच अचानक पाचव्या प्रकारणाचं शीर्षक 'प्रवास लेखन : साहित्य प्रकार' असं कुठलाही शेंडाबुडखा नसलेलं आहे.... देशमुख आणि कंपनी सारख्या मान्यवर प्रकाशनाकडून असं व्हावं याचं आश्चर्य वाटतं. दखल घ्यावी असा अतिशय वेगळ्या पुस्तकाला नेटक्या संपादनाने नक्कीच उठाव आला असता.

 

पुस्तक : प्रवासवर्णनांचा प्रवास

लेखक : मुकुंद वझे

प्रकाशक : देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.

पृष्ठसंख्या : १४४

किंमत : १७५

आवृत्ती : पहिली (जून २०१६)​


@@AUTHORINFO_V1@@