आजची परिस्थिती म्हणजे अघोषित आणीबाणी आहे, असे जे म्हणत आहेत; त्यांनी एकतर आणीबाणी काय होती, हे अनुभवलेले नाही किंवा नेतृत्व आणि हुकुमशहा यांच्यातील फरक त्यांना समजत नाही किंवा समजून घेण्याची त्यांना इच्छा नाही.
प्रतिवर्षी २५ व २६ जूनला आणीबाणीच्या आठवणींच्या निमित्ताने हुकुमशाहीची चर्चा सुरु होते. तशी ती यावर्षीही झाली. चीनमध्ये तर कम्युनिस्ट पक्षाची एकहाती सत्ता आहे. परंतु, तेथेही एखादा नेता किती काळ सत्तापदावर राहू शकतो, यावर मर्यादा होत्या. त्या आता काढून टाकल्या आहेत. रशिया, तुर्कस्थान आदी देशात औपचारिक निवडणुका झाल्या असल्या, तरी तेथे हुकुमशाहीचे वातावरण आहे. अमेरिकेमध्येसुद्धा ट्रम्प यांनी सर्व घटनात्मक संस्थांना गुंडाळून ठेवून, आपल्या हाती सर्व निर्णय केंद्रित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतामध्येही आणीबाणीसदृश्य वातावर तयार झाले आहे, असा सूर अनेक प्रसारमाध्यमांनी लावला आहे. जर खरोखरच असे वातावरण असेल, तर या वृत्तपत्रांचे संपादक असे अग्रलेख लिहूनही आपल्या पदावर कसे राहू शकले असते, याचा विचार त्यांच्या मनात येत नाही. कारण, जेव्हा खरोखरच असे कसोटीचे प्रसंग येतात तेव्हा यातील अनेकांनी संघर्ष करण्याऐवजी आपले गुडघे टेकल्याचाच इतिहास अधिक आहे. त्यामुळेच त्यांना आपले पत्रकारितेतील स्वातंत्र्य वर्णन करायचे असेल, तर पाश्चिमात्य देशातील उदाहरणे उधार-उसनवारीवर आणावी लागतात. परंतु, आपल्या बोरुबहाद्दरांचे शौर्य बाजूला ठेवून नेतृत्व आणि हुकुमशाही यामध्ये गुणात्मक फरक नेमका कोणता असू शकतो? यावर चर्चा करणे आवश्यक आहे. प्रत्येक नेतृत्व म्हणजे हुकुमशाही नसते, हे त्यावरून लक्षात येईल.
प्रथम नेतृत्व म्हणजे काय? याचा विचार केला पाहिजे. नेता म्हटल्यानंतर जोरजोरात भाषण करणाऱ्या व्यक्तीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. ती नेतेपदाची खूप ढोबळ व्याख्या झाली. सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या जीवनाची रूढ चाकोरी बदलण्याचे धाडस नसते. इतिहासात कुणीतरी त्या काळाचा विचार करून ती निर्माण केलेली असते. काही काळाने ती कालविसंगत होते. ती चाकोरी कालविसंगत झाली आहे, हे बहुसंख्य लोकांच्या लक्षातच येत नाही. ज्यांच्या लक्षात येते व चाकोरी बदलण्याची गरज लक्षात येते, त्यांचेही चार प्रमुख गट पडतात. पहिल्या गटातील व्यक्तींना बदलाची आवश्यकता पटते, पण चाकोरी सोडण्याचे धाडस त्यांच्यात नसते. कुणीतरी दुसऱ्याने ती चाकोरी तोडावी, याची ते वाट पाहात असतात. त्यांनी ती चाकोरी तोडली व नवी चाकोरी निर्माण केली की, ते त्यात सामील होतात. दुसऱ्या गटातील व्यक्ती न बोलता स्वत:पुरते न बोलता मार्ग काढून मोकळ्या होतात. तिसऱ्या गटातील व्यक्ती बंडखोर असतात. त्या चाकोरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. चौथ्या प्रकारच्या व्यक्ती मात्र, हे प्रयत्न स्वत:पुरते मर्यादित न ठेवता, त्यात समाजाला सामील करून घेतात. तसे करताना त्याकरिता सर्व प्रकारच्या तंत्राचा ते वापर करीत असतात. त्यांना एक नवे भान आलेले असते. त्यातून त्यांच्यापुढे नवे स्वप्न उभे असते. ते स्वप्न त्यांना प्रेरित करत असते. त्यांना अस्वस्थ करीत असते. त्यांना जे दिसत असते, ते समाजालाही दिसावे, त्या परिवर्तन प्रक्रियेत समाजाने सामील व्हावे, यासाठी त्यांची धडपड सुरु असते. परंतु, सर्वसाधारण समाज मात्र आपली चाकोरी सोडायला तयार नसतो. त्या चाकोरीतून मिळणारी सुरक्षितता त्याला सोडायची नसते. त्यामुळे नेत्याचा बदलाचा आग्रह व समाजाची किंवा संस्थेची स्थितिशीलता यांच्यात संघर्ष निर्माण होतो. या संघर्षात जर नेत्याचा पराभव झाला, तर तो हुतात्मा होतो, विजयी झाला तर त्याचे नाव विजयी नेत्याच्या स्वरुपात इतिहासात नोंदले जाते. दरम्यानच्या काळात, त्याच्यामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात, त्यांच्या दृष्टीने तो हुकुमशाहा ठरतो. समाजात अशी प्रक्रिया घडली नाही, तर तो समाज कालविसंगत होऊन काळाच्या ओघात नष्ट होतो. त्यामुळे ज्याला अनेक वेळा ‘हुकुमशाही’ म्हटले जाते, तिथे काळाला सुसंगत परिवर्तनाची आवश्यकता असते.
परंतु, याचसोबत अनेक माणसांमध्ये दुसऱ्यावर प्रभाव टाकून, त्याला आपल्या हितसंबंधांसाठी वापरण्याची जन्मजात वृत्ती असते. असा प्रभाव निर्माण करण्याकरिता ते वेगवेगळ्या युक्त्यांचा वापरही करीत असतात. वंशपरंपरेने मिळालेले महत्त्व, आर्थिक शक्ती, लष्करी शक्ती, अध्यात्मिक बळ, वक्तृत्व अशा अनेक क्लुप्त्यांचा वापर करून, समाजाला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यासाठी तेही सर्व प्रकारच्या मार्गांचा अवलंब करीत असतात. समाजातील नेतृत्वाच्या स्पर्धेने समाजातील प्रगल्भता, संस्कृती, परिवर्तनशीलता वाढते. न्या. रानडे यांच्या मृत्युलेखात त्यांच्या जीवनकार्याचे महत्त्व सांगताना लो. टिळक यांनी “थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला आपल्या विचारांची ऊब देण्याचे काम केले,’’ अशा शब्दात वर्णन केले आहे. कोणत्याही समाजातील विविध स्तरांवरचे नेतृत्व हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते. परंतु, प्रत्येक नेत्याची हुकुमशाहीच्या आरोपापासून सुटका नसते. कारण, त्याला इतर जनांपेक्षा काहीतरी अधिक दिसत असते. किंबहुना, त्याला असे दिसत असते, म्हणूनच त्याला ‘नेता’ म्हणून मान्यता मिळते व त्याला अनुयायीही मिळतात. सुरतमधील काँग्रेसमध्ये झालेल्या यादवीनंतर लो. टिळकांना काँग्रेसच्या बाहेर जावे लागले. मंडालेच्या तुरुंगवासातून परत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरु केले. वास्तविक तेव्हा काँग्रेसपेक्षा टिळक अधिक लोकप्रिय होते. परंतु, आपल्या समर्थकांचा विरोध असतानाही अपमानास्पद वाटणाऱ्या अटी स्वीकारून ते काँग्रेसमध्ये गेले व काँग्रेसचा ताबा घेतला. म. गांधींनी १९४२ सालच्या आंदोलनाचा निर्णय घेतला तेव्हा त्याला काँग्रेसच्या कार्यकारिणीची संमती नव्हती. त्यामुळे अनेक कसोटीच्या प्रसंगात धोका पत्करून, स्वत:वर जबाबदारी घेऊन, नेत्याला निर्णय घ्यावे लागतात.
लोकशाही व्यवस्थेत नेत्याच्या भावनिक लाटेत वाहून जाऊन आपल्या भवितव्यावर अहितकारक परिणाम होणारे निर्णय घेतले जाऊ नये, म्हणून निवडणुका, न्यायालये, वृत्तपत्र स्वातंत्र्य आदीची घटनात्मक व्यवस्था केलेली असते. त्यामुळे कोणत्याही नेत्याला अनिर्बंधपणे वागता येत नाही. या चौकटीतच काम करावे लागते. जनमताच्या आधारे निवडून येणारा स्वत:ची परिवर्तनाची स्वप्ने घेऊन येत असतो. यातील काही लगेच साध्य होणारी असतात, तर काही दीर्घकालीन असतात. त्या नेत्यावर विश्वास ठेवून, लोकांनी त्याला नेतेपदी निवडून दिलेले असल्यामुळे त्या अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारीही त्याचीच असते. गेल्या काही वर्षांत ज्या घटना घडत गेल्या आहेत; त्यामुळे प्रचलित व्यवस्थेतून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे लोकांना वाटत नाही. त्यामुळे पुरोगामित्व, जागतिकीकरण आदी चाकोरीतूनच प्रचलित प्रश्नांची उत्तरे मिळणार, या श्रद्धेने चौकटबद्ध विचार करणाऱ्यांच्या पलीकडे ही उत्तरे असल्याने त्यावर त्यांना चर्चा करता येत नाही. त्यामुळे हुकुमशाहीचा आरोप सवंगपणे केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत जगभर पसरलेल्या जिहादी दहशतवादामुळे पुरोगाम्यांची मक्का, मदिना असलेल्या अमेरिका व युरोपमध्येही आंधळ्या धार्मिक स्वातंत्र्याबद्दच्या धोक्याची जाणीव निर्माण झाली आहे. ट्रम्प यांना मिळालेला जनमताचा पाठिंबा व त्यानंतरच्या त्यांच्या निर्णयावर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने केलेले शिक्कामोर्तब हे या बदललेल्या परिस्थितीचे निर्देशक आहे. जर्मनीत जे निर्वासित अनिर्बंधपणे येत आहेत, त्यांच्याबद्दल जर्मनीत असलेल्या असंतोषाची दखल मर्केल यांनाही घेणे भाग पडले. परिस्थितीत होणारे मूलगामी बदल लक्षात घेऊन लोकशाही प्रक्रियेने निवडून आलेल्या प्रत्येक नेत्याला, घटनात्मक मर्यादेत राहून, प्रचलित विचारांची चौकट बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे. इतिहासाचीच पुनरावृत्ती करायची असेल, तर परिवर्तनवादी नेतृत्वाची गरजच नसते. अनेकवेळा अशी चौकट मोडण्याचा लढा नेत्याला एकाकीच लढावा लागतो.
आणीबाणीत आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी इंदिरा गांधींनी सर्व घटनात्मक चौकटी मोडून काढल्या, म्हणून त्यांच्यावर हुकुमशाहीचे आरोप झाले. आजची परिस्थिती म्हणजे अघोषित आणीबाणी आहे, असे जे म्हणत आहेत; त्यांनी एकतर आणीबाणी काय होती, हे अनुभवलेले नाही किंवा नेतृत्व आणि हुकुमशहा यांच्यातील फरक त्यांना समजत नाही किंवा समजून घेण्याची त्यांना इच्छा नाही. फेसबुक, ट्विटर, प्रसारमाध्यमे यांमधून शिव्यांच्या लाखोल्या वाहायच्या व हुकुमशाहीचा आरोप करायचा ही वैफल्यातून आलेली वैचारिक दिवाळखोरी आहे.