गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लहानपणीच्या एका प्रसंगावर आधारित लघुपट येणार अशी चर्चा होती. ज्यावेली त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला त्यावेळी या लघुपटासंदर्भात आणखीनच उत्सुकता निर्माण झाली. आणि अखेर काल हा लघुपट आला. लघुपटाच्या नावातच सगळं काही आहे. "दुसऱ्यांसाठी जगलेलं आयुष्य म्हणजेच खरं आयुष्य असतं" हा या लघुपटाचा सारांश.
लहानपणीचे पंतप्रधान म्हणजेच नरु मोदी. एकदा स्वामी विवेकानंदांचं पुस्तक वाचत असतो. त्यात एक ओळ असते "जो दूसरों के लिए जिते हैं, वही जीते हैं." हे वाचल्यावर तो चुलीवर भाकरी शेकत असलेल्या आपल्या आईला विचारतो, तू कोणासाठी जगतेस? आईला वडिलांना गुरुजींना सगळ्यांना तो एकच प्रश्न विचारतो. मात्र त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. हे सगळे होत असताना शाळेत रोजच्या हजेरीत नरुचा एक मित्र अनुपस्थित असतो. हरीश त्याचे नाव. गुरुजी नरुच्या हातून निरोप पाठवतात की हरीशच्या आईला शाळेत यायला सांगितले आहे. ज्यावेळी नरु हा निरोप हरीशच्या आईला देतो, तेंव्हा त्याला कळतं, हरीशची परिस्थिती खूप हलाकीची आहे. त्याच्याकडे गणवेश नाही, आणि म्हणूनच त्याला शाळेत येता येत नाहिये. आणि इथेच त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळते. त्याची एकूण परिस्थिती बघून नरुला खूपच वाईट वाटतं. आणि इथूनच प्रवास सुरु होतो हरीशच्या गणवेशासाठी निधी एकत्र करण्याचा. यासाठी नरु काय करतो? हरीशला गणवेश घालून शाळेत येता येतं का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्कीच बघा.
या लघुपटात एकूणच हलाकीची परिस्थिती असलेल्या हरीशचं आणि स्वत: देखील गरीब असलेल्या नरुचं मार्मिक वर्णन करण्यात आलं आहे. असे नाही की नरुची परिस्थिती खूप चांगली. मात्र तरी देखील त्याच्या परीने हरीशला कशी मदत करता येईल आणि यासाठी त्याने केलेले प्रयत्न अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवण्यात आले आहे. लघुपटातील स्थळं, परिस्थिती, गुजरातची झलक, नरुच्या मास्तरांनी त्याला गणवेशासंबंधी दिलेली शिकवण, नरेंद्र मोदींच्या आणि हरीशच्या भूमिकेत असलेल्या बाल कलाकारंच्या डोळ्यातील चमक, त्यांचा अभिनय, सिनेमेटोग्राफी, आणि कथानक सगळंच चान जुळून आलं आहे.
३१ मिनिटांचा हा लघुपट एकदा तरी नक्कीच बघावा असा आहे. काही दृश्य डोळ्यात पाणी आणतात. महावीर जैन आणि भूषण कुमार प्रस्तुत मंगेश हडावळे यांच्या या लघुपटात मुख्यभूमिकेत धैर्य दर्जी याने काम केले आहे.
- निहारिका पोळ