मूर्त्यांची मुद्रा आणि चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018   
Total Views |


 


 
हिंदू उपासना संकल्पनेत, देवी आणि देवता म्हणजे त्यांची वैशिष्ट्ये, गुणवत्ता आणि चेतना अशी श्रद्धा आहे. याच सिद्धांततत्त्वावर आधारित या देवता सर्वव्यापी आहेत म्हणून त्यांची उपस्थिती, मूर्ती आणि प्रतिमेच्या केंद्रस्थानी बिंदू स्वरूपात आहे.
 

क्रोध, संताप, भ्रम, कपट, माया, लालसा, वासना अशा भावना व्यक्त करणारी नरसिंहाची आणि कालिमातेची उग्रमूर्तीमुद्रा आपल्या नक्की लक्षात असेल. काहीशा अशाच वर्णनाची मात्र पूर्ण वेगळ्या भयावह भावमुद्रांची एक मूर्ती प्रत्यक हिंदू देऊळ आणि मंदिराच्या दर्शनी भागात आपले लक्ष निश्चितपणे वेधून घेते. बऱ्याचवेळा अनेक मंदिरांमध्ये गाभाऱ्याच्या वरच्या कमानीवर अथवा दरवाजावर; क्रौर्य, हिंसकवृत्ती, रानटीपणा, अमानुष उग्रता, रक्तपिपासू नजर अशा भावमुद्रांची मूर्ती उपस्थित असतेच. अशा मूर्तीला अथवा शिल्पाला, ‘कीर्तीमुख मुद्रा’ असे संबोधले जाते. दक्षिण भारतातील भव्य मंदिरे, गोपुरे, मंदिरांची तटबंदी, मंदिरातील गर्भगृहाच्या कमानी, गुजरात-राजस्थानातील प्राचीन हवेल्या आणि वास्तू, दिल्ली शहरातील आणि जवळच नव्याने वसलेल्या गुरूग्रामसारख्या आधुनिक शहरातील खाजगी बंगल्यांच्या दर्शनी भागावर अशा सर्वत्र, दर्शकाला या कीर्तीमुखाचे दर्शन निश्चितपणे घडावे, अशी योजना करूनच या मूर्तीला स्थानापन्न केले जाते असे अनुभवता येते.

 

प्राचीन विद्वानांनी, प्रत्यक्षात अचेतन वाटणारी मूर्ती आणि सचेतन (चैतन्यमयी) दर्शक यांचे परस्पर मूक मनोव्यवहार, कीर्तीमुखाच्या अशा चिह्नं आणि चिह्नसंकेताच्या माध्यमातून किती सूक्ष्म योजनेने निर्माण केले आहेत, ते पाहून क्षणभर अचंबा वाटतो. देवळात प्रतिष्ठापना झालेल्या देवी-देवता आणि दर्शनाला आलेल्या भक्ताच्या मधील खरे म्हणजे हा मूक काल्पनिक संवाद. मात्र, तो होतो आहे या कीर्तीमुखाच्या मूर्तीच्या माध्यमातून. देव म्हणतो, “या, माझ्या दर्शनाला आलात. या, तुमचे प्रेमाने स्वागत करतो मी. आत या. अंगणात काही क्षण टेका. श्वास घ्या. मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका आणि मग सभामंडपात या.” देव पुढे म्हणतो, “आज मला जाणवतंय, समाजाला स्पष्ट दिसतंय आणि अर्थात तुमचीच धडपड तुम्हाला नक्कीच माहीत आहे. यश, पैसा, शारीरिक सुखाच्या, ऐहिक, भौतिक, संसारिक गोष्टींच्या मागे धावताना तुम्ही स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे नुकसान करत आहात. याची जाणीव निश्चितच आहे तुम्हाला. अल्प आनंदाचा लोभ, पैशाची लालूच आणि सत्तेचा हव्यास असे सगळे तुमचे दुर्गुण आहेत. ते सर्व मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर काढून ठेवा आणि मग सभामंडपात या... आता माझ्याबरोबर तुमचा आत्मिक प्रवास आणि अध्यात्मिक प्रगती सुरू होईल.”

 

कीर्तीमुखाच्या भयावह मुद्रेच्या माध्यमातून होणारा हा मूक संवाद नक्कीच अशाच संवेदनेचा असतो. यातला चिह्नसंकेत आहे तो, आपल्याच दुर्गुणांचे आपण स्वत:च्या जाणीवांनी ऐकलेले सार्थ वर्णन आणि कीर्तीमुखाची विद्रूप-भयावह मुद्रा यातले भावसंकेतसाम्य. मूर्ती आणि दर्शक यांचे असे मनोव्यापार, दर्शकाचा आत्मशोध आणि अनुभूती हा या चिह्नं आणि चिह्नसंकेताच्या मांडणीचा सूक्ष्मार्थ. मूर्ती-प्रतिमा आणि दर्शक यांच्यामधील मनोव्यापार, यातील आत्मिक प्रगतीचा संदर्भ यासाठी दर्शकाला आवश्यक अशी कौशल्ये, मूर्ती आणि प्रतिमेतील दर्शनी आणि अव्यक्त संकेतमूल्य याचा विचार आणि विस्ताराने चर्चा, तैत्तरीय उपनिषदामध्ये केली गेली. ‘उप + आसन = उपासना,’ याचा शब्दशः अर्थ जवळ बसणे. श्रद्धा, भक्ती, चिंतन, मनन, अभ्यास अशा मनाच्या सर्व व्यापारांसाठी, चित्त आणि वृत्ती यांना एकाचे वेळी चैतन्यप्राप्ती होण्यासाठी, मूर्ती आणि प्रतिमेसमोर केलेली उपासना हे महत्त्वाचे कौशल्य मानले गेले.

 

हिंदू उपासना संकल्पनेत, देवी आणि देवता म्हणजे त्यांची वैशिष्ट्ये, गुणवत्ता आणि चेतना अशी श्रद्धा आहे. याच सिद्धांततत्त्वावर आधारित या देवता सर्वव्यापी आहेत म्हणून त्यांची उपस्थिती, मूर्ती आणि प्रतिमेच्या केंद्रस्थानी बिंदू स्वरूपात आहे. या चेतनास्वरूप उपस्थित असलेल्या देवता सर्वज्ञानी आणि सर्वशक्तिमान आहेत. पूर्णांवशाने हीच, हिंदू उपासना संकल्पनेची मूलभूत बांधणी आहे. योग्य ध्यानधारणेने ज्ञानप्राप्तीसाठी केलेल्या उपासना आणि प्रार्थनेचा अंतिम परिणाम, देवतांच्या या चेतनेद्वारे ज्ञानप्राप्तीमध्ये होतो. उजव्या हातातील मन म्हणजे चित्त आणि डाव्या हातातील बुद्धी म्हणजे वृत्ती, अशी जोडलेल्या हाताची उपासनामुद्रा अथवा प्रार्थनामुद्रा म्हणजे प्राचीन भारतीय शरीरविज्ञान आणि मनोविज्ञानाचा अनोखा अविष्कार आहे. प्रार्थनामुद्रा अथवा उपासनामुद्रेमध्ये आपण जेव्हा दोन्ही हात जोडतो, त्यावेळी आपल्या तळवे आणि बोटांवरील काही संवेदनशील बिंदू आपल्या नकळत हलकेसे दाबले जातात. या संवेदना, श्वासासह श्रावण आणि दृष्टी या इंद्रिय जाणीवांना सतर्क करतात आणि घडणाऱ्या घटनेच्या स्मरणनोंदी सहज अंत:प्रेरणेने सुरु होतात.

 

या प्रार्थनामुद्रेत, शरीर-मन-बुद्धी आणि चेतनेत होणारा फरक, सर्व प्राचीन साहित्यात सूक्ष्म रीतीने अभ्यासून नोंदविला गेला. जोडलेल्या दोन्ही ताळव्यांमुळे त्यावरील संवेदनशील बिंदू हलकेसे दाबले जातात. यामुळे देहसंवेदना म्हणजेच अहंभावना कमी होऊन बुद्धी आणि मनाच्या संवेदनांमध्ये निश्चित वृद्धी होते. समोर दिसणाऱ्या-घडणाऱ्या घटना, ऐकू येणारे संवाद आणि स्वर, स्मरणपटलावर सहज नोंदले जातात. चित्त-वृत्ती केंद्रित झाल्यामुळे अभ्यास करत असलेल्या विषयात प्रगती सिद्ध होते. उपासक आणि दर्शकाच्या प्रार्थनामुद्रेसारख्याच देवतांच्या मूर्तींच्या हस्तमुद्रा सुद्धा वेगवेगळे चिह्नसंकेत देतात. बुद्धाच्या द्विभुज मूर्तींच्या हस्तमुद्रा, चतुर्भुज अथवा जास्त हात असणाऱ्या मूर्तींच्या पुढील दोन हातांच्या मुद्रा नेहमी निरखून पाहाव्या. या हस्तमुद्रांच्या चिह्नसंकेतांच्या अभिव्यक्तीमध्ये आपल्याला वैविध्य दिसेल. या हस्तमुद्राद्वारे उपासक आणि दर्शकाचा, मूर्तींबरोबर संवाद निर्माण होतो. आणि डाव्या हाताची वरदमुद्रा याचा परिचय सर्व दर्शकांना निश्चित आहेच.

 

 
 

श्री गणेशाच्या आणि गौतम बुद्धाच्या उजव्या हातांवरील अभयमुद्रा (चित्र क्रमांक. १) आपल्याला परिचयाची आहेच. सहज एकत्र झालेली, आभाळाप्रती निर्देश करणारी ही हस्तमुद्रा, उपासकाला आणि दर्शकाला निर्भय व्हा असा संकेत देते. तुमच्या शब्दांत-विचारात किंवा कृतीत, कोणाही प्रती दुष्ट-हिंसक-वैर भावना निर्माण होऊ देऊ नका, सौजन्यशील व्हा आणि विश्वबंधुत्व स्वीकारा, असा सल्ला या मूर्तींच्या चिह्नसंकेतांद्वारे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला दिला. याच देवतांच्या डाव्या हाताची वरदमुद्रा (चित्र क्र २) सुद्धा सर्वांच्या निश्चित परिचयाची. सहज एकत्र केलेली बोटे, भूमातेकडे निर्देश करताना देवतेच्या कारुण्य-वात्सल्य अशा निर्मल भावना आणि भक्ताप्रती सहृदयता याचे संकेत व्यक्त करतात.

 

श्री गणेश आणि गौतम बुद्धाच्या विग्रहमूर्तींमध्ये अनेकदा आपल्याला या चिनमुद्रेचे दर्शन होते (चित्र क्र ३). चिन्मय आणि चिन्मात्र हे सर्वज्ञानी-सर्वशक्तीमान देवतेची संबोधने आहेत. साक्षात ज्ञानस्वरूप, चैतन्यरूपी देवतेची ही हस्तमुद्रा म्हणजे तिच्याकडून सतत प्रसारित होणाऱ्या आणि उपासकाला प्राप्त होणाऱ्या शुद्ध ज्ञानसंचयाचे संकेत आहे.

 

देवतांच्या मूर्तीत व्यक्त होणाऱ्या या ध्यानमुद्रा (चित्र क्र ४) दोन प्रकारच्या असतात. हाताचे तळवे एकमेकांवर ठेऊन पद्मासनात ते मांडीवर धरलेली ही पहिली ध्यानमुद्रा. अमूर्त आणि निराकार तत्वाचा अभ्यास करताना ही मुद्रा धारण केली जाते. पद्मासनात हाताचे तळवे चिनमुद्रा धारण करून दोन्ही गुडघ्यावर ठेवून केलीली ही दुसरी ध्यानमुद्रा. स्पष्ट, निश्चित अशा सगुण-साकार तत्वाचा अभ्यास करताना ही दुसरी ध्यानमुद्रा धारण केली जाते.

 

देवतेच्या मूर्तीतील तर्जनीमुद्रा (चित्र क्र. ५) नेहमीच जागरूक आणि सावध राहाण्याचा संकेत देते. तर्जनीमुद्रा धरण करणाऱ्या देवता सहसा करूण-वत्सल अशा भावनांचे संकेत देणाऱ्या पालकत्वाच्या भूमिकेत असतात. वळलेल्या मुठीतील आकाशाकडे निर्देश करणारे चाफेकळीचे अथवा तर्जनीचे एकच बोट हे या मुद्रेचे वैशिष्ट्य आहे. हे बोट कधीही दर्शकाकडे रोखलेले नसते. वळलेल्या मुठीची अशी तर्जनी समजा आपण समोरच्या व्यक्तीकडे रोखली, तर त्याला ही मुद्रा निश्चितच अपमानास्पद वाटेल. याचे मुख्य कारण...आपली तर्जनी अथवा चाफेकळी हे बोट आपल्या स्वतःच्या अहंभावनेचे, अहंकाराचे आणि गर्वाचे प्रतिक मानले जाते. असे रोखलेले तर्जनीचे बोट हे आक्रमक आणि अनेकदा हिंसकवृत्ती लक्षण समजले जाते.

 

आकाशाकडे निर्देश करणाऱ्या या तर्जनीमुद्रेचा मूर्तिशास्त्रानुसार व्यक्त होणारा चिह्नसंकेत विलक्षण आहे. ज्ञानप्राप्तीच्या माध्यमातून तुम्हाला वैयक्तिक प्रगतीचा मार्ग शोधायचा असेल तर तर्जनी या बोटातून व्यक्त होणारा निसर्गदत्त अहंकार, अहंभाव, आक्रमकता या सर्व भावना तुमचे वैगुण्य आहे हे जाणून घ्यावे. हे दोष तुमच्या प्रगतीतील अडसर आहेत. या सर्व दोषांवर तुमचे जाणीवपूर्वक नियंत्रण हवे तरच तुम्हाला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती, निगर्वी-निर्मळवृत्तीने प्राप्त होईल.

 

उपासक आणि दर्शकाच्या, देवतेबरोबर होणाऱ्या नि:शब्द संवादाचे माध्यम म्हणजे ही मूर्ती आणि शरीरमुद्रा-हस्तमुद्रा-आयुधे-वाहने-वाद्य-सजीव यांचेमार्फत मिळणारे तिचे चिह्नसंकेत हे या संवादाची चिरंतन टिकलेली भाषाच आहे. आपल्या विद्वान पूर्वजांचे ऋण कायम स्मरणात राहावे अशी प्रार्थना.

 

7400173637

@@AUTHORINFO_V1@@