भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांचे पत्रपरिषदेत प्रतिपादन
जळगाव, २७ जुलै :
भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणूक स्वत:च्या ताकदीवर लढते. जळगाव मनपाच्या निवडणुकीतही भाजपा ५१ पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, आ.हरिभाऊ जावळे, आ. उन्मेश पाटील, आ.सुरेश भोळे, आ.स्मिताताई वाघ, आ.चंदुभाई पटेल, माजी आ.डॉ.गुरुमुख जगवाणी, जि.प.सभापती पोपटतात्या भोळे, मावळते महापौर ललित कोल्हे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ, किशोर काळकर, करण पवार आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. खा.दानवे यांनी संबोधित करतांना राज्यात सांगली आणि जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होत असून २०१४ नंतर राज्यातील बहुतांश निवडणुकांमध्ये भाजपाने सत्ता काबीज केली आहे. राज्यात ५ हजार ग्रामपंचायत, १३ महानगरपालिका व १० जि.प.वर भाजपाचा झेंडा फडकला आहे. जळगाव आणि सांगली जि.प.मध्येही भाजपाचा झेंडा फडकणार आहे. जळगाव हा भाजपासाठी आदर्श जिल्हा आहे असेही ते म्हणाले.
भाजपा संघटनेच्या बळावर निवडणूक जिंकते. राज्यात संघटनेच्यादृष्टिने १ बुथ-२५ युथ ही मोहीम राबवली आहे. याच बळावर जळगाव मनपाच्या निवडणुकीत भाजपा ५१ पेक्षा अधिक जागा जिंकेल. पक्षाने नवीन व जुने असा मेळ घालून उमेदवारी दिली आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा नाराजांची नाराजी दूर करण्यास स्थानिक नेतृत्त्व सक्षम आहे. राज्य सरकारने मनपाला २५ कोटी दिले पण सत्ताधारी ते खर्च करु शकले नाही. स्थानिक पातळीला युती करण्याचे तसेच स्वबळावर लढण्याचे अधिकार दिले आहेत. भाजपा-सेनेत जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने भाजपा स्वबळावर लढत आहे. नुराकुस्ती करुन निवडणूक जिंकता येत नाही.
मराठा आरक्षणाबाबत भाजपाने आपली भूमिका अगोदरच जाहीर केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाने गेल्यावेळी ५८ मोर्चे शांततेत काढले. आरक्षणासाठी मंत्रिमंडळाने ठराव केला आहे. आमचे सरकार सत्तेत आल्यावर मराठा आरक्षणाबद्दलचा निकाल आला. प्रकरण न्यायप्रविष्ट असूल महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात मागास आयोगाकडे जाणार आहेत. मुख्यमंत्री बदलणार नाही. कोणाच्या बोलण्याने भाजपात निर्णय घेतले जात नाहीत, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.