90's Nostalgia भाग - २ : रंगोली, सुरभी, हम पाँच आणि बरंच काही..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018   
Total Views |

 
90's Nostalgia म्हटलं की अनेक आठवणी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. आता टीव्हीएफ या वेब वाहिनीवर 'ये मेरी फॅमिली' नावाची भन्नाट वेब सीरीज आली जिने 90's च्या सगळ्या आठवणी ताज्या केल्या. काय दिवस होते ते.. गेल्या आठवड्यात आपण कार्टून्सच्या जगात चक्कर मारून आलो, आज आपण पुन्हा एकदा टी.व्हीच्याच मात्र यावेळी सीरीयल्सच्या म्हणजेच मालिकांच्या दुनियेत चक्कर मारून येणार आहोत.
 
90's च्या सुरुवातीला सामान्य मध्यमवर्गीय घरांमध्ये नुकताच टी.व्ही. आला होता. अनेक घरांमध्ये केबल टी.व्ही अजून आलेला नव्हता त्यामुळे त्यांच्याकडे केवळ दूरदर्शनच दिसायचं. हे दूरदर्शन मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांचच लाडकं होतं. या दूरदर्शनवर आलेल्या मालिकांनी अक्षरश: 90'sचा काळ गाजवला. अनेक दिग्गज कलाकारांचं करिअर या 90's ने आणि दूरदर्शनने घडववलं. वागले की दुनिया, नुक्कड अशा कितीतरी मालिका त्याकाळात प्रसिद्ध झाल्या. खरं तर 'वागले की दुनिया' १९८८ मध्ये आले आणि १९९०च्या शेवटी शेवटी संपले देखील मात्र शेवटच्या एकावर्षात या मालिकेला भरगोस प्रतिसाद मिळाला.

 
 
 
केवळ वागले की दुनियाच नाही तर अशा अनेक मालिका आहेत, ज्यांनी आपल्या मनावर एक अमिट असा ठसा उमटवला आहे. .रविवारच्या सकाळची सुरूवात हेमा मालिनी यांच्या 'रंगोली' ने व्हायची आणि नंतर 'महाभारत' मालिका बघत वेळ कसा निघून जायचा कळायचेच नाही. आजच्या 'नागिन आणि ससुराल सिमर का' सारख्या भीषण मालिका बघून त्याकाळच्या मालिका काय दर्जेदार होत्या याची प्रचिती नक्कीच येते. 'रामायण' म्हटले की ते रामानंद सागर यांचे रामायणच आणि महाभारत म्हटले की कृष्ण म्हणजे 'नितीश भारद्वाजच' हे ठरलेले आहे. त्यानंतर इतक्या वेळा रामायण महाभारत मालिकेच्या स्वरूपात आले मात्र आपल्या डोळ्यांसमोरचे राम आणि कृष्ण आजही तेच आहेत. 90's मधले. "छायागीत आणि चित्रहार" ने गाण्यांची जी गोडी लावली, त्याची मजा आजच्या एमटीव्ही, यूटीव्ही मध्ये कुठे येणार?
 
 
 
 
 
 
 
मला 90's म्हटलं की आठंवते ते "ता ना ना नाना नाना ना..." म्हणजेच "मालगुडी डेज". किती साधी सोपी आणि साधारण जीवन शैली होती ना ती.. समस्या नव्हत्या असे नाही, मात्र त्या इतक्या मोठ्या वाटायच्या नाहीत. 'निरागसता' होती. तसेच 'सुरभी' या मालिकेचेही.
 
 
 
या तर झाल्या दूरदर्शनच्या मालिका. त्याशिवाय जेव्हा नवीन नवीन केबल टीव्ही आले त्यावेळी हम पाँच, देखभाई देख या मालिका किती गाजल्या होत्या नाही. हम ५ मधील गाणं म्हणणारी स्वीटी आजही कुठेतरी माझ्यात जीवंत आहे, अनेकदा तिच्या सारखे दार उघडण्याचा मी प्रयत्न केला आहे, आणि आई वडीलांचा ओरडाही खाल्ला आहे. 'देख भाई देख' सारख्या मालिकेने गंमतीशीर पद्धतीने एकत्र कुटुंब पद्धतीची मजा दाखवली. आणि हळुवारपणे या संकल्पनेवर विश्वास पण बसला. श्रीमान श्रीमती आणि तू तू मैं मैं सारख्या मालिका आजही अजरामर आहेत. एकता कपूरच्या सास बहूच्या आधी रीमा लागू आणि सुप्रिया पिळगांवकर ने या भन्नाट सास बहू गाजवल्या आहेत.
 
किती नावे घेऊ मी... हिप हिप हुर्रे माझी आवडती मालिका. त्याकाळात कॉलेजमध्ये असलेल्यांना या मालिकेचे महत्व अधिकच पटेल. 'कपिल शर्मा' च्या कितीतरी आधी "ऑफिस ऑफिस" मधून पंकज कपूरने तर 'द फ्लॉप शो' मधून जसपाल भट्टीने कॉमेडी म्हणजे काय ते लोकांपर्यंत पोहोचविले. तर व्योमकेश बक्षी आणि विक्रम वेताळने कितीतरी आठवणी आपल्याला दिल्या. या मालिकांमुळे विद्या बालन, स्वप्निल जोशी सारखे मोठे मोठे कलाकार सिनेसृष्टीला मिळाले आहेत. 
 
 
 
 
या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या 'शक्तीमान' ला कसे विसरायचे? आजही माझं कुणाशीही भांडण झाले तरी मी "सॉरी शक्तीमान" असेच म्हणते. "गंगाधर ही शक्तीमान है" बापरे किती गाजलेले तेव्हा. असे वाटते कालचीच तर गोष्ट आहे ही. शाळेत शक्तीमानच्या बॅग्स, कंपॉस, पेंसिली आणि काय काय असायचं. असे सगळे असणारा मित्र किंवा मैत्रीण म्हणजे ग्रूप मधील सगळ्यात श्रीमंत मित्र/ मैत्रीण.
 
 
 
 
आजच्या या डीआयडी आणि गाण्यांच्या रिअॅलिटीशोच्या कितीतरी आधी आपल्या देशाला दिग्गज कलाकार देणारे रिअॅलिटी शो म्हणजेच 'सा रे गा मा पा' आणि 'बूगी वूगी' त्यावेळी आले. यामुळे देशाला श्रेया घोषाल, सुनीधी चौहान सारख्या अतिशय प्रतिभावान गायिका तर फुलवा खामकर सारखी एक उत्तम नृत्यांगना देशाला मिळाली. आता सारखा थिल्लरपणा नसून ती कलेची एक साधनाच होती.
 
त्या काळातील मालिकांविषयी माहिती देण्याचा माझा हेतु मुळीच नाही. 'गूगल काका' हे काम नक्कीच करेल. मात्र आजच्या मालिकांमध्ये आपलेपणा नाही, निरागसता त्याहून नाही हे मात्र नक्की. त्यामुळे आपल्या आयुष्याचा एक अमूल्य भाग झालेल्या या 90'sच्या मालिकांच्या आठवणी आपण सगळ्यांच्या हृदयाच्या खूपच जवळच्या आहेत. रविवारची सकाळ त्यावेळी खास असायची कारण हाच एक दिवस सगळ्यांनी एकत्र बसून या मालिका बघण्याचा असायचा. माझी आत्या, आई, आजी एकत्र जेव्हा या मालिका बघत असत त्यावेळी मला घरपण जाणवायचं. यामालिकांमधील घटना, बोलणं, वागणं सगळं आपलंच वाटायचं.
 
पुन्हा कधीतरी त्या मालिका येतील का? पुन्हा कधीतरी पोट दुखवून हसवणारा हम पाँच सारखा एखादा परिवार येईल का? कधीतरी तूतू मैंमैं सारख्या सास बहू भेटतील का? कधीतरी व्योमकेश बक्षी तसाच, त्याच स्वरूपात भेटायला येईल का? आज यूट्यूबवर सर्व काही आहे, मात्र त्याकाळचं वातावरण ते कुठून आणणार? पुन्हा एकदा आपल्याला 90'sच्या आपल्या जुन्या घराच्या जुन्या खोलीच्या जुन्या टी.व्ही. समोर बसून आपल्या त्याच जुन्या परिवारासोबत या मालिका जगता येतील का? पुन्हा... एकदा.... हो केवळ एकदाच?
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@