कालपटलाकडे दृष्टीक्षेप टाकला असता ‘धर्म’ या संकल्पनेबद्दलच्या मतभेदांमधून होणाऱ्या संघर्षाने प्रचंड मोठी मनुष्यहानी घडवून आणल्याचं दिसून येतं. धर्मांची निर्मिती आत्मिक उन्नती, सदाचरण अशा विविध उद्देशांतून झाली खरी पण एखादा धर्म, उपासनापद्धती मानणाऱ्या मनुष्यसमूहांनी ‘आपला धर्म, आपलं आचरण हेच आदर्श' या दृष्टिकोनातून दुसऱ्याला हीन ठरवायला सुरुवात केली. आपली विचारसरणी, जीवनशैली ही दुसऱ्या मनुष्यसमूहावर लादणे आणि ती मान्य नसल्यास त्याला जगण्याचाही अधिकार नाकारणे इथपर्यंत काहींची मजल गेली. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काही ठिकाणी त्याविरुद्ध मोठी प्रतिक्रियाही उमटत गेली आणि यातूनच सुरू राहिला एक अविरत संघर्ष. त्यामुळेच या संघर्षाचं स्वरूप, संघर्षांच्या मुळाशी असणाऱ्या धार्मिक धारणा यांचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांमधील परस्परसंबंध, त्यांच्यादरम्यान झालेली धर्मयुद्धं यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाला आहे. परंतु भारतीय उपखंड आणि आशियाच्या अन्य भागात मोठ्या प्रमाणात अनुसरलेला गेलेला बौद्धधम्म आणि इस्लाम यांच्यातील संबंधांचा तुलनेने अभ्यास कमी प्रमाणात झाला आहे. अफगाणिस्तानातील बामियानमधील बुद्धमूर्ती फोडण्यात आल्यानंतर अभ्यासक श्रीरंग गोडबोले यांना यासंदर्भात अधिक खोलात अभ्यास करण्याची गरज वाटू लागली आणि त्यातूनच प्रस्तुत पुस्तक आकाराला आलं.
भारतातील बौद्ध धम्माचा ऱ्हास
भारत हा अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक संकल्पनांचे, धारणांचे प्रवाह एकाच वेळी अस्तित्वात असणारी भूमी. अनेक विचारांचे समांतर उभे धागे आणि त्याचवेळी सर्वांना छेदून जाणारे खूप सारे सामायिक आडवे धागे यातून एक गुंतागुंतीचं तरीही मजबूत वस्त्र बनलं आहे. यात अनेक पंथ, उपपंथ आहेत. भगवान बुद्ध यांच्या चिंतन आणि चर्चेतून जन्माला आलेलं आणि आता स्वतंत्रपणे धर्म म्हणून अस्तित्व असलेलं बौद्ध तत्वज्ञान याच महावस्त्राचा एक भाग असलं तरी त्याने भारताबाहेरही खूप मोठ्या भूभागावरच्या जनमानसाला मोहित केलं. पश्चिमेला अफगाणिस्तान, उत्तरेला चीन आणि दक्षिणेला श्रीलंकेपासून ते पूर्वेला इंडोनेशिया पर्यंतचा प्रचंड भूभाग एकेकाळी या तत्त्वज्ञानाने व्यापला होता. भारतात सम्राट अशोकापासून अनेक राज्यांचा तो अधिकृत धर्म होता. नालंदा तक्षशीला सारखी विद्यापीठं बौद्ध तत्वज्ञानाची वृद्धी करणारी केंद्रं होती. असं असतानाही यातल्या बऱ्याचशा भूभागावरून या बौद्धधम्माचं अस्तित्व नष्ट होत गेलं. शांतता, अहिंसा यांचा पुरस्कार करणाऱ्या बौद्धधम्माचा ऱ्हास का झाला? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिपादन असं आहे, की इस्लामच्या वावटळीत बौद्धधम्माची पीछेहाट झाली. त्यांच्या या प्रतिपादनाच्या अनुषंगाने अभ्यास करायचा ठरवल्यास या मोठ्या भूभागावरच्या बौद्ध आणि इस्लाम यांच्या संबंधांची चिकित्सा करणं क्रमप्राप्त ठरतं आणि ते काम प्रस्तुत पुस्तक अतिशय खोलात जाऊन करतं. यामध्ये भारतीय उपखंडासोबतच आणि पूर्व आशियातल्या एकेकाळच्या बौद्धबहुल स्थानांचा यात तपशिलाने अभ्यास केलेला आहे.
इ.स.पूर्व २५० पासून लडाखमध्ये बौद्ध परंपरेचा प्रभाव आहे. लडाखमधील बौद्धधम्माचा तिबेटवरही खूप मोठा प्रभाव पडला. या दोन्ही प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्धविचारांचं आदान-प्रदान होत होतं. पण त्याच सुमारास शेजारच्या काश्मीर राज्यामध्ये हिंदूधर्म आणि बौद्धधम्म यांवर आलेलं इस्लामी आक्रमणाचं सावट इ.स १३३० नंतर लडाखवरही आलं आणि सोळाव्या शतकापर्यंत ते राहिलं. अगदी आत्तापर्यंत बिगरमुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण जास्त होतं पण २००१ च्या जनगणनेत लडाखमधील कारगिल आणि लेह या दोन्ही जिल्ह्यांचा विचार करता मुस्लिम बहुसंख्य झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यातून लडाखमध्ये अनेकदा बौद्ध-मुस्लिम उग्र संघर्ष झालेला आहे. पद्धतशीरपणे वाढवल्या गेलेल्या मुस्लिम लोकसंख्येची परिणती आपोआपच राज्यस्तरीय दबावगट निर्माण होण्यात झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरच्या दुजाभावाचे मूळ धार्मिक प्रेरणा आहे हेही स्पष्ट होतं. आजच्या जम्मू-काश्मीर राज्याचा हा तिसरा महत्वाचा हिस्सा. या राज्याचे सत्ताधारी असणाऱ्या काश्मिरी मुस्लिम शासकांकडून बिगरमुस्लिम भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेलेले आहे, ज्यात बौद्धबहुल लडाखचाही समावेश आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार करता जम्मू आणि लडाख महत्वाचे आहेत पण त्यांचं विधिमंडळातील एकूण प्रतिनिधित्वापेक्षाही काश्मीरचे प्रतिनिधी जास्त आहेत. या प्रादेशिक असमतोलामुळे लडाखच्या बौद्ध जनतेमध्ये फार जुनी नाराजी आहे. मुस्लिमबहुल काश्मीरमुळे आपलीही फरफट होते या भावनेतून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा अशी मागणीही केली जात आहे.
भारताबाहेर बौद्ध धम्मावरचे सावट
जी परिस्थिती भारताची तीच भारताबाहेरही आहे. बांगलादेशातील बौद्धांची अतिशय परिस्थिती दारुण आहे. चितगाव पार्वतीय क्षेत्रात पूर्वापार बौद्धांचे प्राबल्य होते. भारताची फाळणी होणार हे कळताच चकमा बौद्धांच्या शिष्टमंडळाने निःसंदिग्धपणे भारतात येण्याची भूमिका घेतली परंतु केवळ या भागातील कर्णफुली नदी हा पूर्व पाकिस्तानसाठी एकमेव जलऊर्जास्रोत आहे या एकमेव कारणाखाली लोकसंख्येच्या प्रमाणाचे सर्व निकष बाजूला धाब्यावर बसून हा प्रदेश पूर्व पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आला आणि तिथल्या बौद्धांचं नष्टचर्य सुरू झालं. १९५० मध्येच त्यांच्यावरचे आणि हिंदूंवरचे अत्याचार एवढे वाढले की पाच लाख लोकांना भारतात निर्वासित म्हणून यावं लागलं. इंग्रजांच्या काळात इथल्या बौद्धांचे स्थान अबाधित राखण्यासाठी ब्रिटिशांनी त्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं होतं ते सगळे कायदे पूर्व पाकिस्तान सरकारने रद्द करत नेले. पूर्व बंगालच्या अन्य प्रांतातून मुस्लिम लोकसंख्या जाणीवपूर्वक चितगाव प्रांतात आणून वसवली गेली. बौद्धांच्या जमिनी बळकावल्या गेल्या. इतकंच नाही तर भारताची मदत घेऊन स्वतंत्र बांगलादेश निर्मितीत मोठा वाटा उचलणाऱ्या मुजीब-उर-रेहमानच्या काळातही अवामी लीगच्या सशस्त्र दलातील बांगलादेशी मुस्लिमांनी कृतघ्नपणे बौद्धांवर अत्याचार केले. १९८० ते ८६ दरम्यानच्या बांगलादेशी मुस्लिमांच्या क्रौर्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. त्यांनी बौद्धविहारांचा विध्वंस केला,. बौद्ध अनाथालायला लावलेल्या आगीत अनेक बालकं होरपळून मरण पावली. १९८० ते १९९३ या काळात तब्बल ५४,००० चकमा बौद्ध निर्वासित म्हणून भारताच्या आश्रयाला आले.
लडाख, चितगाव या प्रांतांशिवाय पुस्तकात थायलंडमध्ये डोकं वर काढणारा मुस्लिम फुटीरतावाद, म्यानमारमधील रोहिंग्यांचा प्रश्न यांचाही पुस्तकात समावेश आहे. हे पुस्तक २००९ मध्ये प्रकाशित झालं आहे तेव्हाच रोहिंग्यांच्या प्रश्नाची झळ बसू लागलेली होती आणि आता त्या प्रश्नाने धारण केलेलं उग्र रूप आणि भारतासमोर उभे केलेले प्रश्न पाहता या पुस्तकात करून दिलेली धोक्याची जाणीव किती महत्वाची होती हे लक्षात येतं.
छोटं पुस्तक, मोठा आवाका
उण्यापुऱ्या दीडशे पानांच्या या पुस्तकात चार प्रमुख भूभागांमध्ये बौद्धधम्म व इस्लाम कसे रुजले, वाढले, लढले याचा इतिहास, संघर्षाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राजवटींचा आढावा, या दोन्ही धर्मांच्या धार्मिक संघटनांच्या भूमिका, दोन्ही धर्माच्या अनुयायांची इतिहास आणि वर्तमान या दोन्ही काळातील आकडेवारी असा विस्तृत परामर्श घेतला गेलेला आहे. त्यालाच जोड मिळाली आहे ती पुस्तकाच्या सुरुवातीला येणाऱ्या बौद्ध आणि इस्लामी पारिभाषिक शब्दांच्या सूचींची. दोन्ही धर्मांमधल्या महत्वाच्या संकल्पना जाणून घ्यायला यामुळे मदत होते. पुस्तकाच्या शेवटी असणारी साठहून अधिक संदर्भग्रंथांची यादी बघताना हे पुस्तकही एक संदर्भग्रंथ म्हणून महत्वाचं आहे हे जाणवतं.
दोन अतिशय भिन्न पार्श्वभूमीतून आलेल्या धर्मांमध्ये एकवाक्यता नसणं तसं स्वाभाविकच, परंतु त्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये वितुष्ट येणं आणि त्यातून एका धर्मियांकडून दुसऱ्या धर्मियांचं पद्धतशीरपणे उच्चाटन करणे हे धोकादायक आहे. यासाठीच दोन्ही धर्मांच्या काही मूलभूत धारणा पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात दिल्या आहेत. इस्लामची एकेश्वरवादावर, ईश्वराच्या अमूर्त असण्यावरची श्रद्धा, मूर्तीपूजा आणि पर्यायाने मूर्तीपूजकांना असणारा विरोध (आणि त्यांना श्रद्धाहीन ठरवणं) , दार-उल-हर्ब (युद्धाचा प्रदेश)चे दार-उल-इस्लाम (इस्लामचा प्रदेश)मध्ये रुपांतर करण्यासाठी श्रद्धाहीनांविरुद्ध निरंतर जिहाद पुकारणे अशी शिकवणूक या गोष्टी लक्षात घेतल्या तर ‘मनुष्याचे मोठेपण किंवा लहानपण विशिष्ट ईश्वर अथवा प्रेषितावरील श्रद्धेवर अवलंबून नसून कर्मावर अवलंबून असते’ असे मानणाऱ्या तसेच ‘धम्मग्रंथ दैवीप्रेरणेमुळे अस्तित्वात आले’ असे न मानणाऱ्या बौद्धधम्माविरुद्ध इस्लामच्या अनुयायांनी लढा का उभारला हे लक्षात येते.
इस्लामच्या अभ्यासाचा अभाव
दुर्दैवाने बौद्धधम्मावरच्या या दुष्टचक्राचा बाबासाहेब आंबेडकर वगळता कुणाही बौद्ध अभ्यासकाने मुळापासून अभ्यास केला नाही याबद्दल गोडबोले निराशा व्यक्त करतात. बांगलादेशामधील बौद्धांच्या वंशविच्छेदानंतरही एखादा अपवाद वगळता भारतातील बौद्ध नेत्यांनी मूग गिळून बसणे हे उदाहरण पुरेसे बोलके आहे (अलीकडे ऐकू येत असणारे ‘भीम - मीम (MIM)’ एकतेचे नारे ऐकतो तेव्हा गोडबोलेंचं निरीक्षणच अधोरेखित होतं).
पुस्तक संपताना येणारं गोडबोलेंचं भाष्य विचारप्रवण करणारं आहे. ते म्हणतात, “मुस्लिमांच्या मानस आणि व्यवहारावर इस्लामी तत्वज्ञानाचा पगडा असल्यामुळे बौद्ध-मुस्लिम संबंधांचा अन्वयार्थ लावण्यासाठी इस्लामी धर्मशास्त्र समजून घेणे अनिवार्य आहे. पूर्वी अफगाणिस्तान, पूर्व इराण, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान इ. ठिकाणी बौद्धधम्म प्रचलित होता. इस्लामच्या अनुयायांनी तेथे बौद्धधम्माचा नायनाट केल्यामुळे आज तेथे बौद्ध-मुस्लिम संबंधांचा वर्तमान संदर्भात विचार करणे शक्य नाही. लडाख, चितगाव, थायलंड, म्यानमार या भागातील बौद्धांनी इस्लाम समजून घेतला नाही, त्यानुसार स्वतःची अस्मिता आणि अस्तित्व टिकवण्यासाठी वेळीच उपाय योजले नाहीत तर काही दशकांनंतर तेथेही बौद्ध-मुस्लिम संबंधांचा विचार भूतकाळाच्या संदर्भात करावा लागेल”
****
बौद्ध - मुस्लिम संबंध : आजच्या संदर्भात
लेखक : डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले
प्रकाशक : तक्षशिला प्रबोधिनी, गडचिरोली
आवृत्ती : पहिली (बुद्ध पौर्णिमा, ९ मे २००९)
पृष्ठसंख्या : १४४
मूल्य : ५० रू.