रोजावाची सनद - सामाजिक करार- भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018   
Total Views |


 

 
रोजावाला सीरियापासून फुटून निघायचे नसेल तर त्यांनी स्वत:चा वेगळा ध्वज का ठेवला आहे? त्यांना याद्वारे विशेष अधिकार हवेत किंवा वेगळे आहोत, असे सूचित करायचे आहे का? कदाचित या शंका दूर व्हाव्यात म्हणूनच लगेच पुढच्या अनुच्छेद १२ मध्ये हा ‘’स्वायत्त प्रदेश सीरियाचा अविभाज्य भाग आहे. हे सीरियामधील भविष्यातील विकेंद्रित सांघिक शासनप्रणालीचा आदर्श असेल,” असे नमूद केले असावे.

 

सर्वसामान्य तत्त्वे याअंतर्गत १२ अनुच्छेद आहेत. अनुच्छेद १ ते ३ खालीलप्रमाणे-

 

अनुच्छेद १

 

अफ्रिन, कोबान व जझिरा या स्वायत्त प्रदेशाची ही सनद (यापुढे ’सनद’ असा उल्लेख केला जाईल) म्हणजे स्वायत्त प्रदेशातील जनतेदरम्यानचा नूतनीकरण केलेला सामाजिक करार आहे. प्रस्तावना हा सनदेचा अविभाज्य भाग आहे.

 

अनुच्छेद २

 

) स्वायत्त प्रदेशातील अधिकार जनतेमधून उत्पन्न होऊन जनतेकडेच राहतील. लोकप्रिय मतांनी निवडलेल्या शासकीय परिषदा आणि सार्वजनिक संस्था त्याचा उपयोग करतील.

 

) मुक्त समाजासाठी आवश्यक लोकशाही तत्त्वांवर स्थापन केलेल्या सर्व शासकीय परिषदा आणि सार्वजनिक संस्थांच्या कायदेशीरपणाचा एकमेव स्रोत जनता हीच असेल.

 

अनुच्छेद ३

 

) सीरिया हे विकेंद्रीकरण आणि बहुविधता या तत्त्वावर आधारित संसदीय प्रणाली शासन असून स्वतंत्र, सार्वभौम व लोकशाही राज्य आहे.

 

) अफ्रिन, कोबान व जझिरा या तीन परगण्यांचा मिळून बनलेला हा स्वायत्त प्रदेश सीरियन क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे.

 

प्रत्येक परगण्याचे प्रशासकीय केंद्र

 

अफ्रिन परगण्यातील अफ्रिन शहर.

 

जझिरा परगण्यातील क्वामिशी शहर.

 

कोबान परगण्यातील कोबान शहर.

 

) जझिरा परगण्यात वांशिक व धार्मिक वैविध्य असून कुर्द, अरब, सीरियॅक, चेचेन, अर्मेनिअन, मुस्लीम, ख्रिश्चन व याझिदी समूहांमध्ये बंधुता व शांततापूर्ण सहजीवन आहे. निवडून आलेली विधानसभा स्वायत्त प्रदेशातील सर्व तिन्ही परगण्यांचे प्रतिनिधित्व करते.

 

 
 

मागील लेखात उल्लेखिलेली प्रस्तावना अनुच्छेद १ अनुसार सनदेचा अविभाज्य भाग आहे. लोकशाही तत्त्वांनुसार लोकशाहीचे अधिकार जनतेमधूनच उत्पन्न होतील व जनतेकडेच राहतील आणि त्या अधिकारांवरच ही लोकशाही शासनव्यवस्था कार्यरत राहील. अनुच्छेद ३ मध्ये सीरियाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व मान्य करून अप्रत्यक्षपणे सीरियाचे अखंडत्व मान्य केले आहे व ‘रोजावा’ हा सीरियाचा अविभाज्य भाग असल्याचेही सांगितले आहे. म्हणजे ओकलान व रोजावातील कुर्द सीरियापासून आम्हाला फुटून निघायचे नाही, असे नुसतं सांगत नाहीत, तर रोजावाच्या सनदेमध्येही तसे स्पष्टपणे मांडत आहेत.

 

तीनपैकी एका म्हणजे जझिरा परगण्यात वांशिक व धार्मिक विविधता आहे. तेथे कुर्द, अरब, सीरियॅक, चेचेन, अर्मेनियन हे वंश व मुस्लीम, ख्रिश्चन व याझिदी हे धर्म नांदत आहेत. या वैविध्यपूर्ण वांशिक व धार्मिकांचे शांततापूर्ण सहजीवन शक्य आहे का, यावर खरंतर रोजावा क्रांतीचा यशस्वीपणा अवलंबून आहे. येथील धार्मिक व वांशिकता खूप गुंतागुंतीची आहे. येथील कुर्दवंशीय हे इस्लाम, ख्रिश्चन व याझिदी धर्माचे आहेत. अरब व चेचेन वंशीय इस्लामधर्मीय आहेत (जगात अरब वंशीय हे मुख्यत्वे इस्लामधर्मीय असले तरी काही अरब वंशीय ख्रिश्चन, ड्रुझ व बहाई धर्मीयही आहेत, तर काही चेचेन वंशीय ख्रिश्चनही धर्माचेही आहेत.) अर्मेनियन वंशीय हे ख्रिश्चन धर्माचे आहेत. म्हणजे मुख्यत्वे इस्लाम धर्मीय हे कुर्द, अरब, चेचेन वंशीय आहेत, तर ख्रिश्चन धर्मीय हे कुर्द व अर्मेनियन वंशाचे आहेत. याझिदी धर्मीय कुर्द वंशाचे असले तरी काहींच्या मते याझिदी हाच एक वेगळा विशिष्ट वंश आहे.

 

जझिरा परगण्याची वांशिक व धार्मिक विविधता लक्षात घेता अनुच्छेद ९ मध्ये जझिरा परगण्याची अधिकृत भाषा कुर्दिश, अरेबिक व सीरियॅक असल्याचे नमूद केले आहे. तसेच सर्व समूहांना मूळ भाषा शिकवण्याचा व शिक्षित होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुर्दबहुल प्रदेश असूनही कुर्दिश भाषेची सक्ती केलेली नाही, हे गोष्ट उल्लेखनीय आहे.

 

प्रत्येक परगण्यातील प्रशासकीय केंद्र अनुच्छेद ३ व तेच अनुच्छेद ४ मध्ये दिले आहेत. अनुच्छेद ८ मध्ये परगण्यांना मुक्तपणे त्यांचे प्रतिनिधी व प्रतिनिधी मंडळ निवडण्याचा अधिकार दिला आहे.

 

रोजावातील शासनाची रचना हा शासनव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अनुच्छेद ४ अनुसार त्याची रचना खालीलप्रमाणे आहे-

 

) विधानसभा

 

) कार्यकारी मंडळे

 

) निवडणूक उच्च आयोग

 

) सर्वोच्च घटनात्मक न्यायालय

 

) नगरपालिका / प्रांतिक परिषदा

 

निर्बंध व अधिकार आणि दायित्वाच्या दृष्टीने सर्व व्यक्ती आणि समूहांना अनुच्छेद ६ मध्ये समानता प्रदान केलेली आहे. रोजावाचा हा शासनप्रयोग जरी कुर्दप्रणित असला तरी त्यात कोठेही कुर्दवर्चस्व किंवा कुर्दांना विशेषाधिकार नाहीत. सर्व व्यक्ती व समूहांना समान अधिकार व सर्वांचे शासनव्यवस्थेप्रती समान दायित्व.

 

अनुच्छेद ११ अनुसार स्वायत्त प्रदेशांना स्वत:चा ध्वज, प्रतिक व गान प्रस्तुत करण्याचे अधिकार दिले आहेत. अशी चिन्ह निर्बंधात नमूद करावीत. आता काहींचा यावर असा आक्षेप असू शकेल की, जर रोजावाला सीरियापासून फुटून निघायचे नसेल तर त्यांनी स्वत:चा वेगळा ध्वज का ठेवला आहे? त्यांना याद्वारे विशेष अधिकार हवेत किंवा वेगळे आहोत, असे सूचित करायचे आहे का? कदाचित या शंका दूर व्हाव्यात म्हणूनच लगेच पुढच्या अनुच्छेद १२ मध्ये हा ‘’स्वायत्त प्रदेश सीरियाचा अविभाज्य भाग आहे. हे सीरियामधील भविष्यातील विकेंद्रित सांघिक शासनप्रणालीचा आदर्श असेल,” असे नमूद केले असावे. यावरून असे जाणवते की, आम्ही वेगळे आहोत, असे रोजावाला दर्शवायचे नसून आम्ही एक वेगळी शासनव्यवस्था राबवत आहोत, असे दर्शवायचे आहे. ‘आम्ही वेगळे आहोत,’ असे म्हणणे व ‘आमची शासनव्यवस्था वेगळी आहे,’ असे म्हणणे यात फरक आहे. ‘आम्ही वेगळे आहोत’ यात ‘आम्ही’ म्हणजे शक्यतो एक जात, पंथ, धर्म, वंश यावर आधारित समूह, असा बोध होतो, तर वेगळी शासनव्यवस्था म्हणजे एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील विविध लोक ज्याला राज्य, राष्ट्र किंवा देश म्हणता येईल, त्यांची असणारी शासनव्यवस्था. जसे अध्यक्षीय किंवा संघराज्य लोकशाही शासनव्यवस्था किंवा कम्युनिस्ट, साम्यवादी, मार्क्सवादी, माओवादी शासनव्यवस्था, त्याप्रमाणेच ही रोजावातील म्हणजे विशिष्ट प्रदेशातील वेगळी शासनव्यवस्था, ज्याला ते ‘लोकशाही संघवाद’ म्हणतात. ही शासनव्यवस्था कुर्दबहुल भागात असली तरी कुर्द वंशावर आधारित नाही, त्या प्रदेशातील विविध धर्म, पंथ व भाषकांना ती सामावून घेते. साम्यवादी शासनव्यवस्थेत आढळून येणारी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी येथे दिसून येत नाही, पण तरीही वेगळा ध्वज, प्रतिक व गान हा वेगळेपणा काही प्रमाणात अस्मिता जागृत (मग ती शासनव्यवस्थेवर आधारित का असेना) करू शकतो. त्यामुळे सीरियाची शासनव्यवस्था रोजावापेक्षा वेगळी असल्यामुळे सीरिया देशाशी एकरूप होण्यास ही अस्मिता बाधा निर्माण करू शकते. रोजावाची मूलभूत तत्त्वे व अधिकार याविषयी पुढील लेखात जाणून घेऊ.

@@AUTHORINFO_V1@@