तीरुवातावरूर पुराणम, शिवज्ञानबोधम, तीरुकुट्टू दर्शन, तिरूमंत्रम, उन्मयी विलक्कम अशा नवव्या शतकापासून लिहिल्या गेलेल्या अनेक तामिळ संहिता शिवाच्या नटराज नृत्याचे सविस्तर वर्णन करतात. त्यामागील चिह्नसंकेतांचे स्पष्टीकरण देतात. नटराजाचे हे चार हात, प्रत्येक सजीवाची मूलतत्वे किंवा मूळ घटकांची प्रतीके आहेत.
शिवाच्या या नटराज मुद्रेतील नादांतनृत्यातून, महादेवाने या विश्वासाठी योजलेली पाच मूलभूत तत्वे व्यक्त होतात. तसेच यामधून ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तींची संकल्पना स्पष्ट होते. यातले पहिले मूलभूत तत्व- ‘सृष्टी’, म्हणजेच ब्रह्मदेवाने केलेली सृष्टीची निर्मिती-उत्क्रांती-विकास. दुसरे तत्व - श्री विष्णूंचे ‘स्थिती’ तत्व, म्हणजेच या निर्माण झालेल्या सृष्टीचे पालन आणि आधार. तिसरे रुद्राचे तत्व, सृष्टीचा संहार आणि पुनर्निर्मिती. महेश्वराचे चौथे तत्व- तीरोभाव, म्हणजे निर्गुण-निराकार स्वरूप दर्शन आणि भ्रम. सदाशिवाचे पाचवे तत्व- अनुग्रह म्हणजे कृपाछत्र, समस्यांचे निवारण आणि अंतिम मुक्ती. महादेवाच्या म्हणजेच शिवाच्या पाच वैश्विक कार्यकक्षा नटराजाच्या नादांतनृत्य मुद्रेत शिल्पबद्ध झाल्या आहेत.
चिदंबरम देवालयाच्या चार गोपुरांमध्ये महादेवाच्या भरतनाट्यम शैलीतील १०८ शिल्पे भिंतीवर कोरलेली आहेत. मात्र, यात नटराज नृत्यमुद्रा अंकित झालेली नाही. देवालयाच्या मुख्य गाभाऱ्यातच नटराजाची ही मूर्ती स्थापन केलेली आहे. तामिळनाडूमध्ये शिवाच्या या पंचकृत्य नृत्याशी निगडीत पाच देवालयांची स्थाने महत्त्वाची मानली गेली आहेत. चिदंबरम देवालयातील कनकसभा, मदुराई देवालयातील रजतसभा, तिरुवलंगडू देवालयातील रत्नसभा, तिरुनवेल्ली देवालयातील ताम्रसभा आणि कुत्रालम देवालयातील चित्रसभा अशी ही पाच सभागृह. तीरुवातावरूर पुराणम, शिवज्ञानबोधम, तीरुकुट्टू दर्शन, तिरूमंत्रम, उन्मयी विलक्कम अशा नवव्या शतकापासून लिहिल्या गेलेल्या अनेक तामिळ संहिता शिवाच्या नटराज नृत्याचे सविस्तर वर्णन करतात. त्यामागील चिह्नसंकेतांचे स्पष्टीकरण देतात. नटराजाचे हे चार हात, प्रत्येक सजीवाची मूलतत्वे किंवा मूळ घटकांची प्रतीके आहेत.
शिवाने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याखाली मुयालक या मायावी ठेंगू असुराला दाबून धरले आहे. नृत्याच्या सुरुवातीलाच मानवाचे अज्ञान आपण नष्ट करीत असल्याचे संकेत उजव्या पायाच्या या मुद्रेत भगवान शिव देते आहेत. हा असुर मानवाच्या अज्ञानाचे प्रतिक आहे. या मायावी असुराच्या हातात एक जहरी सर्प आहे. जो मानवाच्या विषयवासना आणि दुष्ट-संहारक प्रवृत्तींचे आणि विचारांचे प्रतिक आहे. तो असुर मायावी आहे. कारण तो मानवाच्या मनातील अशाच अज्ञान आणि अदृष्य मायावी दुष्ट भावनांचे प्रतिक आहे आणि वैश्विक ज्ञानसंचयासमोर हे अज्ञान किती क्षुद्र आहे, ते त्याच्या ठेंगूपणाच्या संकेतातून दर्शकाला जाणवते.
शिवाचा अर्थात नटराजाचा उंच उचलून धरलेला डावा पाय, त्यानेच निर्माण केलेल्या सृष्टीचा योग्य परिचय करून देतो. मानवी सद्भावनांचे महत्त्व आणि त्यानेच रचलेली निर्मिती आणि लय ही तत्व समजावून सांगतो. डाव्या हाताने शरीराच्या मृत्यूपेक्षा अज्ञान आणि दुष्ट-संहारक विचारांचा आणि अहंकाराचा मृत्यू आणि त्यांचे नवजीवन किती महत्त्वाचे आहे, त्याकडे म्हणजे मायावी असुराच्या निर्जीव शरीराकडे अंगुलीदर्शन करतो. शिवाचा अभयमुद्रेतील उजवा हात, ‘जीवनातील सत्य स्वीकारा, घाबरू नका,’ असा आश्वासक संकेत देतो. पुढचे दोन्ही हात देत असलेले चिह्नसंकेत सामान्य मानवी बुद्धीलाही आकलन होऊ शकतात. वरवर पाहता बुद्धिभ्रम करणारी शिवाच्या वरच्या दोन हातातील चिह्न आणि त्यांचे चिह्नसंकेत फार सखोल आहेत. त्यातील संकेतमूल्य फार समृद्ध आहेत. याच प्राचीन मूर्तिशास्त्र संकेतानुसार चार हातांपैकी वरचे दोन हात हे देवतेच्या सार्वभौम वैश्विक ज्ञानसंचयाचे प्रतिक मानले जातात आणि अशा मूर्ती आणि प्रतिमांच्या माध्यमातून दर्शकाला ज्ञानसंपन्न करत असतात.
नटराजाचा डमरू धारण केलेला वरचा उजवा हात निसर्गातील शिव म्हणजेच पुरुषतत्व आहे आणि तो सजीवाच्या चेतना-ज्ञान-बुद्धी यांचे नियंत्रण करतो; म्हणून नटराजाच्या उजव्या कानात पुरुषाची कर्णभूषणे आहेत. उजव्या हातातील डमरू हा विश्वाच्या निर्मितीच्या क्षणी केलेला ‘प्रथम नाद’ याचे संकेत देतो आणि सृष्टीतील प्रत्येक सजीवाला चेतना-ज्ञान-बुद्धी स्वीकारण्यासाठी जागृत करतो. नटराजाच्या डाव्या वरच्या हातात अग्निशिखा आहे. त्याचा हा हात निसर्गतील शक्तितत्व म्हणजे स्त्रीतत्व आहे. जे निसर्गातील निर्मितीचे प्रतिक आहे आणि सजीवाच्या मनाचे नियंत्रण करते. म्हणूनच नटराजाच्या डाव्या कानात स्त्रीची कर्णभूषणे आहेत. या हातातील अग्निशिखा मनातील अज्ञान आणि संहारक विचार अग्नीच्या स्वाधीन करून नष्ट करते आणि सजीवाचा पुनर्जन्म झाल्याचे संकेत देते. संपूर्ण नृत्यमुद्रेच्या भोवती असलेली अग्निशिखांची प्रभावळ ही शुद्धता आणि पावित्र्याचे संकेत देते.
नटराजाच्या या सुंदर प्राचीन शिल्पांची विज्ञाननिष्ठ भूमितीय रचना आपल्याला अचंबित करते. शिव आणि शक्तितत्व अर्थात सृष्टीतील पुरुष आणि स्त्री तत्वांचे उत्तम संतुलन आणि समतोल या शिल्पाच्या रचनेत केले आहे. यालाच प्राचीन भारतीय मूर्तिकलेत ‘भूमितीय तांत्रिक मंडल’ असे संबोधित केले जाते. भारतातील महादेवाच्या प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारात दगडात घडवलेले हे प्राचीन भारतीय षटकोनी तांत्रिक मंडल आपले स्वागत करते (चित्र क्रमांक १). इस्रायल या राष्ट्राच्या ध्वजावर अंकित असलेल्या या चिन्हाला ‘Six pointed star’ अर्थात ‘Star of David’ असे संबोधित केले जाते.
नटराजाची नृत्यमुद्रा म्हणजेच एकावर एक असे रचलेले उलटसुलट दोन त्रिकोण अशा रचनेचे एक संपूर्ण भूमितीयचिह्न आहे. डोके आणि नृत्याच्या आवेगात लहरणाऱ्या वस्त्राच्या विरुद्ध दिशेला उंचावलेला डावा पाय हे भूमितीय बिंदू जोडून, शिवतत्व म्हणजेच शीर्ष वर असलेल्या सुलट त्रिकोणाचा संकेत आहे. उजवा पाय आणि उंचावलेले वरचे दोन्ही हात हे बिंदू जोडले की शक्तितत्व म्हणजेच स्त्रीतत्वाचा अर्थात शीर्ष खालील बाजूला असलेल्या उलट त्रिकोणाचा संकेत आहे.
चित्र क्रमांक २ मध्ये, सुंदर नृत्यमुद्रेत एक स्त्री नर्तकी आणि एक पुरुष नर्तक अशा संपूर्ण शिवशक्तीमय भूमितीय तांत्रिक मंडलाची नृत्यमुद्रा सादर करताना दिसतात. शीर्ष खाली असलेला त्रिकोण भौतिक तत्व, ऊर्जा आणि चैतन्य, सहजबोध आणि अंत:ज्ञान, शक्ती, जाणीवा आणि निर्मितीक्षमता अशा सर्व मानवी भावना-क्षमता-विचारांचे नियंत्रण करतो. ही सर्व एकत्र ऊर्जा निर्माण करतात म्हणून नटराजाच्या अग्निशिखांचे संकेत आहेत. मात्र, ही ऊर्जा नियंत्रणात ठेवता आली नाही, तर ती संहारक होते आणि संहार करून ती ऊर्जा पुन्हा नटराजाच्या उजव्या हातातील डमरूपर्यंत पोहोचते. शिव आणि शक्ती या दोन्ही तत्वांच्या अद्वैताचे आणि आपल्या दैनंदिन जीवनचक्राचे हे विलक्षण संकेत.
उलटसुलट दोन त्रिकोण अशा रचनेचे एक संपूर्ण भूमितीयचिह्न आहे असे वर्णन करताना, या तांत्रिक मंडलाचे भूमितीय रचनेचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. उभारलेले दोन्ही हात, उंचावलेला डावा पाय आणि विरुद्ध दिशेने हवेत उडणारे वस्त्र हे चार बिंदू एका समभूज चौकोनाची रचना करतात. चार दिशांचे हे चार बिंदू, या शिल्पाचे आकलन होण्यास मदत करतात कारण समभूज चौकोन हा भौतिक जगाचे अर्थात भूमीचे म्हणजे निर्मितीक्षम शक्तीचे प्रतिक आहे. वास्तव, भौतिक जीवनातील परस्पर अवलंबून असलेल्या निर्मिती आणि संहार अर्थात भारतीय हिंदू संस्कृतीतील कर्म आणि धर्म यांचे हे सुंदर-स्पष्ट-सूक्ष्म संकेत.
नटराजाचे डोके, उंचावलेले दोन्ही हात आणि नाभी असे चार बिंदू जोडले की पहिल्या हिऱ्याची रचना होते. उडणारे वस्त्र, दोन्ही पाय आणि नाभी असे चार बिंदू जोडले की दुसऱ्या हिऱ्याची रचना होते. दुसऱ्या हिऱ्यातील आपल्या पायाखालची जमीन आपले अस्तित्व दाखवते. पहिल्या हिऱ्यातील डोके आणि हात यातून आपले जीवन संपन्न झाल्याचे संकेत मिळतात. नाभीमधून जोडलेल्या या दोन्ही हिरे निर्मिती-स्थिती-लय अशा नियमित निसर्गचक्राचे संकेत देतात.
नटराजाचे डोके, उंचावलेले दोन्ही हात, उंचावलेला डावा पाय आणि विरुद्ध दिशेचे वस्त्र हे पाच बिंदू एका सुंदर पंचकोनाची रचना करतात. शिवाच्या पंचकर्म व्यवस्थेचे हे स्पष्ट संकेत. नटराजाच्या या नादांतनृत्य मुद्रेत पाचही पंचमहाभूतांची प्रतीकात्मक उपस्थिती आहे. त्याच्या गळ्यातील सर्प हे पृथ्वीचे प्रतिक, माथ्यावरून वाहणारी गंगा ही जलाचे प्रतिक, डमरूचा नाद आणि उडणारे वस्त्र हे वाऱ्याचे प्रतिक तर डाव्या हातातील अग्निशिखा हे अग्नीचे प्रतिक. अग्निशिखांनी समृद्ध प्रभावळ हे तेजाचे प्रतिक. चित्र क्र. ४ मध्ये या सर्व भूमितीय कोनांची रचना स्पष्ट पाहता येते. नटराजाच्या अशा विलक्षण ‘भूमितीय शिल्पांची रचना आणि निर्मिती’ करणाऱ्या आपल्या विद्वान पूर्वजांचा अभिमान वाटतो.
7400173637