हिमा दास : 'धान'च्या शेताने दिले देशाला नवीन 'धन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018   
Total Views |

 
नशीब ज्यांना सगळ्या सुख सुविधा देतं, त्यांच्या जिंकण्याची आपण अपेक्षा करतोच मात्र शेती आणि शेतकरी सारख्या पार्श्वभूमीतून आलेल्या कन्या जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव मोठे करतात, त्यावेळी हा आनंद द्विगुणित होतो. हिमा दास या कन्यारत्नांपैकीच एक आहे. फिनलँड येथील टेम्पेयर शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या अंडर - २० एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत हिमा दासने प्रथम क्रमांक पटकावत या खेळात भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
 
 
 
 
 
"सुरुवातीला ती निश्चितच हळू धावत होती मात्र मला विश्वास होता ती हे पदक नक्कीच मिळवेल." असे गौरवोद्गार हिमा दासच्या प्रशिक्षकांनी म्हणजेच 'निपुण दास' यांनी काढले. हिमाने ४०० मीटर ची ही स्पर्धा अवघ्या ५१.४६ सेकंदात पूर्ण केली. हिमा दास केवळ १८ वर्षांची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे अनेक खेळाडू ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते, अखेर हिमा दास हिने भारताचे अनेक वर्षांचे हे स्वप्न पूर्ण केले.
 
 
 
 
 
 
छोट्या गावातील कन्येची मोठी कामगिरी  :  
 
 
तिने हे यश मिळवले ही आनंदाचीच बाब आहे मात्र या यशापेक्षाही जास्त महत्वाची बाब म्हणजे हे यश तिने कशा पद्धतीने प्राप्त केले आहे. हिमा दास आसामच्या गुवहाटी येथील नागाव या एका छोट्या गावाची रहिवासी आहे. जोमाली आणि रणजीत दास यांच्या ६ अपत्यांपैकी हिमा ही सगळ्यात धाकटी. लहानपणी हिमा तिच्या गावातील 'धान' म्हणजेच तांदुळाच्या शेतांमध्ये पाण्यात आणि चिखलात फुटबॉल खेळायची. कदाचित तेव्हा पासूनच क्रीडा क्षेत्राकडे तिला ओढ असणार. त्यानंतर तिची भेट झाली निपुण दास यांच्याशी. त्यांनीच हिमा मधील प्रतिभेला ओळखले आणि तिला क्रीडा क्षेत्रातच पुढे जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी तिला गुवहाटी येथे राहण्यास सांगितले आणि तिला तिथेच प्रशिक्षण देण्याचे ठरवले. आधी तिच्या आई वडीलांनी नकार दिला मात्र निपुण दास यांनी समजावल्यानंतर त्यांनी हिमाच्या गुवहाटीला जाण्यास होकार दिला.
 
हिमाचे प्रशिक्षण गुवहाटी येथेच झाले. ती मुष्टीयुद्ध आणि फुटबॉलमध्ये देखील निपुण आहे. अथक परिश्रमानंतर आज हिमाने हे यश मिळवले आहे. याआधी हिमाने कॉमनवेल्थ खेळांमध्ये देखील भाग घेतला होता ४०० आणि २०० मीटत शर्यतीत ती अंतिम फेरीपर्यंत देखील गेली मात्र अंतिम फेरीत ती सहाव्या क्रमांकावर आली. त्यानंतर देशासाठी सुवर्णपदक मिळवायचेच हा ध्यास मनी धरत तिने आणि तिच्या प्रशिक्षकांने तयारीस सुरुवात केली, आणि आज अंडर - २० एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हिमाने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकत देशाचा मान जागतिक पातळीवर वाढवला.
 
या स्पर्धेत तिने रोमानिया आणि अमेरिकेच्या खेळाडूंना मागे सारत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. असे म्हणतात यश मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असतात, "धाना" च्या शेतातून आलेल्या या प्रतिभावान खेळाडूमुळे देशाच्या क्रीडा क्षेत्राला अमूल्य असे धन मिळाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
 
 
 
 
- निहारिका पोळ .
 
 
@@AUTHORINFO_V1@@