मुंबई : पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडणार्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी पालिकेने २४ वॉर्डसाठी २४ क्रमांक, व्हॉट्स अॅप ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे. पालिकेच्या क्षेत्रातील कोणत्याही विभागामध्ये खड्ड्यात पडल्याची तक्रार आल्यास ती १ ते ४८ तासांत सोडवली जाणार आहे. दरम्यान, पालिकेने सध्या ४८ तासामध्ये खड्डे बुजवणार असल्याचा दावा केला असला, तरी येत्या काही दिवसांमध्ये पालिका प्रशासन आश्वासन पाळण्यामध्ये कितपत यशस्वी ठरेल, हे स्पष्ट होणार आहे.
मुंबईतसह कोकण भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक-प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून, मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी भरपावसातही खड्डे बुजवण्याचे काम सुरू असणार आहे. यासाठी लागणारे कोल्डमिक्स पालिकेने स्वत: तयार केले असून, पावसाळ्यासाठी लागणारे अडीच हजार टन कोल्डमिक्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ४० टन कोल्डमिक्स तयार केले असून, प्रति २५ किलोप्रमाणे ७५० बॅग्स कोलमिक्स तयार ठेवले आहे. भरपावसात कोल्डमिक्सपासून बुजवलेले खड्डे शंभर टक्के मजबूत असून, मुंबईकरांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प संचालक विनोद चिठोरे यांनी दिली. प्रत्येक वॉर्डमध्ये तक्रारीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक, तातडीच्या कामांसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये स्पेशल इंजिनिअर, ‘एमसीजीएम-२४ तास’ कार्यरत, रस्त्याच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक - 1800221293, प्रत्येक वॉर्डमध्ये फलक लावून, जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.