नवी दिल्ली: ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरणाचा सूत्रधार हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असून, त्याने बंगळुरूतून एमबीए केल्याची माहिती समोर आली आहे. सज्जाद गुल असे त्याचे नाव आहे. पाच वर्षांपासून तो पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
श्रीनगरमधील रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांनी रमझानच्या काळात केंद्र सरकारने लागू केलेल्या शस्त्रसंधीचे समर्थन केले होते. यामुळे लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद हा बुखारींवर चिडला होता. बुखारी यांनी भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेचे नेहमीच समर्थन केल्याने ते दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर होते. हाफिझ सईदने बुखारींची हत्या करण्याचे आदेश दिल्यानंतर सज्जाद गुल याने त्यासाठी स्थानिक दहशतवाद्यांची निवड केली.
दरम्यान, सज्जाद हा मूळचा जम्मू-काश्मीरचा असून, त्याने बंगळुरूतील खासगी महाविद्यालयातून एमबीए केले आहे. पाकिस्तानात पळ काढण्यापूर्वी त्याला भारतातील सुरक्षा यंत्रणांनी अटकदेखील केली होती. तो काही दिवस श्रीनगरमधील मध्यवर्ती आणि दिल्लीतील तिहार तुरुंगात होता. सज्जादला बुखारींबद्दल माहिती असल्याचा फायदा लष्करने घेतला. शुजात बुखारी यांची ईदच्या दोन दिवस अगोदर हत्या झाली होती. ‘प्रेस एनक्लेव’ या वृत्तपत्राच्या कार्यालयातील काम आटपून कारमध्ये बसत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. बुखारींच्या तीन मारेकर्यांपैकी दोघे दक्षिण काश्मीरचे तर तिसरा पाकिस्तानातील असल्याची माहिती जम्मू- काश्मीर पोलीस दलातील सूत्रांनी दिली होती.