होम फर्निशिंगमधला‘वा’ ब्रॅण्ड...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018   
Total Views |




अमितचं लहानपणापासून एक स्वप्न होतं. स्वत:चा व्यवसाय करायचा. २००९ साली त्याने नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 

लवणमधलं रेवंडी... एक निसर्गरम्य गाव. या गावात त्याचा जन्म झाला. बालपण रेवंडीच्या मातीत गेलं. शाळेत शिकण्यासाठी मात्र तो मुंबईला आजीकडे आला. शाळा शिकत असतानाच तो घरोघरी पेपर टाकायचा, दूध टाकायचा. स्वत:च्या शाळेचा खर्च स्वत:च भागवायचा. काही दिवसांनी आई-बाबा आले. बिर्‍हाड डोंबिवलीला हललं. बाबा एका खाजगी कंपनीत कामाला लागले. आई घर सांभाळायची. तो आता कॉलेजला जाऊ लागला. मात्र, संघर्ष काही संपत नव्हता. आर्थिक परिस्थितीपुढे शरण जायचं नाही, हा चंगच त्याने बांधला. सकाळी ७ ते १२ कॉलेज करून दुपारी २ वाजता तो मुंबई सेंट्रलच्या क्रॉसरोडला हजर असायचा. रात्री 11 वाजेपर्यंत चहापावडर विकायचा. मध्यरात्र उलटल्यानंतर दीड वाजता तो घरी पोहोचायचा. दीड हजार रुपये मिळायचे त्याला. मात्र, ते दीड हजार रुपये त्याला लाखमोलाचे होते. १९९९ ते २००३ अशी चार वर्षे त्याने प्रचंड मेहनत घेतली. आज त्याचा स्वत:चा एक ब्रॅण्ड आहे. ’वा’ असं मराठमोळं नाव असलेल्या या ब्रॅण्डचा हा स्ट्रगल नायक आहे, अमित आचरेकर. ‘वा कॉर्पोरेशन’ या कंपनीचे संचालक.

 

अमितची एक नात्यातली बहीण अमेरिकेत राहते. अमित ईमेलच्या माध्यमातून तिला ख्यालीखुशाली कळवायचा. त्याचा संघर्ष बहिणीला तो सांगत असे. त्याच्या बहिणीने त्याला सल्ला दिला की, “अशी तत्कालीन कामे करत बसू नकोस, काहीतरी दूरगामी परिणामकारक ठरेल, असं काहीतरी कर.” बी. कॉम झालेल्या अमितने मग नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्याला ‘वेलस्पन’ या नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली. ही कंपनी टॉवेल निर्मितीत जगामध्ये तिसर्‍या स्थानी आहे. टेक्सटाईल कंपनीत काम करत असताना या क्षेत्राची गरज म्हणून त्याने सस्मिरा येथून ‘अ‍ॅपरल मर्चंटायझिंग’ या विषयात पदविका मिळवली. शनिवार-रविवार असा दीड वर्षांचा हा अभ्यासक्रम होता. या कोर्सनंतर खर्‍या अर्थाने टेक्सटाईल इंडस्ट्रीमधला अमित एक जाणकार झाला. त्यामुळे बॉम्बे डाईंग, सियाराम, रेमंडसारख्या प्रख्यात कंपन्यांमध्ये त्याला नोकर्‍या मिळाल्या. मात्र, बिग बझारमध्ये काम करण्याची त्यांची प्रचंड महत्त्वाकांक्षा होती. २००५ मध्ये तो ‘फ्युचर ग्रुप’मध्ये आला तेव्हा अमितला १३ हजार रुपये पगार होता आणि २००९ मध्ये पर्चेस मॅनेजर म्हणून काम सोडताना अमितला ८८ हजार रुपये पगार होता.

 

नोकरी सोडल्याशिवाय आपण व्यवसाय सुरू करणार नाही, हे ओळखून मोठ्या धाडसाने त्याने नोकरीला रामराम केला खरा. पण, नेमकं करायचं काय हेच कळत नव्हतं. एका मित्रासोबत त्याने २००९ मध्ये ’साक इंटरनॅशनल’ नावाची कंपनी सुरू केली. टेक्सटाईल क्षेत्रातील ही एक व्यापार करणारी कंपनी, असं काहीसं तिचं स्वरूप होतं. कंपनी म्हटल्यावर कामगार, कार्यालय असं एक चित्र उभं राहतं. तसं काहीच अमितकडे नव्हतं. अमित सकाळी घरातून कामासाठी म्हणून निघायचा आणि करीरोड स्टेशनच्या शेवटच्या टोकाच्या बाकावर बसायचा. तिथेच घरातून आणलेला डबा न्यायचा, खायचा, संध्याकाळी परत घरी यायचा. असं अनेक दिवस चाललं. अशाच एका दिवशी अमितला त्याच्या मित्राचा फोन आला. अमुक अमुक ठिकाणी एवढ्या मालाची गरज आहे म्हणून. अमितने गरज असलेल्या वस्तूंची खरेदी केली आणि मोठाल्या निळ्या रंगाच्या पिशव्या घेऊन गेला. घामाघूम झालेला अमित, दोन हातात पिशव्या घेऊन पर्चेस मॅनेजरसमोर उभा होता. “आप ट्रेन से आये हो? यही आप का माल है क्या?” मॅनेजरच्या त्या दोन प्रश्नाने अमितला बिझनेसमध्ये व्यक्तिमत्त्व, पॅकेजिंग याचं महत्त्व कळलं.

 

दरम्यान या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये १५ पेक्षा अधिक नावाजलेले ब्रॅण्ड्स आहेत. यामध्ये एकसुद्धा मराठी ब्रॅण्ड नाही. ही बाब अमितला खटकायची. मराठमोळा ब्रॅण्ड आपणच निर्माण करायचा, या उद्देशाने अमितने २०१६ मध्ये ‘वा कॉर्पोरेशन’ नावाची कंपनी सुरू केली आणि ’वा’ नावाचा ब्रॅण्ड प्रस्थापित केला. उशांचे कव्हर्स, पडदे, गाद्यांचे कव्हर्स, टेबल लिनन, बेडशीट्स अशी होम फर्निशिंगसाठी लागणारी सारी उत्पादने ’वा कॉर्पोरेशन’ तयार करतात. २२ लाख रुपये गुंतवणूक केलेली ही कंपनी अवघ्या दोन वर्षांत यंदा नऊ कोटी रुपयांची उलाढाल करेल, असे अमित आचरेकर सांगतात. २०३२ पर्यंत कंपनी १०० कोटींची उलाढाल करेल, असा आशावाददेखील अमित आचरेकर व्यक्त करतात. होम फर्निशिंगमधलं एक मराठमोळं नाव म्हणून ’वा’ अल्पावधीतच लोकप्रिय होत आहे. मुंबईतील जवळपास सर्वच मॉल्समध्ये ’वा’ची उत्पादने मिळतात. ”तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, मात्र गरीब म्हणून मेलात तर तुम्हीच दोषी आहात,” असं बिल गेट्सचं वाक्य आहे. अमित आचरेकरांनी हे वाक्य आचरणात आणून मराठी तरुणांना जणू एक संदेशच दिला आहे. त्यांच्या एकंदर संघर्षमय जीवनाकडे पाहून आपसूक मुखातून येते. ‘वा, क्या संघर्ष है...’

@@AUTHORINFO_V1@@