जवळजवळ संपूर्ण हसकाह शहर कुर्दांच्या अधिपत्याखाली आले व सीरियन सेनेला माघार घेऊन शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. शहरातील सरकारी विभाग तेथे कार्यरत ठेवण्यासाठी सुरक्षा चौकाची स्थापना करून हा भाग सरकारी नागरी पोलीस दलाच्या नियंत्रणाखाली देण्यात आला. अशाप्रकारे आधी ‘इसिस’विरुद्ध व नंतर सरकार आणि एनडीएफविरुद्ध या अल-हसकाहच्या युद्धात कुर्दांच्या ‘वायपीजी’ व असायिशांनी विजय मिळवला.
२०११ नंतरच्या नागरी युद्धामुळे बऱ्याच सीरियन नागरिकांनी सीरियातील इतर भागात किंवा सीरियाबाहेर पलायन केले. UNHCR अनुसार २०१७ च्या मध्यापर्यंत तब्बल ६३ लाख सीरियन नागरिकांनी स्थलांतर केले, तर ३०.५ लाख विस्थापित सीरियन नागरिक तुर्कस्तानात, १० लाख लेबेनॉनमध्ये, ६ लाख ६१ हजार जॉर्डनमध्ये, २ लाख ४३ हजार इराकमध्ये, तर १ लाख २२ हजार इजिप्तमध्ये निर्वासित म्हणून राहत आहेत. ९ लाख ५२ हजार सीरियन नागरिकांनी युरोपमध्ये आश्रयासाठी अर्ज केला आहे. (५ लाख १ हजार नागरिकांनी जर्मनीमध्ये, तर १ लाख १२ हजार लोकांनी स्वीडनमध्ये) २०१६ च्या मध्यापर्यंत चार लाख सीरियन या नागरी युद्धात मारले गेल्याची आकडेवारी सांगते. या नागरी युद्धामुळे सीरियामध्ये बरीच उलथापालथ झाली. ‘इसिस’चा उदय व कुर्दांची रोजावा क्रांती ही त्यातील दोन प्रमुख ठळक वैशिष्ट्ये. ‘इसिस’ काय किंवा रोजावातील कुर्द काय, त्यांना आपापले ध्येय साध्य करण्यासाठी आर्थिक साहाय्याची प्रचंड आवश्यकता होती व सीरियामध्ये ही गरज भागवण्यासाठी 'तेल' हा तसा कमी कालावधीत आर्थिक संपन्नता देणारा स्रोत होता. त्यादृष्टीने अल-हसकाह युद्धाचा आढावा घेणे आवश्यक आहे.
अल-हसकाहचा बराचसा भाग रोजावा कुर्दांच्या अधिपत्याखाली होता व काही भाग सीरिया सरकारच्या सैन्याच्या अधिपत्याखाली होता. अल-हसकाह हे तेलाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण ताब्यात घेण्यासाठी ‘इसिस’ने २०१४ मध्ये मोहीम उघडली. पहिल्या धडकेसरशी ‘इसिस’ने बराचसा भाग पादाक्रांत केला, पण काही दिवसांतच रोजावाच्या लढाऊ दलाने म्हणजे ‘वायपीजी’ने प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली व मागोमाग सीरिया सरकारनेही प्रत्युत्तर देऊन ४० गावे जिंकून घेतली, तर ‘वायपीजी’ने १०० शहर, गावं व खेडी जिंकून घेतली. २०१५ ला अजून २३० शहरे व गावं हस्तगत केली. ३० मे ला ‘इसिस’ने अल-हसकाह शहरावर जोरदार हल्ला करून चढाई करायचा प्रयत्न केला, पण त्वरित त्यांचा हा हल्ला परतवून लावण्यात ‘वायपीजी’ला यश आले. ‘इसिस’ने तयारीसाठी थोडा वेळ घेऊन परत पुन्हा २३ जूनला दुसरा मोठा हल्ला करून ४ जिल्हे व नैऋत्येकडील काही भाग हस्तगत केले, पण पुन्हा ‘वायपीजी’ने त्यांच्यापुढे चढाई करण्याचे मनसुबे उधळून लावले. ‘वायपीजी’ने ‘इसिस’ अल-हसकाह शहरामध्ये असताना शहराला वेढा घालून ‘इसिस’ला कोंडीत पकडले. आता ‘इसिस’ला आगेकूच करणे तर सोडाच, पण शहरात तग धरून राहणेही कठीण झाले. कारण, ‘वायपीजी’ने शहराला वेढा घालून सर्वच प्रकारची रसद बंद करून ‘इसिस’च्या नाकीनऊ आणले. अशाप्रकारे ‘इसिस’समोर पराभव स्वीकारण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता. अशाप्रकारे सहकारी दलाच्या साहाय्याने १ ऑगस्टला पुन्हा सर्व ‘इसिस’ने घेतलेले भाग ‘वायपीजी’ने पादाक्रांत करून ‘इसिस’चा अल-हसकाहमध्येही पराभव केला.
या युद्धात १०४ व्या रिपब्लिकन गार्डचे हवाई दल, चौथ्या यांत्रिकी तुकडीचे १५४ वे दल, तिसऱ्या सशस्त्र तुकडीचे १२३ वे दल अशा सीरिया अरब सेनेच्या संयुक्त सैन्याने तसेच डेर इझ्झोरच्या शायतत टोळीने, गोझार्तो संरक्षक दलाने (असेरिअन दल) व नॅशनल डिफेन्स फोर्स (NDF) व सीरिया सरकारच्या सैन्याने अल-हसकाहचे काही भाग ‘इसिस’मुक्त केले. ‘वायपीजी’च्या या जोरदार प्रत्युत्तरामुळे व प्रति चढाईमुळे आता अल-हसकाहाचा ७५ टक्के भाग कुर्दांच्या अधिपत्याखाली आला व आता केवळ २५ टक्के भागच सीरिया सरकारी सैन्याच्या अधिपत्याखाली उरला. ‘इसिस’ला हुसकावून लावल्यावर हसकाह या आर्थिक महत्त्वाच्या प्रदेशावर आपले स्वामित्व सिद्ध करण्यासाठी आता कुर्द पोलीस (ज्यांना ‘असायिश’ म्हणतात) व नॅशनल डिफेन्स फोर्सेस (NDF ) यांच्यात १६ ऑगस्ट २०१६ पासून चकमकी उडू लागल्या. २०१२ च्या नागरी युद्धानंतर सीरिया सरकारच्या सीरिया सशस्त्र दलांना अर्धवेळ साहाय्य करणारे सीरिया सरकार समर्थक राखीव सेना म्हणजे ‘नॅशनल डिफेन्स फोर्सेस.’ एनडीएफने हसकाह शहराच्या मध्यापर्यंत धडक मारून रुग्णालय व माश्रोचा काही भाग ताब्यात घेतला. तसेच १४ असायिश पोलिसांना पकडले. एका रात्री कुर्दिश असायिशांनी एनडीएफवर हल्ला करून त्यांच्या काही कुटुंबीयांना ताब्यात घेतले, असा आरोप करण्यात आला. परिणामत: येथे हिंसाचारात वाढ झाली. त्यात सीरियन अरब हवाई दलाने असायिश मुख्यालयावर १० हवाई हल्ले केले व या ‘असायिश विरुद्ध एनडीएफ’ युद्धात अरब हवाई दल एनडीएफच्या बाजूने सहभागी झाले.
असायिशला ‘वायपीजी’ने पाठिंबा दिला व ‘वायपीजी’सुद्धा युद्धात उतरली. त्यामुळे आता येथे घनघोर युद्धाची शक्यता निर्माण झाली. म्हणून मग CJTF-OIRने या प्रदेशावर लक्ष ठेवून कुर्दांवर सीरिया अरब हवाई दलाने बॉम्बवर्षाव करू नये यासाठी हवाई गस्त घालण्यास सुरुवात केली. (CJTF- OIR - Combined Joint Task Force- Operation Inherent Resolve- हे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने स्थापन केलेले ३० राष्ट्रांच्या सैनिकांचा समावेश असलेले ‘इसिस’विरुद्ध लढण्यासाठी तयार केलेले संयुक्त कृतीदल आहे.) हवाई हल्ले होत असूनही कुर्दांनी चढाई करून बराच प्रदेश पादाक्रांत केला. २० ऑगस्टला दोन्ही बाजू शांत होऊन शस्त्रबंदीचे प्रयत्न सुरू झाले. संपूर्ण हसकाह शहरातून एनडीएफने माघार घेऊन संपूर्ण शहर असायिशच्या नियंत्रणाखाली द्यावे, अशी मागणी कुर्दांनी केली, पण सरकारने ही मागणी धुडकावून लावली व जोपर्यंत हसकाह शहरातील ‘वायपीजी’ व असायिश सेना शस्त्रसंन्यास करत नाहीत, तोपर्यंत एनडीएफसुद्धा शस्त्र खाली ठेवणार नाही, असे सांगितले. अशारितीने तहाची बोलणी फिसकटल्यामुळे बैठक संपताच अल-नश्वा व घुवायरान जिल्ह्यात पुन्हा बॉम्बवर्षाव व गोळीबार सुरू होऊन जोरदार धुमश्चक्रीस प्रारंभ झाला.
आता कुर्दांनी जवळजवळ हसकाहच्या ९० टक्के भागावर नियंत्रण मिळवले. आता रशियाच्या मध्यस्थीने करार करून शस्त्रबंदीचे प्रयत्न सुरू झाले. अखेर या प्रयत्नांना यश येऊन २३ ऑगस्ट २०१६ ला शस्त्रसंधी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानुसार जवळजवळ संपूर्ण हसकाह शहर कुर्दांच्या अधिपत्याखाली आले व सीरियन सेनेला माघार घेऊन शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. शहरातील सरकारी विभाग तेथे कार्यरत ठेवण्यासाठी सुरक्षा चौकाची स्थापना करून हा भाग सरकारी नागरी पोलीस दलाच्या नियंत्रणाखाली देण्यात आला. अशाप्रकारे आधी ‘इसिस’विरुद्ध व नंतर सरकार आणि एनडीएफविरुद्ध या अल-हसकाहच्या युद्धात कुर्दांच्या ‘वायपीजी’ व असायिशांनी विजय मिळवला. आता या अल-हसकाहमधील तेलविहिरींवर कोणाचा ताबा आहे, या तेलस्वामित्वाविषयी पुढील लेखात जाणून घेऊ.