अमित शहा यांचा काँग्रेसला रोखठोक सवाल
जम्मू : “काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्याचे लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईदने समर्थन केले आहे. या दोघांचेही मत एकसारखे कसे, यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट करायलाच हवी. काँग्रेस आणि लष्कर-ए-तोयबामध्ये नेमके कोणते संबध आहेत,” असा रोखठोक सवाल अमित शाह यांनी केला. “आझाद आणि काँग्रेसचे अन्य एक नेते सैफुद्दिन सोझ यांनी काश्मीर तोडणारेच वक्तव्य केले आहे, पण भाजपा जम्मू-काश्मीरला भारतापासून कधीच तुटू देणार नाही. हे राज्य भारताचे अविभाज्य अंग आहे आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या रक्ताने हे नाते निर्माण केले आहे. खरं तर, काश्मीर तोडणाऱ्या आझाद आणि सोझ यांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेसने माफी मागायला हवी, पण हा पक्ष असे काहीच करणार नाही, याची मला खात्री आहे,” असेही शाह म्हणाले. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जम्मूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ६५ व्या बलिदान दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. आज जम्मू-काश्मीर भारताशी जोडलेला आहे तो डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच असेही यावेळी अमित शाह यांनी निक्षुन सांगितले.
“विकास न करणारे सरकार आमच्यासाठी मुळीच महत्त्वाचे नाही. भाजपसोबत सत्तेत असलेल्या पीडीपी सरकारला केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त झाला, पण या सरकारने जम्मू आणि लडाख प्रांताच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला,“ असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे स्पष्ट केले. मेहमुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वातील सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानंतर अमित शाह आज प्रथमच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे, काश्मिरात राष्ट्रध्वज फडकविण्याचा प्रयत्न करणारे जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अटक करण्यात आली. येथील कारागृहात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आज त्यांच्या बलिदान दिनानिमित्त अमित शाह यांचा दौरा विशेष महत्त्वाचा आहे.
“जम्मू-काश्मीरचा विकास व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अनेक मोठ्या योजना लागू केल्या, काहींचे लोकार्पणही केले, यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी पाठविला. मात्र जम्मू व लडाख पीडीपीच्या दरबारी नेहमीच दुर्लक्षित राहिले. आमच्यासाठी विकासच सर्व काही असल्याने सत्तेतून बाहेर पडणे, हाच एकमेव मार्ग उरला होता,” असे अमित शाह यांनी येथे आयोजित भव्य रॅलीत बोलताना सांगितले.
“श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळे जम्मू-काश्मीरशी आमचे हृदय आणि रक्ताचे नाते निर्माण झाले आहे. मी एक वर्षापूर्वी येथे आलो होतो, तेव्हा भाजपा सत्तेत होती, आता भाजपा सत्तेत नाही, तरीही मी येथे आलो आहे. कारण, आमच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाहीच,“ असे शाह म्हणाले. दरम्यान, दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर आलेले अमित शाह रविवारी प्रजा परिषद आंदोलनाशी संबंधित पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत.
आण्विक युद्ध झाल्याशिवाय पीओके मिळणार नाही
भारत आणि पाकिस्तानमध्ये जोपर्यंत आण्विक युद्ध होत नाही, तोपर्यंत भारताला पाकव्याप्त काश्मिर पुन्हा मिळणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दिन सोझ यांनी शनिवारी केले. शुक्रवारी सैफुद्दिन सोझ यांनी काश्मिरींना पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याऐवजी स्वतंत्र व्हायला आवडेल हे परवेझ मुशर्रफ यांचे विधान योग्य असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी देशाबाहेर एक पाकिस्तान आहे आणि काँग्रेसमध्येही एक पाकिस्तान आहे, अशी टिका केली होती.