सैराट आल्यापासून केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगाला या चित्रपटाने वेड लावले. सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर इतर भाषांमध्ये या चित्रपटाचे 'रीमेक' तयार करण्यात यायला लागले. यापैकी सगळ्यात आधी तेलगु भाषेत हा चित्रपट 'मनसु मल्लिगे' या नावाने आला त्यानंतर पंजाबी मध्ये हा चित्रपट 'चन्ना मेरेया' नावाने, उडिया भाषेत 'लैला ओ लैला', बंगाली भाषेत 'नूर जहाँ' नावाने प्रदर्शित करण्यात आला आणि आता हिंदी भाषेत 'धडक' या नावाने सैराटचा रीमेक प्रदर्शिक करण्यात येत आहे. आजच धडक चित्रपटाचे प्रमुख गाणे 'धडक है ना..' प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याच्या निमित्ताने सैराट झालं जी, आणि मनसुमल्लिगे या दोन्ही गाण्यांची देखील उजळणी झाली.
मराठी भाषेत हे सैराट झाले जी हे गाणे चिन्मयी श्रीपाद आणि अजय गोगावले यांनी गायले आहे. याचे संगीत तीनही चित्रपटांमध्ये अजय-अतुल यांनीच दिले आहे. सैराट झालं जी ला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. याच चालीवर मनसुमल्लिगे या चित्रपटात 'थंगलीया रूपा' हे गाणे देखील आहे.
मनसुमल्लिगे : भाषा - कन्नड, दिग्दर्शक - एस. नारायन, प्रमुख भूमिका : रिंकू राजगुरु, निशांत , संगीत : अजय - अतुल
हा चित्रपट सैराटच्या नंतर लगेचच आला. ३१ मार्च २०१७ ला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांचा चाली सैराट मधील चालींप्रमाणे जशाच्या तशा वापरण्यात आल्या आहे. मनसुमल्लिगेच्या प्रमुख गाण्याला (टायटल ट्रॅकला) सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. हे गाणे देखील अतिशय मधुर आहे. या गाण्याची मजा सैराज झालं जी सारखी नसली तरी देखील प्रेक्षकांनी या गाण्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.
चन्ना मेरेया : भाषा - पंजाबी, दिग्दर्शक - पंकज बत्रा , मुख्य भूमिका- पायल राजपूत, निंजा, संगीत : गोल्डबॉय, सोनू रामघरिया, जयदेव कुमार
पंजाबी भाषेतील 'चन्ना मेरेया' हा चित्रपट जुलै २०१७ मध्ये आला. या चित्रपटाची खासियत अशी की हा चित्रपट सैराटचा जरी रीमेक असला तरी देखील यामध्ये 'पंजाबी तडका' पूर्णपणे आला आहे. पंजाबची संस्कृती, पंजाब येथील परिस्थिती दिसून येत आहे. या चित्रपटातील प्रमुख गाणे 'हवा दे वरके' आहे. सैराटच्या गाण्याचा सवळपास जाण्यासारखं देखील हे गाणं नाहीये. मात्र या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत काम करणाऱ्या दोन्ही कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे.
लैला ओ लैला : भाषा : ओडिया, दिग्दर्शक : सुशांत मणी , मुख्यभूमिका - स्वराज, सुन्मित्रा, संगीत : बैद्यनाथ दास
सैराटच्या रीमेक्सपैकी सगळ्यात वाईट रीमेक ओडिया भाषेत 'लैला औ लैला' या नावाने करण्यात आला आहे. डिसेंबर २०१७ मध्ये हा चित्रपट आला. चित्रपटाची कहाणी जरी सारखी असली, काही दृश्य जरी अगदी जशेच्या तसे असले तरी सैराटच्या संगीतात जी मधुरता होती त्याची या चित्रपटातील गाण्यांमध्ये पार वाट लावण्यात आली आहे. तसेच कलाकारांनी देखील प्रभाव पाडता यावा असा अभिनय केलेला नाही. प्रेक्षकांना हे बघून नक्कीच थोडा त्रास होणार आहे.
नूरजहाँ : भाषा : बंगाली, दिग्दर्शक - अभिमन्यु मुखर्जी , मुख्यभूमिका - आदित्य रॉय, पूजा चेरी , संगीत : सव्या गुप्ता
बंगाली भाषेत सैराटचा रीमेक नूरजहाँ या नावाने करण्यात आला आहे. याचा ट्रेलर बघून यामध्ये कहाणीत बऱ्यापैकी बदल करण्यात आला आहे, असे लक्षात येते. या चित्रपटातील "नूर जहाँ." "शोना बंधू तुम्ही" आणि "मन बोले छे" या गाण्यांना यूट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र यामध्ये देखील सैराटच्या संगीताची सर आलेली नाही.
धडक : भाषा : हिंदी, दिग्दर्शक : शशांक खैतान, मुख्यभूमिका : ईशान खट्टर, जान्हवी कपूर , संगीत : अजय अतुल
आणि आता या सगळ्यांच्याही पेक्षा आर्थिकदृष्ट्या मोठा असलेला चित्रपट म्हणजे 'धडक' करण जौहर प्रस्तुत, शशांक खैतान दिर्गदर्शित आणि जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या मुख्यभूमिका असलेल्या या चित्रपटाचे आज टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आले आहे. याला देखील सैराटची सर मुळीच आलेली नाही.
सैराटचे इतके रीमेक झाले. हे रीमेक्स पाहून १९९३ साली आलेल्या 'मणिचित्रतारु' या चित्रपटाची आठवण आली. मूळ मल्याळम भाषेत असलेल्या या चित्रपटाचे देखील अनेक भाषांमध्ये रीमेक प्रदर्शित करण्यात आले होते. कन्नड भाषेक 'अप्थमित्रा', बंगालीत 'राजमहाल', तेलगु आणि तमिळ मध्ये 'चंद्रमुखी' तर हिंदीत 'भुलभुलैय्या' या नावाने हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र यामध्ये देखील प्रसिद्ध भरनाट्यम नृत्यांगना शोभना यांनी मुख्य भूमिका साकारलेला 'मणिचित्रतारू' हाच चित्रपट उजवा ठरतो.
असे म्हणतात पहिलं ते पहिलंच. थोड्या फार प्रमाणात हे खरे देखील आहे. सैराटच्या संगीताची सर इतर रीमेक्सना आलेली नाही हे मात्र खरे आहे. तरी देखील मराठी चित्रपटाला संपूर्ण जगभरातून इतका चांगला प्रतिसाद मिळणं ही एक गौरवाची बाब आहे. आता २० जुलै रोजी धडक आल्यानंतर बॉलिवुडमध्ये या चित्रपटाला काय प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
- निहारिका पोळ