अल-हसकाह व तेलाचे राजकारण - भाग-१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018   
Total Views |




अल-हसकाह शहर हा भाग हसकाह प्रांताचा एक भाग आहे व हसकाह प्रांत हा रोजावाच्या सिझिरे परगण्याचा एक भाग आहे. म्हणजे ‘कुर्द-रोजावा क्रांती’ हा अजून एक महत्त्वाचा कंगोरा त्याला असून त्यामुळे तेलाचे राजकारण अजून गुंतागुंतीचे झाले आहे.

 

रोजावातील सीरियन कुर्दांच्या ताब्यात असणारे अल-हसकाह हे शहर मध्य-पूर्वेतील (हा भाग भारताच्या पश्चिमेला असूनही पाश्चात्त्य त्याला ‘मध्य-पूर्व’ म्हणतात म्हणून आपणही आंधळेपणाने त्याला ‘मध्य-पूर्व’ म्हणतो.) तेलाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. तेलव्यवसायातून मिळणारे अमाप पैसे व त्यासाठी तेलविहिरींवर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा, त्यामुळे होणारे राजकारण, परकीय राष्ट्रांची लुडबूड, अंतर्गत शत्रू व दहशतवाद्यांचा डोळा असे विविध कंगोरे या तेलाभोवती आपल्याला पाहावयास मिळतात. अल-हसकाह शहर हा भाग हसकाह प्रांताचा एक भाग आहे व हसकाह प्रांत हा रोजावाच्या सिझिरे परगण्याचा एक भाग आहे. म्हणजे ‘कुर्द-रोजावा क्रांती’ हा अजून एक महत्त्वाचा कंगोरा त्याला असून त्यामुळे तेलाचे राजकारण अजून गुंतागुंतीचे झाले आहे.

 

हसकाह प्रांत सीरियाच्या ईशान्येला आहे. हसकाह प्रांतात अल-हसकाह, क्वामिशी व रास अल-अयन ही मोठी शहरे आहेत, त्यातील अल-हसकाह व क्वामिशी शहरात सर्वाधिक कुर्द राहतात. अल-हसकाह अल-मदिनाह, अल-अझिझीयाह, अल-नस्रा, अल-नश्वा व घुवायरान या जिल्ह्यांत विभागलेले आहे. अल-हसकाहमध्ये कुर्द बहुसंख्य आहेत. त्याशिवाय येथे अरब, असेरियन (ऑर्थोडॉक्स, चाल्डीअन कॅथोलिक व पूर्व चर्च पंथासह) अर्मेनिअन (ऑटोमन साम्राज्याने केलेल्या अर्मेनिअन हत्याकांडामुळे बऱ्याच अर्मेनिअनांनी पलायन करून हसकाह प्रांतात आश्रय घेतला.) व तुर्की लोकही राहतात तर याझिदी लोक मुख्यत्वे करून रास अल-अयन शहरात राहतात. या भागात सुन्नी अरब टोळ्या आहेत. निकोलस ए. हेरस या अभ्यासकाने प्रत्यक्ष हसकाह प्रांताला भेट देऊन व तेथील लोकांच्या मुलाखती घेऊन केलेल्या संशोधनानुसार या भागात द शम्मार, द उगेदात, द बग्गरा, द टे व द जाब्बूर तसेच अल-शराबिया, द झुबाय्द हे लहान आदिवासी गट आहेत. द शम्मार, द जाब्बूर व द बग्गरासह निरनिराळ्या प्रादेशिक सुन्नी अरब टोळ्यांचे सीमापार इराकमधील सहकारी आदिवासी गटांशी लागेबांधे आहेत, ज्याचा उपयोग त्यांना सीरियामधील नागरी युद्धाच्यावेळी शस्त्रास्त्र साहाय्याच्या वेळी झाला.

 

 
 

राष्ट्रीय अरब युवक संघटनेच्या अनुसार (National Association of Arab Youth) अल-हसकाह प्रांतात १७६५ गावं आहेत. त्यांपैकी ११६१ अरब, ४५३ कुर्दिश, ९८ असेरिअन गावं आहेत, तर ४८ अरब-कुर्द मिश्र, ३ अरब-असेरिअन मिश्र व २ कुर्द- असेरिअन मिश्र गावं आहेत. सीरियामध्ये अंदाजे एकूण लोकसंख्येच्या १२.५ - १५ टक्के म्हणजे ३०-३६ लक्ष कुर्द राहतात. अल-हसकाहची लोकसंख्या अंदाजे १५ लक्ष आहे व क्षेत्रफळ २३ हजार, ३३४ चौ. किमी आहे. सध्या तेलविहिरींच्या शोधामुळे लक्ष वेधला गेलेला हा भाग मुखत्वे शेतीवर आधारित प्रदेश आहे. सुपीक भागात मुख्यत्वे करून लोकसंख्येची घनता जास्त आहे. कापूस उत्पादनासाठीही हा प्रदेश ओळखला जातो. येथे मुक्काम केलेल्या फ्रेंच सैनिकांच्या साहाय्याने १९२०-१९३० च्या दशकात या भागाचा विकास होण्यास सुरुवात झाली. १९५० ला अल-हसकाहला राजधानीचा दर्जा मिळाला व १९६० ला झालेल्या सिंचनप्रकल्पांमुळे खऱ्या अर्थाने या भागाच्या आर्थिक विकासास गती मिळाली. १९७० च्या दशकात तेलविहिरींच्या शोधामुळे तर आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.

 

मोहम्मद बौझाझीने १७ डिसेंबर २०१० ला स्वतःला पेटवून घेतले व ट्युनिशियामध्ये क्रांती झाली व नंतर या क्रांतीचा वणवा इतर अरब देशात पसरत गेला. काही देशात त्याने तशाच प्रकारची क्रांती घडवून प्रस्थापित शासकांना/ हुकूमशहांना पायउतार व्हावे लागले किंवा शासकांची/हुकूमशहांची हत्या केली गेली, यालाच ‘अरब वसंत’ (Arab Spring) म्हणतात. अशाच प्रकारे सीरिया शासनाचा निषेध करण्यासाठी २६ जानेवारी २०११ ला अल-हसकाहच्या हसन अली अक्लेहने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. महिन्याभराच्या अवधीतच अरब वसंत क्रांती सीरियामध्ये धडकली. परिणामतः कुर्दांमध्ये जो असंतोष धुमसत होता, त्याला बाहेर पडायला निमित्त मिळाले. १९६२ ला १.२ लक्ष कुर्दांना ते सीरियात जन्मले नाहीत या कारणास्तव नागरिकत्वाचे अधिकार नाकारण्यात आले होते. यातील बहुतांश अल-हसकाहमधील कुर्द होते. कुर्दिश भाषेवर बंदी, शाळेतून पुस्तकावर बंदी तसेच कुर्दिश नववर्ष नवरोझवर बंदी अशी विविध बंधने सीरियन कुर्दांवर घालण्यात आली होती. बाथ सरकारच्या अरब पट्टा तयार करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून १९६५ ते १९७६ च्या दरम्यान उत्तरेकडील कुर्दबहुल हसकाह प्रांतात सुन्नी अरब टोळ्यांना वसविण्यात आले. म्हणजे कुर्दबहुल भागात कुर्दांना अल्पसंख्य करणे, हा या धोरणाचा हेतू होता. १८० मैलाच्या पट्ट्यातील कुर्दांची भूमी बळकावून त्यावर सुन्नी अरब टोळ्यांना वसवण्यात आले. या धोरणामुळे अंदाजे ६० सहस्र कुर्दांना विस्थापित व्हावे लागले. अशाप्रकारे कुर्दांची सीरियामध्ये होणारी गळचेपी, त्यांना नाकारले जाणारे नागरिकत्वाचे अधिकार यामुळे या कुर्दबहुल असणाऱ्या भागात असंतोष खदखदत होता व त्यात वरील सीरिया सरकारच्या निषेधार्थ आत्मदहनाची घटना घडली. कुर्दांनी सीरिया शासनाविरुद्ध आंदोलन, निषेध करण्यास सुरुवात केली. मुस्लीम ब्रदरहूडचा वाढता प्रभाव, अरब वसंत क्रांतीचे पसरत चाललेले लोण सीरियापर्यंत येण्याची भीती व राजकीय सोय अशा विविध कारणांमुळे अखेर २०११ मध्ये सीरियन अध्यक्ष बशर अल असादने या कुर्दांना नागरिकत्वाचे अधिकार दिले. कदाचित यामुळे असेल किंवा ‘अरब स्प्रिंग’च्या लाटेत आपले कुर्दिस्तानचे स्वप्न भंग होण्याच्या भीतीमुळे असेल, पण सीरियाच्या नागरी युद्धात कुर्द उत्साहाने सहभागी झाले नाहीत.

 

त्यातच ‘इसिस’चा उदय झाला व त्याची नजर अर्थातच या तेलसमृद्ध भागाकडे गेली. त्यात येथे कुर्द बहुसंख्य, त्यामुळे ‘इसिस’ने अल-हसकाह आपल्या ताब्यात घेण्यासाठी आगेकूच केली, जेणेकरून कुर्दांचे हत्याकांड करून किंवा त्यांना येथून हाकलून लावता येईल व तसेच तेलविहिरी ताब्यात आल्या तर ‘इसिस’ची आर्थिक बाजू सक्षम करता येईल. म्हणजे, ‘इसिस’चे शत्रू कुर्द यांचे हत्याकांड व तेलविहिरींवर ताबा असे एका दगडात दोन पक्षी मारता येतील, असे मनसुबे ‘इसिस’ने आखले. अल-हसकाहमधील युद्धाचा सविस्तर आढावा पुढील लेखात घेऊया.

@@AUTHORINFO_V1@@