मुंबईकरांचे झोपेचे गणित बिघडले

    02-Jun-2018
Total Views |



मुंबई: मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून, त्यांचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये होत असल्याची धक्कादायक बाब ‘वेकफिटया भारताच्या आघाडीच्या मॅट्रेस आणि झोपेशी संबंधित उत्पादनांच्या कंपनीने देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे. पुरेशी झोप मिळत नसल्याचा परिणाम मुंबईकरांच्या कामावरदेखील होत असून, त्यांनी कामावर झोप येत असल्याचे मान्य केले आहे. ७९ टक्के मुंबईकरांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा कामावर झोप येते, आठवड्यातून चार ते पाच वेळा झोप येणार्‍यांचे प्रमाण सहा टक्के आहे, तर रोज कामावर झोप येणार्‍यांचे प्रमाण १५टक्के इतके आहे.

अपुऱ्या झोपेमुळे ५३ टक्के लोकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आह. तर; १८ टक्के लोकांना निद्रानाशाची समस्या भेडसावत आहे. सर्वेक्षणातून असे दिसून आले, की १७ टक्के लोक मध्यरात्रीनंतर झोपतात आणि ४०टक्के लोक रात्री ११ नंतर झोपतात. खरे तर, आपल्या शरीराच्या रचनेनुसार रात्री १०-१०.३० ही झोपण्याची नियमित वेळ असावी असा सल्ला दिला जातो, पण या वेळेत झोपी जाणार्‍यांचे प्रमाण केवळ २८ टक्के इतकेच आहे. रात्री उशिरा झोपल्यामुळे आपण उशिरा आणि थकलेले उठतो, असे मत २० टक्के लोकांनी व्यक्त केले असून, ते सकाळी आठनंतर जागे होतात. सुमारे एक तृतीयांश म्हणजे ३१ टक्के लोकांना सात तासांपेक्षा कमी झोप मिळते, तर १८ वर्षे वयाखालील २७ टक्के लोकांना फक्त सहा तासांची झोप मिळते. ही त्यांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात अत्यंत धोकादायक गोष्ट आहे.