लिनियन मेडलचा पहिला भारतीय मानकरी

    02-Jun-2018   
Total Views | 30



सुप्रसिद्ध भारतीय जीवशास्त्रज्ञ डॉ. कमलजीत बावा हे ‘लिनियन मेडल’ हा मानाचा किताब मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. Ashoka Trust for Research in Ecology and the Environment (ATREE) या जगप्रसिद्ध संस्थेचे ते संस्थापक होत .

लंडनच्या लिनियन सोसायटीतर्फे जीवशास्त्र शाखेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिलं जाणारं लिनियन मेडलहा जगातील मानाच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानला जातो. लिनियन सोसायटीची स्थापना १७७८साली जेम्स एडवर्ड यांनी केली. सुप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांच्या नावावरून या संस्थेला लिनियन सोसायटीहे नाव दिलं गेलं. त्यानंतर शंभर वर्षांनी, म्हणजेच १८८८ सालापासून जीवशास्त्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यासाठी लिनियन मेडलदिलं जाऊ लागलं. जोसेफ डी. हूकर हे वनस्पतिशास्त्रज्ञ या पुरस्कारचे पहिले मानकरी ठरले. गेल्या १४० वर्षांमध्ये प्रथमच हे मेडल एका भारतीय व्यक्तीला मिळालं आहे. या व्यक्तीचं नाव आहे डॉ. कमलजीत बावा.

डॉ. कमलजीत बावा हे भारतातले नामांकित जीवशास्त्रज्ञ आहेत. सध्या ते 'Ashoka Trust for Research in Ecology and the Environment (ATREE)' या संस्थेचे अध्यक्ष आणि बोस्टनच्या मॅसॅच्युएट्स विद्यापीठात जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत. संवर्धन जीवशास्त्र (conservation biology)

या विषयातल्या अभूतपूर्व संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. बावा यांचा जन्म दि. एप्रिल १९३९ रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचं बालपणापासून डॉक्टरेटपर्यंतचं संपूर्ण शिक्षण पंजाबमध्येच झालं. छत्तीसगढमधल्या पंजाब विद्यापीठातून त्यांनी बी. एस., एम. एस. आणि पी. एचडी. या पदव्या मिळवल्या. १९६७ साली डॉक्टरेट पूर्ण झाल्यानंतर ते अमेरिकेला गेले. तिथे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेसया महाविद्यालयात त्यांची postdoctoral research associate and instructor

या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी दोन वर्षे काम केलं. १९७४ साली त्यांची बोस्टनच्या मॅसॅच्युएट्स विद्यापीठात असिस्टंट प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. थोड्याच वर्षांत ते मॅसॅच्युएट्स विद्यापीठातले जीवशास्त्राचे विख्यात प्राध्यापक म्हणून नावारूपाला आले. उष्णकटिबंधीय वनस्पतींची उत्क्रांती, उष्णकटिबंधीय वृक्षतोड आणि लाकडाव्यतिरिक्त मिळणारी अन्य वन उत्पादने हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय होता. मध्य अमेरिका, भारतातील पश्‍चिम घाट, पूर्व हिमालय या प्रदेशांतल्या जंगलांमधल्या जैवविविधतेचा त्यांनी अनेक दशके कसून अभ्यास केला. पूर्व हिमालयात होणार्‍या हवामानबदलांवर त्यांनी स्वत: संशोधन करून, अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. योगायोग म्हणजे १८८८ साली पहिलं लिनियन मेडलमिळवणारे जोसेफ हूकर यांचं संशोधनही भारतीय वनस्पतींवरच होतं. भारतीय वनस्पतींचं शास्त्रीय पद्धतीने दस्तावेजीकरण आणि वर्गीकरण करणारी ती पहिली व्यक्ती होती.

जैवविविधता आणि पर्यावरण क्षेत्रात डॉ. बावा यांचं सर्वांत मोठं योगदान म्हणजे ATREE

या जगप्रसिद्ध संस्थेची स्थापना. भारतातही एक जागतिक दर्जाची पर्यावरणविषयक शास्त्रीय आणि सामाजिक संस्था असावी, या हेतूने त्यांनी बंगळुरु येथे या संस्थेची स्थापना केली.

जागतिक पातळीवर नावारूपाला आलेल्या या संस्थेत आज पर्यावरणविषयक संशोधनाचं खूप मोठं काम चालतं. एन्व्हायर्मेंटल थिंक टँकअसणार्‍या जागतिक संस्थांमध्ये या संस्थेचा आशिया खंडात दुसरा आणि जगात अठरावा क्रमांक लागतो. या संस्थेत काम करणारे विद्यार्थी आणि संशोधक यांचा परिसर विज्ञानावर भर असतो. डॉ. बावा यांचे आत्तापर्यंत दोनशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून, ११ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांची हिमालया-माऊंटन्स ऑफ लाईफआणि सह्याद्रीजही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ते कॉन्झर्वेशन अ‍ॅण्ड सोसायटीया नियतकालिकाचे मुख्य संपादक होते. हे आजही भारतातलं एक अग्रगण्य पर्यावरणविषयक नियतकालिक आहे. पर्यावरणविषयक नवीन संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणारं नियतकालिक म्हणून त्याची ख्याती आहे. २०१२ साली त्यांना Gunnnerus Sustainability Award'

हा जगप्रसिद्ध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. २००९ साली सोसायटी फॉर काँझर्व्हेशन बायोलॉजीतर्फे त्यांना डिस्टिंग्विश सर्व्हिस अ‍ॅवॉर्डदेऊन गौरवण्यात आलं. असे कितितरी छोटे-मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मात्र लिनियन मेडलडॉ. कमलजीत बावा यांच्या जीवशास्त्रविषयक कार्याला खर्‍या अर्थाने न्याय मिळवून देणारं आहे.

हर्षद तुळपुळे

मूळचा अणसुरे,जि. रत्नागिरी रहिवासी. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चौदावीपर्यंत शिक्षण, मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन. शेती, पर्यावरण विषयांची विशेष आवड. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..