'आंधळी' : फिटे अंधाराचे जाळे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018   
Total Views |
 

जन्मापासून माणूस काही ना काही ग्रहण करत असतो, आपल्या पंचेंद्रियांनी विश्वाचे तपशील प्राशून घेत असतो. प्रत्येक इंद्रिय त्याच्याकडे पोहोचवत असणाऱ्या ज्ञानबिंदूंची जुळवाजुळव करत तो आपल्या मेंदूत चित्रं रेखाटत असतो. जसजसे त्याचे अनुभव वाढत जातात तसतशी त्याच्या डोक्यातल्या विचार आणि धारणांची दिशा पक्की होत जाते. म्हणजेच, माणसाचं जे काही व्यक्तिमत्व तयार होतं ते असं अनेक गोष्टी ग्रहण करत करतच झालेलं असतं. दुर्दैवाने काही व्यक्तींना जन्मतः किंवा एखाद्या आजार/अपघातामुळे एखादं ज्ञानेंद्रिय गमवावं लागतं आणि त्यांच्या ग्रहणक्षमतेवर परिणाम होतो. त्यांचं त्यांचं भवतालाचं आकलन सर्व इंद्रियं कार्यरत असणाऱ्या माणसांच्या तुलनेत अपुरं राहतं. पण हेलन केलरसारख्या व्यक्तीकडून नियतीने एक, दोन नव्हे तर तीन ज्ञानेंद्रियं हिरावून घेतली होती असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तिच्या समोर आलेल्या अडचणी या आपल्या कल्पनेच्या कित्येक योजने पुढे असतात. पण हेलन सामान्य स्त्री नव्हती. अंधार, निःशब्दता आणि सुन्नता यांच्याशी तिने एकाच वेळी दोन हात केले आणि इतिहासपुरुष आपल्या पुस्तकात ठळक नोंद करून ठेवेल असं आयुष्य जगून गेली. 'आंधळी' हे पुस्तक वाचून तोंडात बोटं गेलं नाही तरच नवल…
 
आभाळ कोसळलं
 
हेलन लहानपणी खूप दंगेखोर होती. पण तिची बागडणारी पावले आणि चिमखडे बोल विधात्याला का बघवले नाहीत ते त्यालाच ठाऊक ! हेलन २ वर्षांची असताना पोटात आणि मेंदूत तापामुळे रक्त साकळून तिचं आयुष्यच धोक्यात आलं होतं, पण आईच्या अथक सुश्रुषेमुळे ती कशीबशी वाचली. पण मोठा आघात हा होता की तिची दृष्टी व श्रवणशक्ती मात्र नष्ट झाली होती. ऐकण्याची क्षमता नष्ट झाल्यामुळे तिच्या वाचेच्या आकलनावरही परिणाम झाला आणि ती वाचेलाही पारखी झाली. दिसतही नाही, ऐकूही येत नाही म्हटल्यावर हेलनला काहीच कळेनासं झालं. त्यामुळे हेलन सैरभर झाली, गोंधळून जाऊ लागली आणि अगदी स्वाभाविकपणे अत्यंत हट्टी बनली.
 
हेलनसमोर आख्खं आयुष्य 'आ' वासून उभं होतं. तिच्या आईवडिलांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला. तिला यातून बाहेर कसं काढायचं हे त्यांना कळेना. काय करावं या विचारविनिमयातच काही काळ गेला. हेलन ६ वर्षांची असताना तिची आई चार्ल्स डिकन्सचे 'काही अमेरिकन टिपणे' हे पुस्तक वाचत असताना तिला बोस्टन अंधशालेविषयी माहिती मिळाली. अंध-मूक-बधिर असूनही आपापले काम करू शकणाऱ्या लॉरा ब्रिजमनबद्दल कळलं. हेलनच्या आईवडिलांनी सर्वप्रथम टेलिफोनचे जनक अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल यांची भेट घेतली. त्यांनी हेलनच्या आई-वडिलांच्या मनातली नैराश्याची जळमटे दूर केली. त्यांनी पर्किन्स अंधशाळेशी संपर्क साधला. त्यांच्याकडून अॅन सलीव्ह्न या शिक्षिकेची नेमणूक झाली. अॅनची स्वतःची दृष्टीही आधी काम करत नव्हती पण नंतर शस्त्रक्रियेमुळे तिला विशिष्ट मर्यादेपर्यंत दृष्टी प्राप्त झाली होती.
 
अॅन : एक आधारस्तंभ
 
अॅन जणू हेलनचे भविष्य उजळून टाकायलाच या जगात आली होती. तिने अत्यंत कुशलपणे हेलनला समजवायला सुरुवात केली. सुरुवातीला तिचा तिरस्कार करणारी हेलन तिच्या मायेत गुंतत गेली. खूप लहानपणी हेलनच्या प्रमुख संवेदनांचे दरवाजे बंद झाले असल्याने शब्द म्हणजे काय, स्वर म्हणजे काय याबद्दलच्या तिच्या संकल्पनाच विकसित झाल्या नव्हत्या. निरनिराळ्या संवेदना आणि संकल्पना यांचं आकलन करून देण्यासाठी अॅनने अनोख्या क्लृप्त्या वापरायला सुरुवात केली. बागेतल्या पंपातून धो धो पडणाऱ्या पाण्यात हेलनचा हात धरला आणि मग तिच्या तळहातावर खूण केली. पाणी आणि तळहातावर केली जाणारी विशिष्ट खूण याचा यांचं काहीतरी नातं हेलनच्या असल्याचं लक्षात आलं. 'शब्द म्हणजे काय' याची अनुभूती हेलनला कशी झाली हे दर्शवणारा हा प्रसंग मुळातूनच वाचण्यासारखा आहे. अॅनमुळे हेलनचे मातीच्या गोळ्यासारखे आकारहीन आयुष्य सुबक आकार धारण करू लागलं आणि जात्याच कुशाग्र असलेली हेलन पाहता पाहता एका ज्ञानकुंभात परिवर्तित झाली.
 
हेलन अविश्वसनीय गतीने शिकत गेली. तळहातावरच्या खुणा, ब्रेल लिपी यांच्या सहाय्याने ती कल्पनेच्या भराऱ्या घेऊ लागली. संपूर्णपणे अज्ञात असणाऱ्या रंगांविषयी तिने स्वतःचे संकेत बांधले आणि चक्क वरुणराजाची सुंदर कथा लिहिली ! शिकता शिकता तिने फ्रेंच आणि जर्मन भाषाही अवगत केल्या. अंध-बधिर लोकांच्या समस्या तिला स्वानुभवाने कळल्याच होत्या पण त्यांच्यासमोरच्या आणखी अडचणींची माहिती तिने स्वतःहून वाचन आणि पत्रलेखन करून मिळवली. जगातल्या अनेकांशी पत्रमैत्री केली. या सगळ्यात अॅनचा सिंहाचा वाट होता. स्वतःच्या अधू दृष्टीची पर्वा न करता तिने आपले आयुष्य हेलनसाठी अक्षरशः समर्पित करून टाकले होते.
 
हेलन : एक दीपस्तंभ
 
हेलनच्या प्रयत्नांमुळे अंधांच्या समस्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्या. 'अमेरिकन फाऊंडेशन फॉर ब्लाइंड' ही देशव्यापी संस्था उदयाला आली. हेलनने रॅडक्लिफ कॉलेजमध्ये जिद्दीने प्रवेश घेतला. जे कॉलेज तिला प्रवेश नाकारत होते त्याच कॉलेजातून तिने सर्वसाधारण मुलींप्रमाणे चार वर्षात चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण केली. हेलनने अस्पष्ट का होईना पण ऐकता येऊ शकेल अशा आवाजात बोलण्यात यश मिळवले. बोलणाऱ्याच्या गळ्याची कंपने, जीभ व ओठांची हालचाल यांना स्पर्श करून त्यातून शिकण्याचा थक्क व्हावा असा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखवला ! तिच्या भाषणाला नेहमीप्रमाणेच अॅनचे मोलाचे सहकार्य लाभले. हेलनने स्वतः वरच्या चित्रपटात व रंगभूमीवरही कामे केले. जगभर फिरून जागृती केली. अंध-बधिरांचे प्रश्न सर्वपरिचित झाले. अनेक मदत संस्था उभ्या राहिल्या. एका आयुष्यात एवढे सगळे केले हेलनने ! 
 
या पुस्तकाची भाषा सोपी पण प्रवाही आहे. पण फार मोठे नसल्यामुळे हेलनच्या बालपणीच्या प्रगतीची धावती ओळखच करून घ्यावी लागते. त्यामुळे तिची प्रगती फारच भरभर झाल्याची भावना होऊ शकते. त्यातल्या त्यात हीच एक उणीव या पुस्तकात आहे. रविमुकुल यांनी चितारलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ अगदी अर्थपूर्ण आहे. अंधांच्या लाल-पांढऱ्या काठीला हिरवी पालवी फुटलेली दाखवली आहे . जिद्द आणि आशेचं प्रतीक!
 
एका सर्वाथाने पराधीन स्त्रीचा स्वयंपूर्णतेकडे झालेला हा प्रवास वाचून अक्षरशः निःशब्द आणि नतमस्तक व्हायला होतं. तिच्या जिद्दीला आणि अॅन सालीव्हानच्या जिद्दीला करू तेवढा कुर्निसात कमीच ठरेल. गुरुपौर्णिमेला आपण जेव्हा गुरू-शिष्यांचं स्मरण करतो तेव्हा आधुनिक जगातल्या अॅन आणि हेलन या जोडगोळीला विसरून चालणारच नाही !
 
 
पुस्तक: आंधळी
लेखिका: कॅथरीन पीअर्स
अनुवादिका: शांता शेळके
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती: सहावी
पृष्ठसंख्या: १६०
मूल्य : १४०
 
 
 
 
- प्रसाद पाठक 
 
@@AUTHORINFO_V1@@