लीलया उडुनी गगनात...

    19-Jun-2018   
Total Views | 51



वायुदलात दाखल व्हायचं तिचं लहानपणापासूनचंच स्वप्न होतं. वैमानिक होणं हे केवळ वैयक्तिक आवडीपुरतंच राहू नये, तर त्यातून देशाचीही सेवा घडावी या दुहेरी हेतूने तिने वायुदलात जाण्याचं निश्चित केलं.

 

कर्नाटक राज्यातील चिकमंगळूर हे पश्चिम घाटातल्या मलयगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं भारतातलं एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ. इथली आल्हाददायक हवा, हिरवाईने नटलेल्या टेकड्या, धबधबे कर्नाटकातल्याच नव्हे, तर संपूर्ण भारतातल्या पर्यटकांना येथे आकर्षित करतात. हे ठिकाण खास करून प्रसिद्ध आहे कॉफीच्या मळ्यांसाठी. अलीकडे हे गाव प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे ते एका २३ वर्षीय मुलीमुळे. मेघना शानभाग या चिकमंगळूर गावातील युवतीने एक नवा इतिहास रचला आहे. भारतीय वायुदलामध्ये लढाऊ वैमानिक होणारी ती कर्नाटक राज्यातली आणि संपूर्ण दक्षिण भारतातली पहिली महिला लढाऊ वैमानिक ठरली आहे, तर संपूर्ण भारतातली ती सहावी लढाऊ वैमानिक ठरली आहे.

 

मेघनाची आई सी. व्ही. शोभा या डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरममध्ये न्यायाधीश, तर वडील एम. के. रमेश वकील आहेत. कर्नाटकातल्या चिकमंगळूर गावात जन्मलेल्या मेघनाचं इयत्ता चौथीपर्यंतचं शिक्षण गावातच ‘महर्षी विद्यामंदिर पब्लिक स्कूल’ येथे झालं. त्यानंतर इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी तिला उडपी येथील ‘लिटल रॉक इंडियन स्कूल’ येथे ठेवले. चौथीत असतानाच मेघनाने गावाच्या बाहेर पडून चांगले शिक्षण घेण्याचा आग्रह धरला होता. तिची अभ्यासू आणि एकाग्रचित्त वृत्ती त्यांनी हेरली होती. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखा तिला डॉक्टर वा सामान्य इंजिनिअर होण्याची इच्छा मुळीच नव्हती. जीवनात काहीतरी आव्हानात्मक करायचं तिच्या मनाने ठरवलं होतं. आकाशात उडून पक्ष्यांसारखा मुक्त संचार करण्याची तिची महत्त्वाकांक्षा होती. ती अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी म्हैसूर येथील ‘जेएसएस सायन्स अॅचण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी’ या महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी रुजू झाली. हा मेघनाच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. तिथे शिक्षण घेत असताना तिने ‘साहस’ नावाचा एक क्लब सुरू केला. या क्लबच्या माध्यमातून ती गिर्यारोहण, नौकानयन, पॅराग्लायडिंगसारखी अनेक साहसी कृत्ये आयोजित करायची. यामुळे तिच्या वायुदलात दाखल होण्याच्या स्वप्नाला अधिक बळ मिळत गेलं. तिने मनाली येथे गिर्यारोहणाचा तर गोव्यामध्ये पॅराग्लायडिंगचा बेसिक कोर्स केला. वयाच्या विसाव्या वर्षी, अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला असताना तिने पहिल्यांदा एकट्याने पॅराग्लायडिंग केलं. येथे तिची वायुदलात काम करणाऱ्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी भेट झाली, ज्यांच्याकडून तिला बहुमोल मार्गदर्शन मिळत गेलं. या महाविद्यालयातून तिने ‘इन्फॉर्मेशन सायन्स’ या विषयात अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. वायुदलात दाखल व्हायचं तिचं लहानपणापासूनचंच स्वप्न होतं. वैमानिक होणं हे केवळ वैयक्तीक आवडीपुरतंच राहू नये, तर त्यातून देशाचीही सेवा घडावी या दुहेरी हेतूने तिने वायुदलात जाण्याचं निश्चित केलं. २०१६ साली मोहना सिंग, भावना कांत आणि अवनी चतुर्वेदी या तीन महिला जेव्हा भारतीय वायुदलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त झाल्या, ती घटना मेघनासाठी खूप प्रेरणादायी ठरली. खरं तर ती संपूर्ण भारतासाठीच प्रेरणादायी घटना होती. आपणही लढाऊ वैमानिकच व्हायचं हा तिचा निश्चय पक्का झाला.

 

दृढनिश्चय जरी असला तरी तिथपर्यंत पोहोचायचा मार्ग सोपा नव्हता. अत्यंत खडतर अशा ’AFCAT' (Air Force Common Admission Test) आणि ’SSB' (Services Selection Board) या दोन परीक्षा ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. जानेवारी २०१७ मध्ये भारतीय हवाईदल अकादमीमध्ये ती ‘फ्लाईट कॅडेट’ म्हणून रुजू झाली. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात तिने पहिलं वैयक्तिक उड्डाण केलं. तिने आत्तापर्यंत ‘पिलाटस’, ‘किरण’ ही विमाने चालवली आहेत. गेल्या शनिवारी दि. १६ जून रोजी ११३ विद्यार्थ्यांमधून तिची भारतीय वायुदलात लढाऊ वैमानिक म्हणून नेमणूक झाली. बिदर येथे तिला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलं आहे. आता ती ‘हॉक’, ‘फायटर जेट’ विमान चालविण्यास पात्र होईल. यामध्ये तिला विमान चालवणं, आयत्या वेळी दिशा बदलणं, विमानातून लक्ष्यावर अचूक बॉम्बफेक करणं इत्यादी गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जाईल. भाविष्यात कधीतरी एकदा ‘राफेल’ विमान चालवायला मिळणं, हे आपलं अंतिम ध्येय असल्याचं ती सांगते.

 

हवाईदलाची निर्मिती झाल्यापासून आत्तापर्यंत या क्षेत्रात पुरुषांचीच मक्तेदारी राहिलेली आहे. मात्र, महिला आता ही मक्तेदारी मोडून काढत आहेत. महिलांसाठी हेही एक करिअरचं क्षेत्र असू शकतं, हे मेघनाने सिद्ध करून दाखवलं आहे. ही बाब भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी खरंच आशादायी म्हणावी लागेल. स्वयंप्रेरणेने युवा महिलांनी या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे भारतीय वायुदलाची क्षमता नक्कीच वाढेल. मेघना शानभागचं हे उदाहरण भारतीय संरक्षणव्यवस्थेमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारं आहे.

हर्षद तुळपुळे

मूळचा अणसुरे,जि. रत्नागिरी रहिवासी. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चौदावीपर्यंत शिक्षण, मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन. शेती, पर्यावरण विषयांची विशेष आवड. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..