महिला तस्करी रोखण्यासाठी सर्व स्तरांतून पुढाकार आवश्यक - देवेंद्र फडणवीस

    18-Jun-2018
Total Views | 17
 
 
 
 
 
मुंबई : महिलांची तस्करी हा जगातील दुसरा सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय आहे. शिवाय पुढील १० वर्षात हा व्यवसाय अमली पदार्थ व्यवसायाच्या पुढे जाऊन जगातील सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय होण्याची भीती आहे. कोणत्याही परिस्थितीत हे आपल्याला रोखावे लागेल. यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करुन महिला आयोग, इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्यासह जगातील विविध देशांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
 
 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशनच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला तस्करी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसाच्या या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
विविध देशातील प्रतिनिधी सहभागी
 
 
उद्घाटन प्रसंगी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, अभिनेता अक्षय कुमार, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे सीईओ गॅरी हॉगेन, सेकंड लेडी ऑफ घाना हाजीया समीरा बाऊमिया उपस्थित होत्या. जुहू येथील जे डब्लू मॅरियेटमध्ये आज व उद्या होणाऱ्या या परिषदेत मानवी हक्क, बाल हक्क, महिलांचे अधिकार आदी विषयात कार्य करणारे विविध देशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. 
 
 
आयटीचा प्रभावी वापर आवश्यक
 
 
मुख्यमंत्री म्हणाले की, मानवी तस्करीत आतापर्यंत फक्त गरिब, वंचित घटक फसत होते. पण आयटी तंत्रज्ञानाच्या काळात आता सधन, सुशिक्षित घरातील मुलीही फसल्या जात आहेत. यातील गुन्हेगार हे आयटीमधील मास्टर असतात. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी आपल्यालाही तितक्याच प्रभावी उपाययोजना व आयटीचा फार प्रभावी वापर करावा लागेल. महिलांच्या तस्करीचा गुन्हा राज्य आणि देशांच्या सीमा भेदून केला जातो. त्यामुळे हे रोखण्यासाठी सर्व देशांचा एकत्रित पुढाकार महत्वाचा आहे. तसेच यातून सुटका झालेल्या महिलांचे चांगले पुनर्वसन होणे गरजेचे आहे. मानसिक समुपदेशन होऊन त्या मूळ प्रवाहात सामील होईपर्यंत आपणास प्रयत्न करावे लागतील.
 
 
१२ जिल्ह्यांमध्ये विशेष सेल स्थापन
 
 
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात ज्या १२ जिल्ह्यांमध्ये मानवी तस्करीचे प्रमाण अधिक आहे, ते रोखण्यासाठी विशेष सेल स्थापन करण्यात आले आहेत. याशिवाय या गुन्ह्यांचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात आली आहे. यापुढील काळातही महिला तस्करीच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील.
 
 
ऑपरेशन मुस्कान आदर्श मॉडेल
 
 
बालकांची तस्करी रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत मुंबई पोलिसांनी साधारण १० हजार बालकांची सुटका केली. बालतस्करी रोखण्याचे हे एक आदर्श मॉडेल असून त्याचा इतर राज्य आणि देशांमध्ये उपयोग व्हावा. राज्यात बालतस्करीचे प्रमाण ४० टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आले आहे. या परिषदेतून पुढे येणारे निष्कर्ष, सुचविण्यात येणाऱ्या उपाययोजना यांची राज्य शासन निश्चित अंमलबजावणी करेल, असे त्यांनी सांगितले. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121