जगाच्या पाठीवरच्या सर्व मनुष्यसमूहांचे आपापले नियम, रीतीरिवाज असतात. वर्षानुवर्षं ते पाळले जातात तेव्हा आपोआपच त्यांची परंपरा बनते. अमुक गोष्ट करणं योग्य, अमुक गोष्ट करणं म्हणजे चुकीचं अशा गोष्टी अशा परंपरांमधून रूढ झालेल्या असतात. काळाच्या ओघात अनेक अशा परंपरा कुठलेही बदल न करता चालू असतात आणि मनुष्यसमूहातले बहुतांश लोक ते कर्तव्य असल्याप्रमाणे कुठल्याही चिकित्सेशिवाय चालूच ठेवतात. बहुतांश समाजात महिलांचं असणारं स्थान हे असंच कुणीतरी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे चालत आलेलं. घरदार सांभाळण्यापलीकडे त्यांनी दुसरं काही करू नये अशी समजूत रुजलेली. पण अशा वातावरणातच काही स्त्रिया अशा आत्मविश्वासाने उभ्या ठाकतात की त्यांचं आव्हान केवळ नाकं मुरडणाऱ्या समाजालाच नव्हे तर चालत आलेल्या परंपरांनाही मिळत असतं. अनेक वर्षं ‘एका विशिष्ट पठडीतली कामंच बायकांनी करावी, पुरूष करत असलेली कामं करण्याच्या फंदात त्यांनी पडू नये’ अशा समजुती प्रगत प्रदेशातही मोठ्या प्रमाणात आढळून यायच्या. पण तरीही ठिकठिकाणच्या स्त्रियांनी या सगळ्यांतून आपलं स्थान निर्माण केलं. विशेष म्हणजे त्यासाठी कुठलाही आक्रस्ताळेपणा न करताही त्या कमालीच्या विश्वासाने उभ्या राहिल्या आणि आपोआपच अशा नव्या वाटा तयार झाल्या, ज्या मागून येणाऱ्यांना कायम खुणावत राहणार आहेत. अमिलिया एयरहार्ट हे एक उदाहरण आहे की जिने पुरुषप्रधान असणाऱ्या वैमानिक क्षेत्रात एवढी विलक्षण चमक दाखवली की ते पाहून कित्येक महिलांनी आकाशात भरारी घ्यायची स्वप्नं पाहिली. प्रस्तुत पुस्तक अमिलियाच्या गगनभरारीचा प्रवास मांडतं.
पुस्तकाची सुरुवात होते २० मे १९३२ या दिवसाने. हा असा दिवस होता ज्या दिवशी अनेक जण – ज्यात महिलाही होत्या - अमिलियाला वैमानिक म्हणून एवढा मोठ्ठा प्रवास कसा झेपणार नाही याबद्दल भरपूर चर्वण करत होते, वर्तमानपत्रांतून लेख लिहित होते. पण त्याच दिवशी अमिलिया एयरहार्ट एक विलक्षण धाडस करत होती.... त्या दिवशी ती एकटीच आपल्या विमानाने चक्क आख्खा अटलांटिक पार करायला निघाली होती. जणू समुद्र लांघून जाणारी हनुमान उडीच मारायला सज्ज होत होती. यापूर्वी एकाही महिला वैमानिकाने अटलांटिक यशस्वीपणे पार केलेला नव्हता... पण एवढ्या मोठ्या टप्यापर्यंत अमिलिया आलीच कशी? फ्लॅशबॅक सुरू होतो आणि हळूहळू तिची वाटचाल आपल्यासमोर उलगडू लागते.
१८९० चे दशक म्हणजे अमेरिकाही पारंपरिक मतांची होती असा काळ. या दशकाच्या उत्तरार्धात अमिलियाचा जन्म झाला. लहानपणापासून ती अतिशय चुणचुणीत आणि धीट होती. फांद्यांना लोंबकळण्यापासून ते घराच्या छपरावरून फळीवरून घसरत खाली येण्यासारखे अनेक अचाट धाडसी प्रकार ती करायची. हाच हिकमती स्वभाव तिला खूप वेगळ्या कार्यक्षेत्रात घेऊन गेला. खरं म्हणजे तिच्या घरचं वातावरण अतिशय अस्थिर होतं. वडिलांची कुठलीही नोकरी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना सतत नोकरी शोधत फिरावं लागायचं. त्यामुळे अमिलिया, तिची बहीण आणि आई यांना अतिशय अस्थिरतेत जीवन व्यतीत करावं लागलं. अशा परिस्थितीशी दोन हात करता करता अमिलिया आपोआप अधिकच कणखर बनली. त्याच सुमारास तिला सायनसने ग्रासलं. त्यासाठी दोन-तीन वेळा नाकावर शस्त्रक्रिया करूनही तिच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही. शिक्षण आणि चरितार्थ यांसाठी नोकरी करावी लागली. पण पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात आपण पाय रोवायचे हा निश्चयही याच काळात होत गेला. नर्सिंगचं शिक्षण घेऊन कॅनडात कामासाठी गेलेल्या अमिलियाने कॅनेडियन नॅशनल एक्स्पोझिशनच्या प्रदर्शनात दाखवलेली विमान उड्डाणांची प्रात्यक्षिकं पाहिली आणि तिला लक्षात आलं की हेच आपलं खरं आवडीचं क्षेत्र जे आपल्या धाडसी वृत्तीला पुरेपूर न्याय देईल!
यापुढे मात्र तिने अतिशय कष्टाने पैसे जमवून वैयक्तिक प्रशिक्षक नेमून विमानोड्डाणाचं शिक्षण घेतलं, एवढंच नाही तर स्वतःचं छोटंसं विमानही घेतलं आणि आपल्या भराऱ्यांनी ती एकेक विक्रम प्रस्थापित करू लागली. मुळातच अतिशय छोट्या असणाऱ्या महिला वैमानिकांच्या क्षेत्रासंबंधी सर्व विक्रम स्वतःच्या नावावर केले. अधिकाधिक उंच जाण्यात तिला विलक्षण थ्रिल वाटू लागलं होतं. याच दरम्यान तिला एक सुवर्णसंधी मिळाली ती म्हणजे अटलांटिक प्रवासाची. खरं म्हणजे या प्रवासात तिला विमान चालवायचं नव्हतं तर अटलांटिक पार करणाऱ्या दोन पुरूष वैमानिकांसोबत केवळ प्रवास करायचा होता. तो केल्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यातूनच ‘एकटीने विमान उडवून अटलांटिक पार करायचाच’ या जिद्दीची ठिणगी पडली. पुरुषप्रधान क्षेत्रात त्यांच्या तोडीस तोड काम करायला लागल्याने तिला विलक्षण आत्मविश्वास मिळाला. फक्त महिला वैमानिकांसाठी असणाऱ्या थरारक विमानशर्यतीतही तिने भाग घेऊन छाप पाडली.
एवढ्यावरच थांबेल तर ती अमिलिया कसली! एक प्रचंड झेप घेऊन तिने अटलांटिकही पार केला! हा अनुभव एखाद्या चित्रपटाहून थरारक आहे. एका उड्डाणात येऊ शकतील असे सर्व अडथळे – खराब वातावरण, तांत्रिक बिघाड, नियंत्रणाबाहेर गेलेल्या विमानाच्या गिरक्या – तिने अनुभवले पण या सगळ्यावर मात करून ती अटलांटिक पार करणारी पहिली महिला वैमानिक बनली. आता तिच्या उंच भराऱ्यांना आभाळही ठेंगणं वाटायला लागलं होतं. म्हणून तिने मोहिम आखली ती जगप्रदक्षिणा करण्याची.... आणि ती निघाली चांगल्या नेव्हिगेटरला घेऊन पृथ्वीप्रदक्षिणेला.... या प्रवासात तिने भारतालाही भेट दिली... ती आत्मविश्वासाने निघाली होती खरी पण शेवटचा टप्पा आला तोपर्यंत तिची तब्येत खालावली होती, तिच्याजवळचे इंधन संपत आले.. प्रशांत महासागरातील बेटावरच्या नियंत्रणकक्षाला तिचे संदेश ऐकू येईनासे झाले.... अतिशय कठीण अशी ही मोहिम तिने जवळपास ९५% पार करत आणली असताना एक भयंकर संकट तिच्यावर घोंघावू लागलं होतं... याची परिणती काय झाली? पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला का? ती त्या तळावर सुरक्षितपणे उतरली का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर पुस्तकच वाचायला हवं.
पुस्तक वाचत असतानाही काही गोष्टी विशेषत्वाने जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोड्याफार फरकाने सर्वत्र सारखाच असतो. “बाईला कुठे जमणार आहे असली कामगिरी” हा सूर अमेरिकेतही उमटावा याचं नवल वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे असं असूनही ठामपणे उभी राहिलेली एक स्त्री ही पुरुषांपेक्षाही मोठा ‘आयकॉन’ बनू शकते हे जाणवतं. आधी तिचा सहकारी आणि मग नवरा झालेल्या जॉर्जने तिच्या अनेक कामगिऱ्यांचं कौशल्याने मार्केटिंग केलं हे खरं असलं तरी त्यामुळे ‘एक स्त्री एवढी झेप घेऊ शकली’ याबद्दल लोकांकडून झालेलं कौतुक दुर्लक्षित होऊ शकत नाही. समाज अशा आदर्शांच्या कायमच शोधात असतो आणि आपल्यातल्याच वाटणाऱ्या कुणीतरी असं काही करून दाखवतो तेव्हा पाठोपाठ प्रवासाला निघणारे खूप जण निर्माण होतात.
पुस्तकात उणीव म्हणावी अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे अनेक ठिकाणी सोपे मराठी प्रतिशब्द वापरणं शक्य असूनही बरेच इंग्रजी शब्द वापरले गेले आहेत. ते खटकत राहतात. पुस्तकाची सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे अमिलियाच्या गुणांसोबतच सतत नवनव्या विक्रमाच्या विचारांनी पछाडलेल्या तिच्या स्वभावातल्या उणीवा, धाडस आणि बेफिकिरी या दोन्हीमधल्या सीमारेषेवर तिचं चालणं, सखोल तांत्रिक ज्ञानाकडे तिने केलेलं दुर्लक्ष अशा गोष्टी लेखिका स्पष्टपणे नमूद करते. त्यामुळे पुस्तक वाचून होताना एक व्यक्ती म्हणून अमिलिया बऱ्याच बाजूंनी दिसू शकते. हे पुस्तक अगदी छोटेखानी असलं तरी इतिहासावर अमीट छाप पाडणाऱ्या एका व्यक्तिमत्वावर असल्याने ते चुकवू नये.
पुस्तक: अमिलिया एयरहार्ट
लेखिका: कीर्ती परचुरे
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या : ६८
किंमत: ५० रू
आवृत्ती: प्रथम (२०१४)