इसिसने माघार घेत असल्याची चित्रफीत प्रसारित केली असली, तरी मानवजातीचे शत्रू असलेली इसिस विश्वासघाती, खोटारडी, फसवी असणारच व त्यात युद्धात विश्वासघात, खोटे बोलणे, हूल देणे, फसवेगिरी करणे हे सारेच अंतर्भूत असते. त्यामुळे माघार घेतो असे भासवले असले, तरी आधीच काही इसिस जिहादी कोबानमध्ये लपून बसले होते, त्याव्यतिरिक्त अजून काही इसिस अतिरेकी वायपीजी व सीरियन फ्री आर्मीच्या गणवेशात सोंग घेऊन, पाच गाड्यांमधून सीमारेषा पार करून, कोबानमध्ये घुसले. कोबानमधील मिश्तानुर रुग्णालयात, माध्यमिक शाळेत व रशद मशिदीजवळील दोन इमारती या चार ठिकाणी इसिसचे जिहादी दबा धरून बसले होते. मात्र नक्की किती जिहादी होते याची निश्चित माहिती कळू शकत नव्हती. त्यांनी शंभर नागरिकांना ओलीस ठेवले होते. आधी त्यांनी तीन आत्मघाती कारबॉम्ब्सच्या सहाय्याने हत्याकांडास सुरुवात केली व नंतर गोळीबार तसेच क्षेपणास्त्र हल्ले केले. इसिस अतिरेक्यांनी २४ तासांत १२० नागरिकांची हत्या केली. युनायटेड किंगडमस्थित Syrian Observatory for Human Rights अनुसार यात महिला व बालकांचीही हत्या करण्यात आली. घरी व रस्त्यावर त्यांचे मृतदेह पडलेले आढळले. आग्नेय व नैऋत्य प्रवेशद्वाराजवळील इमारतींमध्ये इसिस जिहादी दबा धरून बसले होते. कोणीही कुर्द प्रवेश करताच, त्याच्यावर सर्व बाजूंनी अंदाधुंद गोळीबार करत होते.
१. बाखा बोटान या कुर्दिश गावात २० नागरिकांना मारले.
शत्रूच्या हल्ल्याने भांबावून, गडबडून किंवा गोंधळून न जाता, संयम राखून, शत्रूची हल्ल्यामागील मानसिकता ओळखणे युद्धशास्त्रात फार आवश्यक असते. छत्रपती शिवाजी महाराज शत्रूची मानसिकता ओळखून, त्यानुसार प्रत्युत्तर देण्यात व शत्रूचे नुकसान करून, त्याला जबरदस्त मानसिक धक्का देण्यात वाकबगार होते. शाहिस्तेखानावरील हल्ल्यात आपल्याला ही युद्धनीती प्रकर्षाने दिसून येते. इसिसच्या या हल्ल्यामागची मानसिकता ओळखणे महत्त्वाचे होते. वायपीजीने ही मानसिकता अचूक ओळखली, त्यामुळे वायपीजी प्रवक्ता रेडुर झेलिल म्हणाला की, 'इसिस कोबानवर नियंत्रण किंवा त्यावर ताबा मिळवण्यासाठी नव्हे, तर जास्तीत जास्त नागरिक मारण्यासाठी सामूहिक आत्मघाती हल्ले करत आहेत.' कारण या हत्याकांडात वायपीजी किंवा सहकारी सैनिकांपेक्षा इसिसने नागरिकांवर हल्ले केले होते. युद्धाच्यावेळी बहुतांश नागरिक कोबान सोडून गेले होते व ते आता युद्धात कुर्दांचा विजय झाल्यामुळे आपापल्या घरी परतत होते. जर युद्ध जिंकायच्या उद्देशाने हल्ले केले असते, तर नागरिकांपेक्षा वायपीजी किंवा सहकारी सैनिकांना लक्ष केले असते. तसेच येथे विजयी झालेली सेना लगेच दुसऱ्या इसिसच्या अधिपत्याखालील प्रदेशावर चढाई करण्यासाठी जाऊ नये, यासाठी त्यांचे लक्ष पुन्हा कोबानकडे वळविणे गरजेचे होते या उद्देशानेही हे हत्याकांड केले जात होते.
२. कुर्दांनी आता लपलेल्या इसिस जिहादींना एकेक करून शोधून, टिपायला सुरुवात केली व अखेर कोबानमधील हे युद्ध २९ जूनला कोबानमधील शेवटच्या इसिस अतिरेक्याच्या हत्येने संपुष्टात आले. या हत्याकांडात २२० नागरिक व ३५ लढाऊ वायपीजी सैनिक मारले गेले व तीनशे दुखापतग्रस्त झाले. इसिसने केलेल्या हत्याकांडांपैकी एक मोठे हत्याकांड म्हणून हे कोबानचे हत्याकांड ओळखले जाते. अशा तऱ्हेने कोबान पूर्णपणे कुर्दांच्या ताब्यात आले असून, कोबान रोजावाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
कोबान युद्धानंतर हळू हळू स्थानिक लोक परत कोबानमध्ये आपापल्या घरी परतू लागले. या युद्धात इसिसच्या हल्ल्यामुळे व वायपीजीचे प्रत्युत्तर, तसेच अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सहकार्यांचे हवाई हल्ले यामुळे जवळ जवळ ७०% प्रदेश उद्ध्वस्त झाला होता. राडारोडा व ढिगारा तर इतका झाला होता, की हे सर्व उचलायला त्यांच्याकडील अवजारे व यंत्रसामुग्रीच अपुरी पडत होती.
उद्ध्वस्त प्रदेशाची पुन्हा उभारणी करण्याचा खर्च अंदाजे १.५ अब्ज डॉलर इतका अपेक्षित होता. त्यामुळे कोबान पुनर्बांधणी मंडळाने आंतरराष्ट्रीय सहाय्याची विनंती केली. इराकी व तुर्क कुर्दांनी व विविध युरोपीय संघटनांनीही सहाय्यासाठी हात पुढे केले. कोबानवर हल्ले करताना शहराची कोंडी करण्यासाठी व लवकरात लवकर कोबान पडून, किंवा शरणागती पत्करून, आपल्या ताब्यात येण्यासाठी इसिसने कोबानचे पाणी व वीज तोडून टाकले होते. युद्धादरम्यान बरेचसे सामान्य नागरिक कोबान सोडून गेले होते, पण मागे कोबानच्या संरक्षणासाठी उभ्या ठाकलेल्या वायपीजीला पाणीटंचाई जाणवू लागली होती, तेव्हा युद्धपातळीवर तात्पुरती पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात आली होती, पण आता कोबानवासी परतू लागल्यावर ही तात्पुरती पाणीपुरवठा व्यवस्था अपुरी पडू लागली. त्यामुळे कायमस्वरूपाची पाणीपुरवठा व्यवस्था करून, किंवा जुनी व्यवस्था पुन्हा कार्यरत करणे आवश्यक होते. अशा संकटसमयी तुर्कस्तानातील अनधिकृत कुर्दिस्तानची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दियारबकीर महापालिकेने हे दायित्व स्वीकारून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नलिकांची दुरुस्ती करून, पाण्याची टाकी साफ करून, पाण्याचे पंप पुन्हा बसवून, कोबानचा पाणीपुरवठा सुरळीत करून दिला. वैद्यकीय सहाय्यासाठी कुर्दिश रेड क्रेसेंट संस्थेने 'कोबान रुग्णालय’ सुरू करून, वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली. युनिसेफसह बऱ्याच डॉक्टरांनी यात योगदान दिले.
हे कोबानचे युद्ध प्रचंड गाजले, पण भारतात या विषयीच्या बातम्या अपवाद वगळता प्रसारित झाल्याच नाहीत. 'रेडिओ कोबान’ या माहितीपटाला अॅनमस्ट्रडॅम, नेदरलँडच्या (IDF) आंतरराष्ट्रीय माहितीपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला.
संदर्भ:
१. ISIL on 24 - hour 'killing rampage' in Syria's Kobane, Al-Jazeera, 27 June 2015
२. Shaheen, Kareem. Kurdish forces besiege Isis fighters in Kobani after massacre of civilians, The Guardian, 26 June 2015