प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्राच्या अभ्यासात आणि प्रत्यक्ष मूर्तिकला निर्मितीच्या वेळी संयुक्त प्रतिमेतील देवी-देवतांची आसने, वाहने, शरीरमुद्रा, हस्तमुद्रा, मुखमुद्रा, चरणमुद्रा, आयुधे, शस्त्रे, वाद्ये, अवजारे, वस्त्र परीधानाचे रंग, पार्श्वभूमी या सर्वाचा फार सूक्ष्म विचार झाला होता. प्रतिमेतील देवता आणि सानिध्यातील अशा प्रत्येक सजीव अथवा निर्जीव प्रत्येक चिह्नाला निश्चित संकेत आहे आणि चिह्नार्थमूल्यही आहे.
चिह्नसंस्कृती या ज्ञानशाखेचा अभ्यास करताना प्रथम याचा एक विश्वमान्यता प्राप्त प्राथमिक दृष्टीकोन समजून घ्यायला हवा. जगातील कुठल्याही प्राचीन आणि प्रगत संस्कृतीमधील चिह्न आणि चिह्नसंकेतांचा अभ्यास हा नेहमीच तात्त्विक आणि सैद्धांतिक (speculative) स्वरूपाचाच असतो. यालाही काही निश्चित धोरण आणि कारण आहे. अशी चिह्नं आणि चिह्नसंकेत, कुठल्याही निश्चित नियमात बांधलेले नसतात. हिंदू धर्म मान्यताप्राप्त उपनिषदांमधे आणि जैन धर्म मान्यताप्राप्त जीनागोम अथवा लिखित साहित्यामधे, देवी-देवतांच्या या सर्व प्रतिमांच्या चिह्नसंकेत आणि चिह्नार्थमूल्यामधे वैविध्य आणि भिन्नता दिसते. विविध धर्म अथवा संप्रदायनिष्ठ समाजाचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन निश्चितपणे वेगळा असतो. या बरोबरच भिन्न व्यक्तिमत्वाच्या-भिन्न संस्कृतीतून आलेल्या दोन विद्वान अभ्यासकांचा दृष्टीकोनसुद्धा वेगळा असू शकतो.
प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्रातील संकेतांच्या संदर्भांनुसार, मूर्तींच्या सर्वं मुद्रांच्या भावदर्शनातून आणि देवी आणि देवतेच्या व्यष्टी वैशिष्ट्य पाहून, मूर्तींना नावे अथवा संबोधने दिली गेली.
योगमूर्ती : चिंतनशील अवस्थेत ध्यानधारणा करून आत्मप्रवृत्तीने-आत्मप्रेरणेने, आत्मसंयम प्राप्ती, एखाद्या विषयातील नैपुण्य, एखाद्या ज्ञानशाखेतील विशेष प्रगत अभ्यास, एखाद्या कलेतील प्राविण्यप्राप्ती, अशा दृढ इच्छेने काही देवातांसमोर साधना केली जाते. साधकाला अशा साधनेसाठी, उपासनेसाठी, लक्ष केन्द्रीत होणे म्हणजे योगमुद्रा धारण करणे आवश्यक असते, शांत वातावरणाची अपेक्षा असते. यासाठी गर्दी-गोंगाटापासून दूर डोंगरमाथ्यावर, नदीकाठी अथवा जंगलात अशा देवतांच्या मूर्तींची विधिवत स्थापना केली जाते. अशा मूर्तीना योगमूर्ती असे संबोधित केले जाते. उंच डोंगरावर, समुद्रकिनारी अथवा नदीकाठी महादेवाच्या अशा भव्य योगमूर्ती भारतात अनेक ठिकाणी स्थापित आहेत.
चित्र क्र १. ११२ फूट उंच, श्री आदियोगी महादेव मूर्ती, ईशा योग केंद्र, कोइम्बतूर, तमिळनाडू.
भोगमूर्ती : शहर आणि खेड्यातील भरवस्तीतील देवळांमधे आपल्या आवडत्या आराध्य देवतेच्या दर्शनासाठी कुटुंबकाबील्यासह सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातले उत्साही नागरिक आपण पहातोच. यातल्या प्रत्येकाला हा देव आपला वाटतो. प्रत्येक गावांतील श्री गणेशाच्या मंदिरातील असा अनुभव आपण सर्वांनी घेतलाच असेल. आनंदाची आणि उत्साहाची प्रेरक भावना सतत अशा मूर्तींमधे प्रसारित होत असते. अशा देवळांत नेहमीच चेतनादायी उत्साह असतो. हि असते आनंददायी भोगमूर्ती.
वीरमूर्ती : दसऱ्याला रामलीलेच्या मैदानात, धनुष्याला बाण लाऊन प्रत्यंचा ताणून उभी असलेली, लंकेवरील विजयमुद्रेतील श्रीरामाची मूर्ती प्रत्येकाने पहिलीच असेल. नवरात्री उत्सवात, मा शेरोवाली अर्थात महिषासुरमर्दिनी दुर्गादेवीची उग्रभाव धारण करणारी मुर्तीही अशीच वीरमुद्रेतील उत्सव विग्रह मूर्ती. अशा वीररस आणि वीरभावमुद्रेतील वीरमूर्ती शहराच्या मध्य वस्तीतील किंवा वेशीबाहेरील देवळांमधे मूळ विग्रह स्वरूपात स्थापित असतात.
चित्र क्र २. १३५ फूट उंच, वीर अभय अंजनेय हनुमान स्वामी मूर्ती, विजयवाडा, आंध्रप्रदेश.
उग्रमूर्ती : क्रोध, संताप, भ्रम, कपट, माया, लालसा, वासना अशा भावना व्यक्त करणारी मुद्रा. तोंडातून बाहेर आलेले धारदार सुळे आणि लवलवणारी जीभ, रागीट डोळे, पिंजारलेले केस, दोन्ही हाताच्या बोटांवर वाढलेली भयंकर नखे अशी खांबातून अवतीर्ण झालेली हिरण्यकश्यपुचे पोट फाडणारी नरसिंहाची मूर्ती, तिचेच हे वर्णन. शंकराच्या देवळातील नरसिंहाच्या उग्रमूर्तीची स्थापना नेहमी गाभाऱ्याच्या बाहेत पश्चिम दिशेला केली जाते. अशाच उग्र अवतारातील भगवान शंकर आणि त्याच्या अंगावर नाचणारी देवी काली. अशा उग्रमूर्ती सहसा देऊळ – मंदिरात स्थापन केलेल्या दिसत नाहीत. काही कारणाने गाव अथवा शहरात अशा उग्रमूर्तीची स्थापना केलीच तर तिच्या समोर शांतमूर्तीची स्थापना करावी अशी प्रथा आहे. बऱ्याच ठिकाणी शांतमूर्तीच्या ऐवजी पाण्याने भरलेली टाकी उग्रमूर्तीसमोर ठेवली जाते. अनेक वेळा गावाच्या ईशान्येला म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला अशा उग्रमूर्ती उभ्या केलेल्या दिसतात. चिह्नसंकेता नुसार, ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर-पूर्व हि गावाची सर्वात अंधारी जागा आहे. खगोलशास्त्र विज्ञान संकेतानुसार, सूर्य पूर्व दिशेला उगवून दक्षिणेकडे कलून पश्चिमेकडे जातो. अशावेळी पृथ्वीच्या उत्तर-पूर्व दिशेच्या कोपऱ्यात सूर्य फक्त २२ अंश कलतो यामुळे ही दिशा अंधारी रहाते. एका वास्तवाची नोंद इथे करायलाच हवी की श्रुती आणि स्मृतींच्या माध्यमातून अनेक सहस्त्र वर्षे संक्रमित झालेले काही संकेत, लोकश्रुती आणि लोकश्रद्धा बनल्या मात्र त्या निश्चितपणे प्राचीन विज्ञाननिष्ठेच्या मजबूत पायावर उभ्या आहेत.
अभिसारिकामूर्ती : सर्वसामान्य पापभिरू – कायद्याचे पालन करणाऱ्या समाजापासून दूर, काळी जादू-भावल्यांचा जादूटोणा अशा गूढ आणि अभद्र गोष्टीशी जोडली गेलेली हि अभिसारिकामूर्ती. वैयक्तिक शत्रूला धडा शिकवावा, त्याच्या मनात गोंधळ निर्माण करावा अशा अनिष्ट प्रथांसाठी वापरली जाणारी कापडापासून बनवलेली भावली असे या अभिसारिकामूर्तीचे स्वरूप असते. याची कुठेही देवळे – मंदिरे बनली नाहीत कारण समाजाने आणि कायद्याने याला अनिष्ट आणि बेकायदेशीर ठरवले आहे.
प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्रात, श्रद्धाळू दर्शकांच्या अशा प्रत्येक मानवी भावना आणि धरणांचा विचार झाला. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने बहुआयामी – बहुउद्देशी आणि सूक्ष्म संदर्भ लक्षात घेऊन मूर्तिशास्त्र फार प्रगत-प्रगल्भ झाले. प्रत्येक आराध्य देवी-देवतेच्या शरीरमुद्रेचे लक्षपूर्वक निरीक्षण करताना त्यात दर्शकसापेक्ष चिह्नसंकेतांचा निश्चित परिचय होतो. दर्शकाच्या आणि साधकाच्या चित्त आणि वृत्तींना या मूर्ती आणि प्रतिमा, प्रेरणा आणि चेतनेचा अखंडित पुरवठा करत असतात. अशा प्रतिमा उपासना आणि साधनेच्या माध्यमातून, दर्शक आणि साधकाच्या मानसिकतेची जडण-घडण करणारे हे फार प्रगत-प्रगल्भ प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्र.
अनेक देव-देवता, पद्मासनावर आसनस्थ झालेल्या दिसतात. अशुद्ध चिखलातून निर्माण होऊन स्वच्छ पवित्रतेकडे, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे, असे संकेत देणारे कमळाचे फुल आणि त्याचे पद्मासन, म्हणूनच आसन म्हणून स्वीकृत झाले. अशा आसनावर बसलेल्या देवी – देवतांच्या तीन शरीरमुद्रा अविर्भाव, तीन वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत. मांडी घालून पद्मासन मुद्रेतील मूर्ती, ती देवता सर्वश्रेष्ठ असण्याच्या अभिव्यक्तीचा संकेत आहेत.
भूमीला स्पर्श करणारा मूर्तीचा खाली सोडलेला एक पाय, दर्शकाप्रती संवेदना व्यक्त करतो. अशा मुद्रेतील वात्सल्यभाव असलेली करुणामय मूर्ती, भक्ताच्या दु:ख आणि अडचणीचे निवारण करण्यासाठी नेहमी पटकन धावून येईल अशा अभिव्यक्तीचा संकेत देत असते. श्री गणेशाच्या अनेक विग्रहांमध्ये जमिनीला स्पर्श करणारा एक पाय आपल्याला त्याच्या या अभिव्यक्तीचे संकेत देतो.
उभ्या शरीर मुद्रेतील मूर्ती, ती देवी-देवता, विश्वातील तिच्या अगणित-अनंत श्रेष्ठत्त्वाचे संकेत देते. साधकाची साधना आणि भक्ताच्या उपासनेचं पूर्ण आकलन करू शकत असल्याची क्षमता, ही या शरीरमुद्रेची अभिव्यक्ती आहे. अंतिमत: विश्वातील श्रेष्ठत्वाचे संकेत देतानाच हि खास शरीरमुद्रा, दर्शकाच्या आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाला जागृत करून त्याला कार्यप्रेरणा देते. पंढरपुरातील विटेवर उभ्या, श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्ती शतकानुशतके श्रद्धाळू वारकऱ्याना प्रेम आणि भक्तीची अखंड चेतना देत आहेत. देवी-देवतांची मूर्ती आणि दर्शक यांच्यातील मानसशास्त्रीयदृष्ट्या नाते निर्माण करणारे हे विलक्षण आणि वंदनीय प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्र...!!
- अरुण फडके