आईस्क्रीम. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचा वीकपॉईंट. ‘डॉक्टरांनी पथ्य पाळायला सांगितलंय,’ असं म्हणणारी मंडळीसुद्धा आईस्क्रीमवर तुटून पडतात. एकेकाळी तर लग्नामध्ये मेजवानी ऐवजी आईस्क्रीम देण्याची नवीन परंपराच सुरू झाली होती. या आईस्क्रीमचा नेमका शोध कधी लागला हे कोणालाच माहीत नाही. मात्र, अलेक्झांडर हिमकण आणि बर्फांचं मिश्रण करून, त्यात मध टाकून खायचा. रोमन सम्राट निरो क्लॉडियस हा तर धावपटूंना हिमपर्वतात पाठवत असे. त्यांनी आणलेलं हिम आणि त्यामध्ये फळांचा अर्क आणि सरबत यांचे मिश्रण करुन तो खात असे. ज्ञात इतिहासानुसार, फ्रान्स किंवा इटली या देशांकडे आईस्क्रीमच्या निर्मितीचे श्रेय जाते. १६६० पर्यंत हे आईस्क्रीम सर्वसामान्यांसाठी खुले नव्हते, तर तो एक शाही पदार्थ म्हणूनच सर्वज्ञात होता. सिसिलिओ प्रोकोपिओ यांनी पहिल्यांदा लोकांसाठी आईस्क्रीमची रेसिपी जाहीर केली. फेटलेलं दूध, क्रीम, लोणी आणि अंड अशा साध्या घरगुती घटकपदार्थांची ‘कॅफे प्रोकोप’ मधली सोपी रेसिपी होती ती. हा कॅफे पॅरिसमधला पहिला कॅफे होय.
भारतात कलकत्त्यातील ‘मॅग्नोलिया रेस्टॉरंट’मध्ये पहिल्यांदा आईस्क्रीम तयार होऊ लागले. एका इटालियन कॅटरर्सने ते तयार केले होते. व्यावसायिकदृष्ट्या आईस्क्रीम तयार करण्याचे श्रेय ‘क्वालिटी आईस्क्रीम’ला जाते. १९५६ साली त्यांनी आईस्क्रीम तयार करणारा कारखाना सुरू केला. आज भारतात अनेक आईस्क्रीम कंपन्या नावारूपास आल्या आहेत. त्यात मुख्यत: गुजराती, मारवाडी तर काही दाक्षिणात्य नावे आपल्याला पाहावयास मिळतात. मराठी ब्रॅण्ड तसा या क्षेत्रात दुर्मीळच. मात्र, आता एक नवीन मराठी उद्योजिकेचा ब्रॅण्ड आईस्क्रीमच्या क्षेत्रात उंचावू पाहत आहे. ’शोम्मी स्नो-आईस’ असं या ब्रॅण्डचं नाव आहे. विशेष कौतुक म्हणजे सुजाता हंचाटे या महिला उद्योजिकेचा हा ब्रॅण्ड आहे.
अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या सुजाता गावडे लहानपणापासूनच हुशार होत्या. सतत काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी होती. आई गृहिणी तर बाबा इंजिनिअर. बाबांचा आदर्श घेऊन, सुजातासुद्धा इंजिनिअर झाली. नोकिया मोबाईल कंपनीत काम करत असतानाच निलेश हंचाटे या सहकार्यासोबत मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि पुढे आयुष्यभरासाठी विवाहबंधनात अडकले. कहाणी इथेच संपत नाही, तर खर्या अर्थाने सुरु होते. निलेश हंचाटे यांनी सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये पदविका मिळवली. खरंतर पदवी मिळवायची होती. कुर्ल्यातील १०x१० च्या एका खोलीत आई, बाबा, भाऊ आणि बहीण असं निलेशचं कुटुंब राहत होतं. आई घरी शिवणकाम करून कसेबसे दोन हजार रुपये कमवायची, तर बाबा एका कंपनीत टेलर म्हणून काम करायचे. त्यांचा पगार ३०००-३५०० हजार रुपये होता. महिन्याला मिळकतच पाच हजार रुपयांची होती, तर इंजिनिअरिंगची फी जवळपास सात हजार रुपये होती. परिस्थितीमुळे शिकण्याच्या इच्छेला आवर घालावा लागला. डिप्लोमा केल्यावर वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांमध्ये निलेशने काम केलं. नोकियामध्ये सुजाता भेटली आणि पुढे लग्न झालं. नोकरी करत असतानाच आपलं स्वत:चं काहीतरी असावं हा विचार मनात रुंजी घालतच होता.
हे दोघेही मोबाईल हॅण्डसेट बनविणार्या एका तैवानच्या कंपनीत कामाला होते. कंपनी चांगलीच गाजत असताना बाजारपेठेतील आव्हानांना सामोरे न जाऊ शकल्याने बंद पडली. त्या कंपनीचा बॉस होता तो तैवानचा होता. त्याने भारतातील बाजारपेठेची क्षमता ओळखली होती. आपण इथल्या बाजारपेठेचा लाभ घ्यायचा असं ठरवून, त्याने एक आईस्क्रीम उत्पादन २००८ साली भारतात आणलं. त्यावेळेस सुजाता अन् निलेश दोघेही त्याच्यासोबत काम करत होते. काही तांत्रिक कारणास्तव कंपनी बंद करावी लागली. त्यानंतर त्याने रिफिल होणार्या बॅटरीज तैवानमधून भारतात आणल्या. मार्केटचा अंदाज चुकल्याने तो व्यवसायदेखील चालला नाही. तिसर्यांदा इकोफ्रेण्डली प्लास्टिकचे दाणे तयार करण्याचा कारखाना त्याने सुरु केला. दुर्दैव असं की, त्यातसुद्धा तो अपयशी ठरला. आपलं ‘तैवानंच बरं’ म्हणत तो परत आपल्या मायभूमीत परतला. एव्हाना सुजाता आणि निलेशला त्या आईस्क्रीमच्या उत्पादनात क्षमता दिसली.
दोघांनी एकत्र येऊन, त्यामध्ये संशोधन सुरू केलं. त्या उत्पादनाला भारतीय वातावरणाची जोड दिली आणि त्यातून निर्माण झालं अप्रतिम चवीचं, उत्तम दर्जाचं एक आईस्क्रीम. साधारणत: कोणतंही आईस्क्रीम आपण पाहिलंत तर तो निव्वळ क्रीमचा फेस असतो. म्हणजे ४० ग्रॅमचं आईस्क्रीम घेतलं, तर वितळल्यानंतर ते फक्त २० ग्रॅमच उरतं. इतर आईस्क्रीममध्ये म्हशीचं दूध वापरलं जातं ज्यामध्ये स्निग्धता जास्त असते. या सगळ्याचा अभ्यास करून, संशोधनानंतर निलेश-सुजाता यांनी एक आगळंवेगळं आईस्क्रीम सुरू केलं. ज्यामध्ये गायीचं दूध वापरलं जातं म्हणून फक्त ३.५ टक्केच त्यात स्निग्धता आढळते. तसेच ४० टक्के फळांचा अर्क वापरला जातो. यासाठी त्यांनी खास मशीन बनवून घेतले आहे. पावणे एमआयडीसी येथील कारखान्यात हे आईस्क्रीम तयार होते. पाच ते सहा दुकानांना आईस्क्रीम उपलब्ध असेल एवढे आईस्क्रीम तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. सध्या विलेपार्ले येथे ’शोम्मी स्नो-आईस’ नावाचं हंचाटे यांचं एकच दुकान आहे. या दुकानात १७-१८ फ्लेवर्सचे आईस्क्रीम मिळतात.
हा आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी निलेश हंचाटे यांनी ३०-४० लाख रुपये गुंतविले आहेत. त्यासाठी घर गहाण ठेवलं आहे. आपल्या उत्पादनात दम आहे ते यशस्वी होणारच हा या हंचाटे दाम्पत्यांना विश्वास आहे. त्यांना किमान सहा मराठी उद्योजक या वर्षी घडवायचे आहेत. त्यासाठी ते अगदी किफायतशीर दरात आपल्या फ्रँचाईझी सुरू करण्यास देणार आहेत. भविष्यात आपली आईस्क्रीम ही इतरांपेक्षा जास्त लोकप्रिय असेल याचा निलेश आणि सुजाता या दोघांनाही ठाम विश्वास आहे. त्यासाठी ते सध्या गुंतवणूकदाराच्या शोधात आहेत.
विलेपार्ले पश्चिमेसारख्या ग्लॅमरस ठिकाणी ‘शोम्मी स्नो-आईस’ दिमाखात सुरू आहे. एक मराठी ब्रँण्ड खर्या अर्थाने उभा राहत आहे. भविष्यात हा ब्रॅण्ड संपूर्ण जगात नावलौकिकास येईल अशी आशा वाटते.
- प्रमोद सावंत