“शंकरराव, मागच्या वेळी तुम्ही द्यौस् व पृथ्वी या जोडीतील फक्त द्यौस् पिता आणि त्याच्या पुत्रांबद्दल गोष्ट सांगितली. आज पृथ्वी माता आणि त्यांच्या कन्यांच्या बद्दल सांगा!”, दुर्गाबाईंनी मागणी केली.
“दुर्गाबाई, या दैवी जोडप्याच्या कथेचा पहिला भाग आपण मागच्या आठवड्यात पहिला. आज त्या कथेचा दुसरा भाग सांगतो. आजची गोष्ट आहे – पृथ्वी मातेची! द्यौस् अर्थात आकाश व पृथ्वी, हे अतिशय प्रेमळ पती - पत्नी आहेत ही पूर्वापार चालत आलेली कल्पना आहे. या दांपत्याला इंद्राने वेगळे करून त्यांच्या मध्ये वायुलोक निर्माण केला. ज्यामुळे पशु - पक्ष्यांना, वृक्ष - वेलींना वाढण्यासाठी व हिंडण्यासाठी जागा निर्माण झाली. परंतु, या मुळे पृथ्वी व आकाशामध्ये अंतर निर्माण झाले व ते दोघे विरहाने रडू लागले. ऋग्वेदात त्यांना ‘रोदसी’ म्हणजे रडणारे दोघे, असे म्हटले आहे.
“वैदिक साहित्यात ‘द्यावा-पृथ्वी’ असा या दांपत्याचा उल्लेख वारंवार येतो. द्यौस् आकाश पृथ्वीवर पावसाचा वर्षाव करतो, व त्यायोगे पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती होते, ही अति प्राचीन कल्पना आहे. द्यौस् व पृथ्वी हे सहजच सकल प्राणिमात्रांचे माता – पिता तर होतेच पण एक आदर्श जोडपे होते. आजही विवाहातील मंत्रांमध्ये, वर वधूला म्हणतो –
मी द्यौस् तू पृथ्वी आहेस, मी संगीत तू गीत आहेस, मी विचार तू शब्द आहेस! या प्रमाणे आपण दोघे एकमेकांना पूरक होऊन संसार करू. द्यौस् व पृथ्वी प्रमाणे एकोप्याने प्रेमाने संसार करू.” आबा सांगत होते.
“शंकरराव, या तर विवाहात वधू – वराच्या एकमेकांना पूर्णत्व देण्याच्या आणाभाका आहेत!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“खरे आहे दुर्गाबाई! अति प्राचीन काळापासून चालत आलेल्या पती-पत्नीच्या या शपथा आहेत.”, आबा म्हणाले.
“पण आबा, द्यौस् पिता तर अगदी विस्मृतीत गेलेला देव आहे, तर पृथ्वीमाता किंवा भूमाता मात्र आजही वंदनीय देवता आहे. असे कसे?”, सुमित म्हणाला.
“सुमित अरे, शेवटी काही झाले तरी ती ‘आई’ आहे! सर्वात श्रेष्ठ देवता आहे! अनादी काळापासून, केवळ मानवातच नाही तर सर्व प्राणीमात्रात आई सारखे दैवत आहे का सांग बरे?”, आबांनी विचारले.
“हम्म! आपल्याकडे ‘मातृ देवो भव:’ असे म्हणलेच आहे!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“बर! आबा, ‘द्यौस् पितृ’ चा ग्रीस मध्ये ‘झ्यूस पॅटर’, रोम मध्ये ‘ज्युपिटर’, आणि ख्रिस्ती धर्मात ‘The Father’ झाला. तसे पृथ्वी माता पण पाश्चिमात्य धर्मात होती का?”, सुमितने विचारले.
“सुमित, कसे झाले बघ - भारतात द्यौस् पिता, पृथ्वी माता आणि पुत्र मित्र म्हणजेच The Sky, The Earth and The Sun हे आद्य कुटुंब होते. तसेच ग्रीसमध्ये - झ्यूस पॅटर, लेटो माता आणि पुत्र अपोलो हे आद्य कुटुंब होते. ख्रिस्ती धर्मात यांचेच रूपांतर – The Father, The Son and Holy Spirit मध्ये झालेले दिसते. अगदी सुरुवातीला Spirit ही स्त्री देवता होती. पण या नवीन धर्मात स्त्रीचे स्थान अत्यंत गौण असल्यामुळे असेल कदाचित, Spirit चे रुपांतर पुरुष देवतेत झाले. सहजच या स्त्री विरहित गटाला ‘आद्य कुटुंब’ न म्हणता ‘तीन पुरुष देव’ अर्थात ‘Trinity’ म्हटले गेले. पण, हे रूपांतर केले तरी काही काही ठिकाणी मातेचा उल्लेख तसाच राहिला. जसे Gospel of Thomas मध्ये येशुच्या तोंडी वाक्य आहे -
For my mother bore my body, yet my True Mother gave me life. (Thomas 101) आबा म्हणाले.
“शंकरराव, एका प्रकारे Holy Spirit ला ‘देवाचे कार्य करणारी शक्ती’ म्हणणे म्हणजेच त्याची पत्नी आहे, असे म्हणाल्यासारखे झाले. शिव आणि शक्ती सारखे.”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“खरे बोललात दुर्गाबाई. या शक्तीला, जननीला उद्देशून एक सुंदर सूक्त आहे. बघा, द्यौस् पितासाठी वेदात एकही सूक्त नाही, पण पृथ्वी मातेसाठी एक सूक्त आहे. अथर्ववेदातील पृथ्वीसूक्तात ऋषी म्हणतो –
हे पृथ्वी! तू नदी व समुद्रातून सुजल धारण केले आहेस, हिरव्यागार शेतांनी तू नटली आहेस, तुझ्या मध्ये धान्य निपजते, पक्व फळांनी युक्त अशी तू सर्व प्राणीमात्रांचे भरण पोषण करतेस! माते, सर्व जीवांना शुद्ध जल व पौष्टिक आहार दे!
तुझ्या वरील वनराई, पर्वत रांगा व बर्फाने आच्छादित शिखरे आम्हास शक्ती देवोत! सर्व जीवांना सामावून घेण्याकरिता तू भरपूर जागेची निर्माण कर!
पृथ्वी मधून मी जेंव्हा झाडे, मुळे अथवा खनिजे खणून काढतो, तेंव्हा तेंव्हा ती पुनश्च लवकर वाढोत. मी खणत असता, ते वार तुला जिव्हारी न लागोत, तुला त्रास न होवो!
हे माते! हिंस्र प्राण्यांपासून तू आमचे रक्षण कर! पिशाच्च आणि राक्षसांपासून आमचे रक्षण कर! जे दुष्ट हेतूने, शस्त्रांनी किंवा शब्दांनी आमचा घात करायची इच्छा धरतात; त्यांच्यावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य दे!
माता भूमी: पुत्रो अहं पृथिव्या: || अथर्ववेद १२.१.१२ ||
हे पृथ्वी, तू माझी माता असून मी तुझा पुत्र आहे. मी तुझी पूजा करतो. तुझे गुणगान करतो. तुझे स्तवन करतो! तू आमचे रक्षण कर!
“असे ६० एक मंत्रांचे हे सूक्त सर्व प्राणिमात्रांच्या वतीने पृथ्वीची प्रार्थना करते.”, आबा म्हणाले.
“काय सुरेख प्रार्थना आहे ही! पृथ्वीला त्रास न देता खनिजे काढणे ही कल्पना तर एकदम Eco-friendly म्हणावी अशी आहे.”, सुमित म्हणाला.
“सुमित, या पृथ्वी सूक्ताबद्दल तुला काय आणि किती सांगू! आज United Nations ने Food Security व Drinking Water बद्दल म्हणले आहे की - प्रत्येक मनुष्याला त्याच्या शारीरिक गरजेनुसार, पौष्टिक आहार व शुद्ध पाणी मिळायला हवे. पृथ्वीसूक्त मात्र त्याही पुढे जावून - प्रत्येक मनुष्यालाच नाही, तर प्रत्येक जीवाला पौष्टिक अन्न व सुजल मिळावे अशी प्रार्थना करते!
“तसेच United Nations ने Sustainable Development, Brotherhood & Universality या बद्दल जे विचार मांडले आहेत, ते विचार उदात्त, उदार आणि शुद्ध स्वरूपात पृथ्वी सूक्तामध्ये दिसतात. प्रत्येक प्राण्याशी बंधुत्वाचे नाते सांगणारे सूक्त, पृथ्वीशी मातेचे नाते जोडणारे सूक्त, ‘वसुधैव कुटुंबकम्’ या महा-उपनिषदातील मंत्राची पूर्वपीठिका आहे.
अयं बन्धुरयं नेति गणना लघुचेतसां उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकं || ६.७२ ||
“अर्थात, लहान बुद्धी असलेली माणसे ‘हा माझा – तो परक्याचा’ असे मानतात व तसेच वागतात. दुसऱ्याचे नुकसान करून स्वत:चा फायदा करून घेतात. परंतु, उदार दृष्टीकोन असलेले लोक, संपूर्ण पृथ्वीलाच आपले कुटुंब मानतात. सहजच त्यांची प्रत्येक कृती सर्वांचे मंगल करणारी, सर्वांचे हित जपणारी असते.
“वाल्मिकी रामायणातील या श्लोकात सुद्धा, जन्मभूमी ही मातेसमान मानली असून, ती स्वर्गाहून महान आहे असे म्हटले आहे –
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी || ६.१२४.१७ ||
“आणिक काय सांगू तुम्हाला? या पृथ्वीसूक्तामध्ये ‘वंदे मातरम्’ चे बीज देखील आहे. ‘वंदे मातरम्’ मधील सुजलाम्, सुफलाम्, सुखदाम्, वरदाम् तसेच बहुबलधारिणी, रिपुदलवारिणी भारतमाता अगदी याच सूक्तातील भूमाता वाटते. धरणीला, देशाला, जन्मभूमीला माता समजून तिला वंदन करणे, तिचे स्तवन करणे, तिची सेवा करणे हे भारताच्या मातीत आणि भारतीयांच्या मनात वेदांनी खोल खोल रोवलेले आहे. ‘वंदे मातरम्’ या स्वातंत्र्य मंत्राच्या उत्पत्तीची ही भव्य, दिव्य आणि अखंड परंपरा आहे!”, आबा म्हणाले.
Indian Postage Stamp. Issued in 1976.
संदर्भ -
१. Atharva Veda – Translation by Maurice Bloomfield, Sacred books of East.
२. बृहदारण्यकोपनिषद – English Translation
३. धर्म आणि तत्त्वज्ञान – श्री. भा. वर्णेकर
४. Uprooting Geographic Thoughts in India: Toward Ecology and Culture in 21st century - By Rana P. B. Singh, with Oskar Spate, David Sopher
५. वाल्मिकी रामायण @ IIT Kanpur
- दिपाली पाटवदकर