'अष्टचक्री रोमायण' : वेडात मराठे वीर दौडले आठ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018   
Total Views |





रोज सकाळी इच्छेविरुद्ध अंथरुणातून बाहेर यावं लागणं, नंतर घाईघाईत आन्हिकं आटोपून ऑफिसच्या दिशेने कूच करणं, गर्दीतून धक्के खात, किंवा स्वतःचं वाहन असेल तरी मान, पाठ आणि पाय यांच्यावर ताण देत कामावर जाणं, दिवसभर मानेवर जूं ठेवून काम करणं आणि संध्याकाळी सकाळच्याच गोष्टी करत शिणून घरी येणं हा आपल्यांतल्या बहुतेक लोकांचा दिनक्रम. "आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो..." या ओळीच आपण जगत असतो. हे फारच असह्य होतं त्यावेळेस आपली मजल जाते ती माथेरान/ महाबळेश्वर/ कोकण/ गोवा/ सापुताऱ्यापर्यंत किंवा पोराबाळांना सुट्ट्या लागल्यावर सिमला-कुलू-पर्यंत. मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने ही रुटीनबाहेरचं 'काहीतरी वेगळं' करण्याची परिसीमा असते. याहून वेगळं, थोडं कम्फर्टच्या बाहेरचं डोक्यात येत नसतंच असं नाही पण आपण "खर्च खूप येईल", "सुट्ट्या कशा मिळणार" आणि मुख्य म्हणजे "कुठे उगीच रिस्क घ्यायची, त्यापेक्षा माहिती असलेल्या ठिकाणीच जाऊ" वगैरे कारणं आपण आपल्यालाच देऊन वेगळ्या अनुभवांच्या शक्यतांकडे पाठ फिरवतो. पण सगळेच असे नसतात. ते मळलेल्याच पायवाटा तुडवण्यात धन्यता मानत नाहीत. यापूर्वी न पाहिलेलं विश्व पाहण्याची त्यांची इच्छा असते. असंच एक वेड आहे मोटरबाईक भ्रमंतीचं. अतिशय अवघड आणि अपरिचित रस्त्यांवरून जाणाऱ्या बाईकवेड्यांचे जथ्थे दिसण्याचं आजच्या काळात अप्रूप राहिलं नसलं तरी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बाईकवरून साहसवाऱ्या करणारे लोक दिसणं दुर्मीळच होतं. पण १९७८ साली आठ बाईकवेड्या मराठमोळ्या तरुणांनी अपरिचित प्रदेशातून तब्बल साडेबावीस हजार किलोमीटर प्रवास करण्याचं धाडस केलं होतं. 'अष्टचक्री रोमायण' हे पुस्तक त्यांच्या संस्मरणीय दुचाकी प्रवासाची गोष्ट सांगतं.


हा प्रवास होता मुंबई - रोम - मुंबई एवढा मोठा. सुमारे पाच महिन्यांच्या या प्रवासासाठी सुट्टी मिळवणे, प्रायोजकत्व मिळवणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, ज्या ज्या देशांतून प्रवास होणार आहे तिथल्या व्यक्तींचे संपर्क क्रमांक, पत्ते मिळवणे या गोष्टींसाठी खूप खटपटींची आवश्यकता होतीच पण त्याहून जास्त आवश्यकता होती ती प्रवासातल्या अनिश्चिततेच्या दृष्टीने स्वतःची आणि कुटुंबीयांची मानसिक तयारी करण्याची. कारण स्वाभाविक होतं. प्रवासमार्ग संपूर्ण अपरिचित होता. मधले काही टप्पे वाहनांच्या सुरक्षिततेसोबतच वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कठीण होते. शिवाय त्याकाळी संपर्काची साधनं आजच्या इतकी प्रगत आणि सहजसाध्य नसल्याने अधेमधे काही अडचण आल्यास मायदेशी संपर्क साधून मदत मिळवणंही कठीण होतं. पण एकदा साहसाची झिंग डोक्यात चढली की अशा अडचणी रोखू शकत नाहीत. आवश्यक ती पूर्व तयारी करून झाली खरी, पण प्रवासाच्या आदल्याच दिवशी नेमकी एक दुचाकी चोरीला गेल्याने 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' झाला . पण त्याने न डगमगता ऐनवेळी मित्राच्या दुचाकीची व्यवस्था केली गेली. निरोप देण्यासाठी आलेले सुशीलकुमार शिंदे तसंच या प्रवासाबद्दल वर्तमानपत्रांमुळे माहिती झालेले सर्वसामान्य नागरिक यांच्या उपस्थितीत ‘गेट वे ऑफ इंडिया’पासून या पुस्तकाचे लेखक प्रवीण कारखानीस आणि त्यांच्या सात सहकाऱ्यांनी चार दुचाक्यांवरून आपल्या लक्ष्याकडे कूच केलं.


अनुभवसंपन्न भटकंती


या सगळ्या प्रवासात वातावरण आणि समाजजीवन यांचे अनेक रंग या आठ जणांना दिसले. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान या प्रांतांमधला वैराण, मातकट, खडकाळ परिसर, जनतेची बेतास बात आर्थिक परिस्थिती इथपासून ते युरोपमधील सुजलाम सुफलाम वातावरणापर्यंत टोकाच्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. या सगळ्या प्रवासात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. आपसांत संपर्कासाठी काहीही साधन नसल्याने प्रवासात चुकामूक झालेल्या सहकाऱ्यांना शोधणं हे सगळ्यात मोठं दिव्य. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागेपर्यंत सगळंच टांगणीला. बहुतांश प्रदेश इंग्रजीचा गंधही नसलेले. ऐनवेळी दुचाकी पंक्चर होणे, शॉकअॅबसॉर्बर/ब्रेक तुटणे अशा अडचणीही अनेकदा प्रवासात खोडा घालत असत. सगळ्यात बाका प्रसंग उद्भवला तो तुर्कस्तानात. हा प्रदेश धोकादायक आणि लुटालुटीसाठी कुप्रसिद्ध होता. प्रवासात एके ठिकाणी प्रवीण कारखानीस आणि त्यांचा एक मित्र सहकारी दोघेच पुढे गेले आणि त्यांना एका गाडीतून आलेल्या चार सहा लोकांनी घेरलं आणि पैशांची मागणी केली! अशा दुर्धर प्रसंगी शेवटची आशा म्हणून कारखानीस "आपण भारतातून आलो आहोत" हे सांगण्यासाठी "हिंदुस्थान" असं पुटपुटायचा अवकाश, ते लुटारू थबकलेच आणि त्यांनी "हिंदुस्थान? राज कपूर?" असं विचारलं. झालं… ‘राज कपूर’ या एका धाग्यावरून सगळं चित्रच पालटलं. लुटायला आलेली मंडळी राज कपूरच्या गाण्यांमुळे कशी वेडावली आणि या भारतीय साहसवीरांशी त्यांचं कसं मेतकूट जमलं हा प्रसंग सविस्तरच वाचायला हवा.


प्रवासात अशा अडचणी आल्या असल्या तरी सुखद अनुभव संख्येने भरपूर होते. कोण कुठली परक्या राष्ट्रातली माणसं, ‘भारतातून आपल्या भूमीवर पाहुणे आले आहेत’ हे कळल्यावर त्यांना चक्क आपल्या घरी राहायला घेऊन जायची, भाषा कळत नसली तरी पाहुणचार करायची, आपल्या दुकानातलं काही ना काही भेट म्हणून देऊ करायची, पुढच्या प्रवासासाठी मार्गदर्शन करायची. हे वाचताना जाणवतं की असा प्रवास करणं आणि अशी प्रवासवर्णनं वाचणंदेखील माणसाला जगाकडे सकारात्मकतेने बघायला शिकवतं. प्रवासाचा आणखी एक फायदा हा असतो की त्यामुळे आपले पूर्वग्रह गळून पडतात. उदा. युगोस्लाव्हियामध्ये जाण्याआधी ‘साम्यवादी राजवटीत श्रीमंती नसते, व्यक्तिमहात्म्य नसते’ अशा लेखकाच्या ज्या काही समजुती होत्या त्या प्रत्यक्ष त्या देशात पाय ठेवल्यावर दूर झाल्या.


प्रवासवर्णन : शब्दांत गोठवलेला काळ


कुठलंही प्रवासवर्णन समकालीन आकलनाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतंच पण ते त्या विशिष्ट काळाचा ‘स्नॅपशॉट’ म्हणूनही खूप महत्वाचं असतं. काळाच्या ओघात प्रवासवर्णन हे विशिष्ट काळात डोकावण्याची खिडकी म्हणून उपयोगाला येतं. म्हणूनच युआन श्वांग, मार्को पोलो, मेगॅस्थनीस यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांना आज ऐतिहासिक दस्तावेजाचं वजन प्राप्त झालं आहे. 'अष्टचक्री रोमायण' वाचतानाही चाळीस वर्षांपूर्वीचे विस्मयकारक तपशील कळतात. त्या वेळच्या अफगाणिस्तान आणि इराण मध्ये पाश्चात्य वेशभूषा केलेल्या, मोकळेपणाने वावरणाऱ्या अनेक स्त्रिया दिसल्याचं निरीक्षण कारखानीस यांनी नोंदवलं आहे जे वाचून आज खूप आश्चर्य वाटतं. एवढ्या मोकळ्या वातावरणाचं कारण इराणमध्ये कडव्या धार्मिक खोमेनीच्या सत्तेचा आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदय व्हायचा होता. "युगोस्लाव्हिया बद्दलचं वर्णन या पुस्तकात मनापासून करताना बोस्निया, क्रोएशिया, मॅसेडोनिया, स्लोव्हेनिया, सर्बिया आणि मोन्टेनिग्रो ही सहा संयुक्त राज्यं मिळून हे संघराज्य बनलं असल्याचं कारखानीस नमूद करतात". आज नव्या पिढीसमोर मात्र 'हे सहा वेगवेगळे देश आहेत आणि युगोस्लाव्हिया नावाचं काहीही अस्तित्वातच नाहीये' एवढंच वास्तव असतं. अशा गोष्टींमुळे उलटून गेलेल्या काळातलं असूनही हे प्रवासवर्णन वाचनीय ठरतं.


हे प्रवासवर्णन पूर्वी ‘मोहिनी’ मासिकात क्रमशः प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचं पुस्तकरूप आहे. त्यात काही गोष्टी तपशिलाने आलेल्या नाहीत, यामागे मासिकातल्या शब्दमर्यादेचं कारण असावं. इतक्या महत्वाच्या आणि मोठ्या प्रवासाचं नियोजन, पैशांची तरतूद कशी केली, वाटेवरची महत्वाची परंतु अनोळखी ठिकाणं अन् तिथल्या माणसांचे पत्ते/फोन नंबर इ. तपशील कसे मिळवले हे जाणून घेणंही वाचणाऱ्यांसाठी महत्वाचं ठरलं असतं. मासिकातल्या लेखमालेचा पुस्तकाच्या निमित्ताने विस्तार व्हायला हवा होता. पुस्तकाचं मुखपृष्ठ तांत्रिक सफाईच्या अभावामुळे फारच कृत्रिम भासतं. अर्थात त्याच्या आत असलेला मजकूर मात्र अनुभवांच्या सच्चेपणामुळे जिवंत झाला आहे एवढं निश्चित.


पुस्तक :
अष्टचक्री रोमायण


लेखक : प्रवीण कारखानीस


प्रकाशक : श्री सर्वोत्तम प्रकाशन, इंदूर


आवृत्ती : तिसरी (डिसेंबर २०१८)


पृष्ठसंख्या : १६७


किंमत : ३०० रू. 


 - प्रसाद फाटक
@@AUTHORINFO_V1@@