मन आणि व्यवस्था...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018   
Total Views |


समाजाला आत्मशक्तीवर उभे राहायचे असेल तर त्यासाठी आधी मानसिक परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थात्मक पुनर्रचनेचा विचारही आवश्यक आहे. मन आणि व्यवस्था हे दोघेही एकमेकांवर परिणाम करीत असतात. त्यामुळे केवळ मानसिक परिवर्तनाचा जे विचार करतात, त्यांच्या परिवर्तनावर मर्यादा येतात आणि जे मानसिक परिवर्तनाचा विचार न करता केवळ व्यवस्था परिवर्तनाचा विचार करतात, ते फक्त शोषकांचा नवा वर्ग तयार करतात.

मन आणि व्यवस्था (माइंड अ‍ॅण्ड मॅटर) यांच्यातील परस्परसंबंध हा अनेक शतके वैचारिक चर्चेचा विषय राहिला असून त्यांच्या परस्परसंबंधा-संबंधीचे निश्‍चित विधान आजही करता येण्यासारखी स्थिती नाही. परिस्थिती बदलण्याची आकांक्षा प्रथम मनामध्ये उद्भवते आणि त्या आकांक्षेला मूल्यांची, परिश्रमांची, संघटना कौशल्याची जोड मिळाली की त्यातून परिवर्तन घडते, अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. अध्यात्म, कला, साहित्य ही सर्व मनाची प्रभावक्षेत्रे आहेत. या क्षेत्रांत अधिक प्रभावीपणे काम करण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर होतो. परंतु, ही क्षेत्रे ही निव्वळ तंत्रज्ञानाची क्षेत्रे नव्हेत. त्याचबरोबर समाजाचे प्रशासन हा पूर्णतः व्यवस्थापनाचा विषय असतो. विज्ञान आणि त्यातून निर्माण झालेले तंत्रज्ञान हे तर निखळ व्यवस्थात्मक बुद्धीचे (मॅटरचे) आविष्कार असतात. मनाला तर्कशास्त्राचे नियम फारसे लागू पडत नाहीत. मनोवैज्ञानिकांनी मनाचे नियम शोधून काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यातून काही प्रकारच्या मनोरुग्णांवर उपचारही करता येतात. परंतु, वैज्ञानिक नियमांप्रमाणे एका विशिष्ट परिस्थितीत एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारेच वागेल, असे सांगता येत नाही. त्यामुळे मन व्यवस्था घडविते की व्यवस्थेनुसार मनाची जडणघडण होते, यावर दोन्ही अंगांनी भरपूर चर्चा झालेली आहे. राजकीय क्षेत्र मात्र या दोन्ही क्षेत्रात काम करत असते. समाजाची मानसिकता आणि व्यवस्था यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे हे त्यांचे काम असते.

मार्क्सवादाच्या मते, माणूस कोणत्या वर्गात जन्मलेला आहे, त्यावर त्याची मनोरचना अवलंबून असते. कामगार म्हणून काम करणारी व्यक्ती कामगार म्हणून विचार करेल, तर मालक असलेली व्यक्ती मालक म्हणून कामगाराकडून कमी किमतीत अधिकाधिक काम कसे करून घेता येईल, याचा विचार करेल, हाच मार्क्सवादाच्या शोषणाचा सिद्धांत आहे. या वर्गीय समाजरचनेप्रमाणेच विविध प्रकारच्या घटकांनुसार विशिष्ट मानसिकता निर्माण होते, याचाही अनुभव आपणाला व्यवहारात येत असतो. वकील, डॉक्टर, पत्रकार, कामगार नेते ज्या क्षेत्रात काम करतात, त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर पडत राहतो.

विसाव्या शतकावर मार्क्सवादाचा मोठा प्रभाव होता. औद्योगिकीकरणातून आलेली भांडवलशाही आणि त्यातून निर्माण झालेले शोषण याचा अनुभव विकसित देशांतील लोक घेत होते. त्यामुळे ज्यांच्या हातात भांडवल त्यांची तंत्रज्ञानावर मालकी आणि भांडवलदार त्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मजूर, ग्राहक, निसर्ग या सर्वांचे शोषण करणारा घटक या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले गेले. हे शोषण नष्ट व्हायचे असेल तर भांडवलावर समाजाची मालकी प्रस्थापित केली पाहिजे, असा विचार दृढमूल झाला आणि नव्या बुद्धिजीवी वर्गावर समाजवादी असणे, हे नवे नैतिकतावादी मूल्य तयार झाले. पाश्‍चात्य देशांतून शिकून आलेल्या अनेक राजकीय नेत्यांवर मार्क्सवादी आणि समाजवादी विचारांचा प्रभाव होता. परंतु, “जोपर्यंत व्यक्ती बदलत नाही तोवर केवळ व्यवस्था बदलून समाजात मूल्यात्मक बदल कसा घडणार?” असा प्रश्‍न महात्मा गांधींनी त्यांना विचारला. शोषणाची वृत्ती ही प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते व संधी मिळताच ती जागी होते. तो कोणत्या वर्गात जन्मला व जगत आहे त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही, असा विचार त्यांनी मांडला. जर मानसिक परिवर्तन न करता केवळ व्यवस्था परिवर्तन केले तर त्याचा परिणाम एक शोषक वर्ग जाऊन दुसरा वर्ग येईल, एवढाच असेल, असे त्यांनी सांगितले. त्याचा अनुभव जगाने चीन, रशिया व अन्य साम्यवादी देशांमध्ये घेतला.

स्वतः मध्ये परिवर्तन घडवून न आणता जगामध्ये परिवर्तन घडविण्याची भाषा बोलणार्‍यांसाठी विनोबा भावेंनी एक कथा सांगितली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात राजपुत्राला रस्त्यावरून चालत असताना पायाला चटके बसत. यासाठी काय करावे, यावर उपाय शोधण्यासाठी राजाने बुद्धीमंतांची एक समिती नेमली. राजपुत्र चालत असेल त्या रस्त्यावर मांडव घालण्यापासून संपूर्ण रस्त्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आच्छादन घालण्यापर्यंत अनेक प्रकारच्या सूचना या समितीने केल्या. परंतु, त्यातील एकही सूचना व्यवहार्य नव्हती. यावर काय करावे म्हणून विचारमंथन चालू असताना राजदरबारात एक चांभार आला. त्याने आपल्याबरोबर चपलेचा जोड आणला होता. तो त्याने राजपुत्राच्या पायात घातला आणि सारा प्रश्‍न सुटला. विनोबा सांगत की, “जग बदलण्यापेक्षा आपले मन बदलले, तर अनेक प्रश्‍नांची सोडवणूक होईल. त्याकरिता जगात क्रांती केली पाहिजे, अशी घोषणा देण्याची गरज नाही.”

महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या तत्त्वज्ञानात तथ्य असले तरी त्यामुळे प्रश्‍न सुटले नाहीत. एखाद्याने त्याच्या स्वतःपुरते मनाचे परिवर्तन करून घेतले, तर कदाचित त्याच्या पुढचे व्यक्तिगत प्रश्‍न संपतील. परंतु, समाजात निर्माण झालेली शोषकवृत्ती व तिचे सामर्थ्य आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्‍न यांची सोडवणूक यातून होत नाही. झालेले मानसिक परिवर्तन व्यक्तिगत पातळीवर राहिले तर निर्माण झालेल्या सामाजिक प्रदूषणातील एक घटक कमी झाला, एवढाच त्याचा अर्थ होईल. अर्थात, महात्मा गांधी काय किंवा विनोबा भावे काय, यांना केवळ व्यक्तिनिष्ठ परिवर्तन नको होते, तर व्यक्तिनिष्ठ परिवर्तनातून निर्माण होणार्‍या सामूहिक शक्तीचा नैतिक दबाव समाजात निर्माण व्हावा असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणातील आध्यात्मिक आणि मानसिक शक्तीचा उपयोग करून समाज परिवर्तनाचे वेगवेगळे सिद्धांंत मांडले आणि प्रयोग केले. एक तर त्या प्रयोगाकडे उदात्तीकरणाच्या दृष्टिकोनातून बघितले गेले किंवा भाबडेपणा म्हणून त्यांची संभावना करण्यात आली. अशा प्रकारच्या समाज परिवर्तनातील सामर्थ्य आणि मर्यादा यांचा तटस्थ समाजशास्त्रीय विचार व्हावयास हवा होता. तसे आजवर घडले नाही. ‘रामकृष्ण मिशन’च्या पलीकडे विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव असणार्‍या अनेक संस्था निर्माण झाल्या. परंतु, त्यातून व्यवस्थात्मक परिवर्तनाकरिता काही निश्‍चित प्रवाह निर्माण झाला आहे का? याचा अभ्यास झालेला नाही. योगी अरविंदांच्या परिवर्तनाचा प्रयोग ‘ऑरोव्हिल’ पुरताच मर्यादित राहिला. लोकमान्य टिळकांनी आपल्या जीवनात निष्काम कर्मयोगाच्या तत्त्वज्ञानाचा आविष्कार घडविला. परंतु, त्याचा परिणाम त्यांच्या सहकार्‍यांवरही झाल्याचे अनुभवायला मिळत नाही. महात्मा गांधींनी मात्र आपल्या आयुष्यात अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली व त्यांच्या आधारे सामाजिक परिवर्तनाचे अनेक प्रयोग घडविले. परंतु, त्यांची प्रेरणा व्यक्तिनिष्ठ राहिली आणि त्यानंतर ‘गांधीवाद’ हा आचरणाचा विषय नव्हे, तर चर्चेपुरता विषय उरला. स्वातंत्र्यानंतर ‘भूदान’ चळवळीचा अपवाद वगळता विनोबा भावेंनी आपले काम आपल्या आश्रमापुरतेच मर्यादित केले. त्यामुळे आणीबाणीच्या कालखंडातही ते आपला प्रभाव टाकू शकले नाहीत.

भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी कोट्यवधी लोक असे होते की, ज्यांच्या मूलभूत गरजाही भागलेल्या नव्हत्या. त्यामुळे या गरजा भागविणे ही शासनाची आणि समाजाची प्राथमिक गरज होती. इथल्या समाजाची अशी स्थिती का आहे आणि त्यातून समाजासाठी कोणती विकास प्रक्रिया निवडली पाहिजे, यावर विविध प्रकारचे विचारमंथन झाले. त्याला जागतिक पार्श्‍वभूमी होती. युरोपिय देशांत भांडवलशाही आणि औद्योगिकीकरणातून झालेले शोषण आणि त्यातून निर्माण झालेले दुसरे महायुद्ध यामुळे समाजवाद हाच केवळ समाजातील आर्थिक विषमता नष्ट करू शकतो, या विचाराचा प्रभाव राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर पडला. युरोपीय देशातील कम्युनिझमचा प्रतिकार करावयाचा असेल तर शासनाला लोककल्याणकारी योजनांसाठी सक्रिय व्हावे लागेल या भूमिकेतून तिथे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना विकसित झाली. लोकांचा, समाजाचा, विकास करण्याची सर्व जबाबदारी शासनाची आहे, असा दृष्टिकोन त्यातून निर्माण झाला. सर्व लोक आपल्यावरच अवलंबून आहेत, अशी व्यवस्था राजकीय नेत्यांनाही सोयीची होती. आपल्या सर्व प्रश्‍नांसाठी लोकांनी आपल्याकडे यावे आणि आपण उदार हस्ते लोकांना काही द्यावे, यातून त्यांचा अहंकार आणि महत्त्व दोन्ही वाढणार होते. या सर्वांचा परिणाम समाजाने आपली आत्मशक्ती गमावून शासनकर्त्यांची लाचारी पत्करण्यात झाला.

समाजवादाची विफलता लक्षात येऊन १९९० साली मुक्त अर्थव्यवस्थेचा भारताने स्वीकार केला असला तरी, सामाजिक मानसिकता न बदलल्यामुळे परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्येपासून नर्सरीमध्ये कोणाला व कसा प्रवेश द्यावा, यापर्यंत सर्व गोष्टी सरकारने ठरवाव्यात, हे लोकांनी जणू काही गृहीत धरले आहे. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी, अशी आंदोलने करणे आणि सरकारने काही केले नाही तर जनहित याचिका घेऊन न्यायालयात जावे, एवढीच आज सामाजिक कामाची व्याख्या बनली आहे. समाजाला आत्मशक्तीवर उभे राहायचे असेल तर त्यासाठी आधी मानसिक परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थात्मक पुनर्रचनेचा विचारही आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नसून एकाच गाडीची दोन चाके आहेत. मन आणि व्यवस्था हे दोघेही एकमेकांवर परिणाम करीत असतात. त्यामुळे केवळ मानसिक परिवर्तनाचा जे विचार करतात, त्यांच्या परिवर्तनावर मर्यादा येतात आणि जे मानसिक परिवर्तनाचा विचार न करता केवळ व्यवस्था परिवर्तनाचा विचार करतात, ते फक्त शोषकांचा नवा वर्ग तयार करतात. आजवर आलेल्या अनुभवांतून मन आणि व्यवस्था यांच्या परस्पर संबंधांचा विचार करून नव्या समाजरचनेची संकल्पना तयार केली पाहिजे.


- दिलीप करंबेळकर
@@AUTHORINFO_V1@@