पालघर पोटनिवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर आयोगावर कारवाईची मागणी
मुंबई : 'देशातील निवडणूक यंत्रणा ही देखील इतरांप्रमाणे भ्रष्ट झाली असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मुख्य निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करवा,' अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली आहे. पालघर पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईतील शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार संजय राऊत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
निवडणूक आयोग हे फक्त एक बुजगावणे झाले असून आयोग आणि आयुक्तांचा देशातील निवडणुकांवर कसल्याही प्रकारचा ताबा राहिलेला नाही, असे मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. पालघर निवडणुकांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे दिसत असताना देखील आयोगाने कोणावरही कारवाई केली नाही. त्यात मतदानाच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचे समोर असल्यानंतर देखील आयोगाने त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे देशाची निवडणूक ही जर लोकशाही पद्धतीने व्हावी असे वाटत असेल तर आयोगातील सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे, तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांची देखील नियुक्ती न करता त्यांची थेट जनतेतून निवड करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.
गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार
पालघर निवडणुकांमध्ये झालेल्या सर्व प्रकारावर आक्षेप म्हणून आयोगाला सेनेनी एक पत्र लिहिले असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच आयोगाने शिवसेनेनी उचललेल्या प्रश्नांवर जर कारवाई केली नाही, तर गरज पडल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ. परंतु यातील सर्व घडामोडींचा सोक्षमोक्ष लावूच' असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पुढे कोणत्याही निवडणुकीत युती नाही
दरम्यान आपल्या वक्तव्याच्या शेवटी त्यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र निवडणूका लढवण्याची घोषणा करत, यापुढे कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजपबरोबर युती करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. भाजपने वनगा कुटुंबीयांवर अन्याय केल्यामुळे म्हणून सेनेनी ही निवडणूक लढवली होती. परंतु भाजपने म्हटल्याप्रमाणे साम-दाम-दंड-भेदचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे यापुढे भाजपबरोबर युती अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी यावेळी दिली.
उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद :