योगिनी पृथ्वी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018   
Total Views |
 
 
 
“शंकरराव, मागच्या वेळी चंद्रावर पडणारा पृथ्वीप्रकाश आपण पहिला. पण त्याने चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते ते काही कळले नाही. आज त्या त्याबद्दल काही सांगा!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
 
 
“दुर्गाबाई, सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि चैतन्यपूर्ण ग्रह म्हणजे पृथ्वी! या अप्रतिम ग्रहाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रापेक्षा योग्य ठिकाण कोणते असू शकते? तर, आज चंद्रावरून पृथ्वीचे दर्शन घेऊ – “, आबा सांगू लागले.
 
 
आबा काही सांगत आहेत म्हणता, सुमितने हातातले पुस्तक बाजूला ठेवले आणि आजी-आबांच्या बरोबर टेबलवर येऊन बसला. तसे आबा पण उत्साहाने म्हणाले, “सुमित, कसे आहे, चंद्र आणि पृथ्वी दोघे पडले परप्रकाशी! दोघांवर सूर्याचा प्रकाश पडतो म्हणून ते दिसतात. या दोन्ही ग्रहांच्या ज्या अर्ध्या भागावर सूर्यप्रकाश पडतो तिथे उजेड आणि उरलेल्या अर्ध्या भागावर अंधार असतो. आता, पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालतांना, चंद्र त्या कक्षेत कुठे आहे, त्या प्रमाणे त्याला थोडा उजेडाचा आणि थोडा अंधाराचा भाग दिसतो. कधी कधी संपूर्ण प्रकाशातला भाग दिसतो, तर कधी पूर्ण अंधारातला भाग दिसतो, आणि कधी अर्धा उजेडातला आणि अर्धा अंधारातला भाग दिसतो.”, आबा सांगत होते.
 
 
“म्हणजे चंद्रावरून पृथ्वीच्या सुद्धा विविध कला दिसतात!”, दुर्गाबाईंनी आबांचे वाक्य पूर्ण केले.
 
 
  
 
पृथ्वीच्या कला
“हो तर! कधी चंद्राच्या आकाशात पृथ्वीची बारीकशी निळसर कोर दिसते. तर कधी पौर्णिमेचा तेजस्वी पृथ्वीगोल दिसतो. आणि कधी अमावस्येला ती गायब होते!
 
 
“पण सुमित, ही चंद्र आणि पृथ्वीची जोडी एकमेकांना पूरक आहे! यातील एकटा जेव्हा लहान होत जातो तेव्हा दुसरा मोठा होतो आणि जेव्हा एक मोठा होत जातो तेव्हा दुसरा लहान होतो. म्हणजे कसे की, पृथ्वीच्या आकाशात पौर्णिमा असते तेव्हा चंद्राला पृथ्वीची पूर्ण रात्रीची बाजू दिसते. अर्थात चंद्रावर पृथ्वी-अमावस्या असते!”
 
 

 
 
 
“ओह! मग पृथ्वीवर जेव्हा अमावस्या असते तेव्हा चंद्राला पृथ्वीची पूर्ण दिवसाची बाजू दिसते आणि तिथे पृथ्वी-पौर्णिमा दिसेल!”, सुमित पटकन म्हणाला.
 
 
“अगदी बरोबर सुमित! एका महिन्याच्या कालावधीत पृथ्वीच्या पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंतच्या सर्व कला चंद्रावरून दिसतात.”, आबा म्हणाले.
 
 
“आबा, पृथ्वीवरून दिसणारा चंद्र आणि चंद्रावरून होणारे पृथ्वी दर्शन यांमध्ये काही फरक आहेत का?”, सुमितने विचारले.
 
 
“थोडे फार फरक आहेत. चंद्राच्या आकाशातील पृथ्वी सूर्यापेक्षा मोठी दिसते. चंद्राच्या आकाशातील ती सर्वात महत्वाची व सर्वात मोठी शक्ती आहे. चंद्रापेक्षा ४० ते ५० पट अधिक तेजस्वी आहे. पण, चंद्राच्या एकाच भागावरून पृथ्वीचे दर्शन होते. त्या भागात सुद्धा आकाशात पृथ्वी जवळ जवळ स्थिर दिसते. तिथे पृथ्वी उगवत नाही आणि मावळतही नाही. आकाशात स्थिर आहे. पण, महिन्याभरात ती हळूहळू मोठी आणि मग हळूहळू लहान होतांना दिसते.
 
 
“दुसरे असे की चंद्राचा पृथ्वी भोवती फिरायचा मार्ग बरोबर वर्तुळाकार नसून अंडाकृती आहे. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर, महिन्याभरात कमी-जास्त होत असते. त्या अंतराप्रमाणे प्रमाणे पृथ्वी लहान किंवा मोठी दिसते.
 
 
“आपल्याला जरी चंद्राची एकच बाजू दिसत असली, तरी चंद्राला मात्र पृथ्वीचे सर्व बाजूंनी दर्शन होते. चंद्राच्या आकाशात पृथ्वी स्वत:भोवती सावकाश गिरकी घेतांना दिसते. एका महिन्याच्या कालावधीत जवळ जवळ ३० गिरक्या होतात. त्या फिरणाऱ्या पृथ्वीगोलावर कुठे पिवळट वाळवंटे दिसतात. कुठे हिरवट वनराई दिसते. निळेशार समुद्र दिसतात. बर्फाच्छादित ध्रुवप्रदेश दिसतात. ढगांच्या बदलणाऱ्या नक्षी दिसतात. ऋतूप्रमाणे, वाऱ्याप्रमाणे, किंवा एखाद्या वादळामुळे पृथ्वीचा देखावा बदलतांना दिसतो.”, आबा म्हणाले.
 
 
“एकूण काय? तर चंद्रावरून दिसणारी पृथ्वी ही निव्वळ दगडाचा गोळा नसून, एक जिवंत शिल्प आहे. चंद्रासारखे रोजच्या रोज तेच ते खड्डे आणि त्याच त्या सावल्या दिसत नाहीत. तर नित्य नवीन रूप दिसते.”, दुर्गाबाई म्हणाल्या.
 
 
“अगदी मनातले बोललात दुर्गाबाई! पृथ्वीवरचे बर्फाचे कवच उन्हाळ्यात कमी आणि हिवाळ्यात वाढतांना दिसते. त्यामुळे असे वाटते की ती संथपणे दीर्घ श्वास घेणारी ध्यानस्त योगिनी आहे! भरपूर प्रकाश परावर्तीत करणारी तेजस्वी साध्वी आहे! विष्णूपत्नी, हरिप्रिया पृथ्वी त्याची नीलकांती स्वामिनी आहे! महिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व आदि सिद्धी प्राप्त झालेली सिद्धा आहे! आणि ६४ कलांनी युक्त असलेली कलावती आहे!”, आबा म्हणाले.
 
 
“आबा, तुम्ही असे सांगताय जसे काही तिथे जाऊन पृथ्वीचे दर्शन घेऊनच आला आहात!”, सुमित म्हणाला.
 
 
“नाही रे सुमित! मी काही ‘इथून’ उठून तिथे गेलो नाही! मी तिथेच असतो, अवकाशात; तिथल्या गंमती जमती तुम्हाला सांगायला इथे आलो आहे इतकेच!”, आबा डोळे मिचकावून म्हणाले.
 
 
 
 
 
 
- दिपाली पाटवदकर  
@@AUTHORINFO_V1@@