छायाचित्र सौजन्यः Reuters/Dirik, Dilar. The 'other' Kurds fighting the Islamic State, Aljazeera, 2 September 2014
सिरीयाच्या सीमेलगतच्या व इराकच्या वायव्य भागातील सिंजर पर्वतामध्ये १० हजार याझिदी इसिसच्या सापळ्यात अडकले होते. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. त्यात जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर, महिला व बालकांचे अपहरण, बलात्कार, महिलांची तस्करी व मुलींना सेक्स स्लेव्ह करणे अशा भयानक व अंगावर काटा आणणाऱ्या पापकर्मांना व याझिदींच्या ७३ व्या हत्याकांडास इसिसने सुरुवात केली होती. इराकमधील स्वायत्त कूर्दिस्तानच्या पेशमर्गा सशस्त्र दलाने आधी सहाय्य करण्याचे वचन देऊन आयत्यावेळी युद्धक्षेत्रातून माघार घेतली होती. अशावेळी महासत्ता देश, संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटना हे सगळे कसा व कुठे हस्तक्षेप करावा ह्यावर नुसत्या अर्थहीन चर्चा व वादविवाद करत होते. अशा संकटसमयी रोजावा व मुख्यत्वे करून रोजावामधील महिला लढाऊ संघटना YPJ (Yekineyen Parastina Jine- Women’s Protection Units) सहाय्यास धावून आली व सिंजर पर्वतांमधून याझिदींची नरकयातनांमधून सुटका केली.१ याझिदींची वंशविच्छेद व पाशवी अत्याचारापासून सुटका केल्यामुळे व त्यातील महिलांच्या शौर्यामुळे याझिदी विशेषतः याझिदी महिला भारावून गेल्या व ज्यांना निष्काळजी माध्यमांनी निष्क्रिय, बलात्काराच्या बळी, पिडीत अशाप्रकारे चित्रित केले होते त्या याझिदी महिलांनी YPJ (वायपीजे) पासून प्रेरणा घेऊन आता स्वतःचे 'वायपीजे-शेंगाल' (सिंजर) हे महिलांचे स्वायत्त लढाऊ दल स्थापन केले आहे.२
वायपीजे-शेंगाल महिला लढाऊ संघटना (छायाचित्र सौजन्यः Jinha/Dirik, Dilar. Kurdish Women’s Radical Self-Defense: Armed and Political, Telesur, 7 July 2015)
इसिसच्या मतानुसार, जर ते (इसिसचे अतिरेकी) महिलांकडून मारले गेले तर त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे बंद होतील व त्यांना नरकात जावे लागेल.
ह्या लढ्यामध्ये काही शूर महिला योद्धांना प्राणही गमवावा लागला तसेच त्यांना हेही माहित होत की जर आपण इसिससारख्या क्रूर शत्रूच्या हाती जिवंत सापडलो तर लैंगिक अत्याचार, बलात्कार असे पाशवी अत्याचार आपल्याला भोगावे लागतील व सेक्स स्लेव्ह म्हणून जगावे लागेल. पण ह्या कशाचीही तमा न बाळगता ह्या शूर महिला लढायला गेल्या व विजयी होऊन आल्या. ज्या इसिसशी लढताना महासत्तांच्याही नाकीनऊ आले त्या इसिसला कुठलाही आंतरराष्ट्रीय पाठिंबा नसणाऱ्या व शस्त्रास्त्र व दारुगोळ्याची कमतरता असलेल्या महिलांनी पराभूत केल.
कूर्दांच्या इतिहासात काही लढाऊ महिलांची उदाहरण दिसून येतात. १९ व्या शतकात ऑटोमन साम्राज्यात कारा फातमाने ७०० पुरुषांच्या पलटणीचे नेतृत्व केले होते व सैन्यपदावर ४३ महिलांना प्रवेश दिला होता. तसेच १९७४ मध्ये, इराकी बाथ पक्षाने कूर्दिश विद्यार्थी चळवळीत सहभागामुळे २२ वर्षीय लेयला कासिम देहांत शासन दिले होते.३
वायपीजे मध्ये १८-४० वयोगटातील १० हजार लढाऊ मुली/महिला आहेत. १८ वर्षाखालील मुलींना थेट युद्धाभूमीवर लढायला जाण्यास बंदी आहे पण त्या चळवळीत सहभागी होऊन सैनिकी प्रशिक्षण घेऊ शकतात. ७ वर्षाच्या मुलीपासून ७० वर्षाच्या महिलेपर्यंत कोणीही ह्या चळवळीत (युद्धात नव्हे) सहभागी होऊ शकतात.
कूर्दांसाठी प्राणार्पण करणाऱ्या रुकानच्या नावावरून पहिल्या महिला पलटणीचे नाव 'रुकान पलटण' ठेऊन रुकानला आदरांजली वाहण्यात आली. अक्सीन नुजीन त्याची प्रमुख होती. देरिका हेम्को (अल-मलिकीया), अफ्रिन, दिरबेसी (अल-दरबासिया) व रोजावाची राजधानी क्यामिशी अशा चार ठिकाणी आतापर्यंत चार महिला पलटणी स्थापन करण्यात आल्या आहेत.
वायपीजे म्हणजे क्रांतिकारी स्त्रीत्व. रोजावामधील महिलांना स्वसंरक्षणासाठी हाती शस्त्र घेण अनिवार्य आहे, कारण तो त्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. वायपीजे पुढारी नस्रीन अब्दुल्ला म्हणते, ''आम्ही सैनिक नाही, आम्ही लढाऊ आहोत. आम्हाला युद्ध करण्यासाठी वेतन दिले जात नाही, आम्ही क्रांतींचे समर्थक आहोत. आम्ही आमच्या माणसांसोबत राहतो, तत्वज्ञानाचे अनुकरण करतो व आमच्याकडे राजकीय प्रकल्प आहे. त्याचवेळी आम्ही पितृप्रधान व्यवस्थेच्याविरुद्ध लिंग संघर्ष करतोय….. महिलांना लढायला सिद्ध करण्याआधी आम्ही का व कशासाठी लढतोय हे माहित असणे आवश्यक आहे व त्यासाठी आम्ही वैचारिक आणि शैक्षणिक सज्जतेवर भर देतोय… आम्हाला आमच्या समुदायात नवचैतन्य निर्माण करून सुधारणा करायची आहे.''४ म्हणजे वायपीजे ही महिलांचे केवळ सशस्त्रदल नसून ती एक लढाऊ संघटना आहे. वैचारिक व शैक्षणिक सज्जतेवर भर दिल्यामुळे हे केवळ हिंसात्मक दल न राहता संरक्षक दल झाले आहे. त्या महिलांसह पुरुषांच्या मुक्ततेसाठीही लढत आहेत.
इसिसच्या १०० अतिरेक्यांना मारणारी रेहाना
कोबानमधील लढाऊ महिला अमराने म्हटल्याप्रमाणे, ''पुन्हा एकदा, कूर्द इतिहासाच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. पण ह्यावेळी स्व-संरक्षण व स्व-शासन व्यवस्थेसह. विशेषतः महिला सुमारे सहस्त्र वर्षांनी आता प्रथमच स्वतः त्यांचा इतिहास लिहितील....आमची क्रांती युद्धापलीकडची आहे.'' वायपीजेच्या लढाऊ महिला नवा इतिहास रचत आहेत. युद्ध करणे व जिंकणे इतकेच त्यांचे कार्य मर्यादित नाही. अमराने म्हटल्याप्रमाणे ही क्रांती युद्धापलीकडची आहे. संपूर्ण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारी ही क्रांती आहे. ही रोजावा क्रांती महिला क्रांती आहे, युद्धापलीकडे म्हणजे राजकीय क्रांतीपलीकडची ती एक सामाजिक क्रांतीही आहे.
रोजावामधील कोबानमधील इसिसविरोधी लढ्यातही ह्या वायपीजेच्या लढाऊ महिला अग्रभागी होत्या. Syrian Observatory for Human Rights (SOHR) अनुसार कोबानमधील वेढ्याचे सहनेतृत्व अफ़्रिन प्रदेशातीमधील अलेप्पो प्रांतातील ४० वर्षीय कूर्दिश महिलेने केले होते. नरीन अफ़्रिन ह्या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या मायस्सा अब्दोने कोबानमध्ये महम्मद बार्खोदानसह वायपीजेचे नेतृत्व केले होते. अब्दोने स्वतः सांगितल्याप्रमाणे कोबानमधील प्रतिकार हा मुख्यत्वे करून महिला प्रतिकार होता. वायपीजेच्या एका लढाऊ महिलेने आत्मघाती हल्ला करून इसिसच्या २० जणांना मारले. इंटरनॅशनल बिझनेसच्याअनुसार अब्दोच्या आधिपत्याखालील ‘रेहाना’ नावाच्या लढाऊ महिलेने कोबानमध्ये इसिसच्या १०० जणांना मारले.५ कोबानमधील महिलांचे एकत्रीकरण व लढा ही काही अचानक उद्भवलेली गोष्ट नाहीये. हे कूर्दिश महिलांनी दशकभर दिलेल्या लढ्याचे फलित आहे.
संदर्भ:
१. Acik, Necla. Kobane: the struggle of Kurdish women against Islamic State, opendemcracy.net, 22 October 2014
२. Dirik, Dilar. Kurdish Women’s Radical Self-Defense: Armed and Political, Telesur, 7 July 2015
३. Dirik, Dilar. Western fascination with 'badass' Kurdish women, Aljazeera, 29 October 2014
४. Sgrena, Giuliana. Commander Nesrin Abdullah: The Other Half of Rojava, socialistproject.ca, 7 July 2015
५. Kurdish Women Turning Kobani into a Living 'Hell' for Islamic State, TeleSur, 14 October 2014