हे मातृभूमी! तुजला मन वाहियेलें
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेलें
तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला
लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला...
सावरकर म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती प्रखर देशभक्त-राष्ट्रभक्त प्रतिमा. ज्यांनी मन, वक्तृत्व, कविता, लेखासह सर्वच मातृभूमीला अर्पण केलंय त्या सावरकरांचे विविध पैलू, जे आजही आपल्याला वैयक्तिक जीवनात तसेच समाजासाठी व राष्ट्रासाठी उपयोगी ठरतील, अशा काही निवडक व अज्ञात पैलूंची ओळख करून देणे, हा या सावरकर विशेषांकाचा हेतू आहे.
राष्ट्रात अनेक वीर, विचारवंत, राजकारणी, नेते जन्माला येतात. पण, त्यांतील काहीच जण कालपटलावार आपला ठसा उमटवून जातात. थोर व्यक्तींचे विचार त्यावेळच्या काळात उपयोगी असतातच. पण, त्यांपैकी काहीच थोरांचे विचार भविष्यकाळातही उपयुक्त असतात, अशा भविष्याचा वेध घेणार्यांनाच ‘द्रष्टे’ म्हणतात व सावरकर अशा द्रष्ट्यांपैकी एक होते.
सावरकरांनी मांडलेल्या विचाराला कृतीची जोड होती. त्यामुळे ते केवळ विचारवंत नव्हते, तर ते कृतिशील विचारवंत होते. विचाराला कृतीची जोड होती. त्यामुळे त्यांचे विचार व्यावहारिक व परिणामकारक होते. अंदमानात सर्व बंद्यांना लिहायला, वाचायला शिकवणारे, त्यांना भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादींची ओळख करून देणारे शिक्षक सावरकर, नवनवीन अद्ययावत गोष्ट शिकून आत्मसात करणारे विद्यार्थी सावरकरही होते. म्हणूनच त्यांनी भारताने नवनवीन यंत्र, तंत्र शिकावे, शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र, अणुध्वम शोध व निर्मिती करून बलशाली व्हावे, असे वाटत होते.
सावरकर जसे प्रभावी व अमोघ वक्ते होते, तसे उत्तम वादविवादपटूही होते. त्याकाळात जगातील सर्वोत्तम वादविवादपटूंमध्ये टिळक, चर्चिल यांच्यासोबत सावरकरांचेही नाव घेतले जायचे. क्रिप्सने सावरकरांच्या या अभ्यासू व वादविवादपटुत्वाचा अनुभव घेतला होता. “मला ५० वर्षे जन्मठेप काळे पाणी शिक्षा दिलीत, पण ५० वर्षे तुमचे इंग्रजी राज्य तरी टिकेल काय?” असे बारीला सुनावणाऱ्या सावरकरांचे वादविवादपटुत्व व द्रष्टेपण दिसून येते.
इंग्रज भारतीयांवर अन्याय करत होते, म्हणून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन, सावरकर क्रांतिकारक झाले. जातीभेद, चातुर्वर्ण्य, अस्पृश्यतेमुळे एक जात दुसर्या जातीवर अन्याय करत होती, त्यांना माणूस म्हणूनही वागणूक देत नव्हती, म्हणून समाजसुधारणेत उडी घेऊन, सावरकर समाजक्रांतिकारक झाले. हिंदूंवर ‘हिंदू’ म्हणून अन्याय होत होता, म्हणून हिंदूसंघटनात उडी घेऊन, सावरकर हिंदुत्ववादी व हिंदुसंघटक झाले. मुळात सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, हिंदूंच्या मूलभूत, न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण करणे होय. म्हणजे सावरकरांचा एकंदरीत चरित्रपट पाहता, त्यांना अन्यायाची प्रचंड चीड होती हे जाणवते व त्यासाठी त्या अन्यायी व्यक्ती किंवा समूहाच्या बाजूने ते कणखरपणे उभे राहिले. सावरकरांचा लढा हा न्यायासाठी होता.
सावरकरांचा अजून एक गुण सर्वांनी विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी आचरणात आणणे गरजेचे आहे, तो गुण म्हणजे अभ्यासू, बुद्धिवादी व वैचारिक लेखन. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘हिंदुत्व’, ‘सहा सोनेरी पाने’, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘क्ष किरणे’, ‘जात्युच्छेदक निबंध’ हे ग्रंथ त्यांच्या अभ्यासूवृत्तीची, बुद्धिवादी व वैचारिक लेखनाची साक्ष देतात. कम्युनिस्ट, डावे यांच्याकडे असणारी (फार अभ्यासू नसली तरी) बुद्धिवादी व वैचारिक लेखन परंपरेची हिंदुत्ववाद्यांमध्ये (काही अपवाद वगळता) दुर्दैवाने वानवा आहे. हिंदुत्ववाद्यांमध्ये भक्तिमय व श्रद्धाळू लिखाण जास्त आढळून येते. धार्मिक व पौराणिक विषयात भक्तिमय व श्रद्धाळू लिखाण कदाचित उचित ठरेल. पण, राजकारण, समाजकारण, इतिहास, चरित्र या विषयात मात्र अभ्यासू, बुद्धिवादी व वैचारिक लिखाणच व्हायला हवे. वामदेवशास्त्रींनी (पूर्वाश्रमीचे डेव्हिड फ्रॉवले) याला ‘वैचारिक क्षत्रिय’ असे नाव दिले आहे. हिंदुत्ववाद्यांमध्ये ज्ञानी व अभ्यासूंची कमतरता नाहीये, कमतरता आहे ती ते ज्ञान थोडक्यात, पण योग्य शब्दांत मांडण्याची. लेखाची मांडणी ही एक कला आहे व ती सततच्या वाचन-मनन-चिंतनाने तयार करता येऊ शकते. पण, त्यासाठी गरज आहे ती केवळ वृत्ती, इच्छा व चिकाटाची.
सावरकरविचार समतोल आहेत. प्रखर बुद्धिवादी व विज्ञाननिष्ठ सावरकर कोमल मनाचे महाकवीही होते. सावरकर अज्ञेयवादी असले, तरी श्रद्धाळू होते. कारण, देशभक्ती ही एक श्रद्धाच आहे. ‘प्रतिकूल तेच घडेल’ या सूत्रान्वये आचरण करणारे सावरकर आशावादी होते. हिंदूंच्या पराभवाचे विवेचन करणारे सावरकर जयीष्णू विचार मांडणारे इतिहासमीमांसकही होते. भोंगळ अहिंसेला विरोध करणार्या सावरकरांनी ‘भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार’ हा अहिंसक लढा यशस्वी करून दाखवला. स्वतः कुंडलिनी जागृतीचा अनुभव घेणारे सावरकर महान योगी होते.
सावरकरांचे साध्यानुकूल सहकार्याचे राजकीय विचार, हिंदूंवर ‘हिंदू’ म्हणून अन्याय होत असेल, तर हिंदू संघटनेचे विचार, परराष्ट्र धोरण, परकीय शत्रूशी कूटनीती, पूर्वास्पृश्यनिर्मूलन, जात्युच्छेदन, शुद्धीसारखे सप्तशृंखला तोडायला सांगणारे सामाजिक विचार, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, बुद्धिप्रामाण्यता, उपयुक्ततावाद, सैनिकीकरणाचे विचार, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी, वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वयसारखे आर्थिक विचार, राष्ट्रीय साहित्यिक दृष्टी यासारखे अनेक सावरकरविचार आजही आपल्या देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला मानवतेसाठी उपयुक्त आहेत. कुठलीही गोष्ट चांगली की वाईट, यासाठी ते राष्ट्रहित व मनुष्यहित हा मापदंड लावतात.
‘ऐक भविष्याला’ या आपल्या अंतिम कवितेत सावरकरच म्हणतात- “होऊनिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सृजनरक्षणाला, कोटी कोटी हिंदु जाति चालली रणाला” म्हणजे स्वतः मुक्त होऊन, जगताला मुक्त करण्याचे मानवतेच्या स्वातंत्र्याचे सावरकरांचे स्वप्न होते. पण, भव्य कल्पना व कविमनाचे सावरकर हे वास्तववादी होते. त्यामुळे मानवतेचे स्वप्न साध्य करण्यासाठी राष्ट्रवादाची पायरी चढून जाणे अपरिहार्य आहे, हे त्यांनी ओळखले होते. म्हणून सावरकरांचा राष्ट्रवाद हा मानवतावादाशी सुसंगत व अविरोधी आहे. सावरकरांनी जागतिक शासननिर्मिती, मानवता हा एकच धर्म, पृथ्वी हे एकच राष्ट्र हे सर्व राजकारणाचे व समाजकारणाचे अंतिम ध्येय सांगितले होते. मानवतावाद, बुद्धिप्रामाण्यता, उपयुक्ततावाद, विज्ञाननिष्ठा व व्यवहार्यता ही सावरकरांची मार्गदर्शक तत्वे आहेत. सावरकरांच्या विचारांचा हाच गाभा होता. त्यामुळे सावरकरांचे विचार आजही मानवतेसाठी अत्यावश्यक आहेत.
समाज व राष्ट्र संपन्न व सामर्थ्यशाली होण्यासाठी सावरकर विचारांचे स्मरण करून ते आचरणात आणणे आवश्यक आहे. सावरकरांचे विचार आपल्यासाठी आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ते सतत सांगत राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शतपैलू सावरकरांच्या विविध पैलूंचा शोध घेऊन, ते सामान्य व्यक्तीलाही कळतील अशा सहज, सोप्या भाषेत सांगत राहणे हे समाज जागृतीचे कार्य आहे. समाज जागृत झाला तर राष्ट्र जागृत होईल. त्यासाठी सावरकरांनी सांगितलेली ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून, अखंड सावधान राहणे गरजेचे आहे.
वंदे मातरम!
- अक्षय जोग
- अतिथी संपादक