तुमच्या आमच्या गोष्टी सांगणारी स्टोरीटेलर : मेहेक मिर्ज़ा प्रभु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018   
Total Views |




गोष्टी ऐकणं सगळ्यांनाच खूप आवडतं. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत गोष्टी या सगळ्यांच्याच मनाजवळच्या असतात. लहानपणी ज्या चिऊ काऊच्या ज्या गोष्टी खूप आवडतात मोठेपणी त्याची जागा एखादी प्रेमकथा घेते, मग पुढे या कथांचं स्वरूप बदलत जातं. मात्र हे झालं गोष्टी ऐकण्याचं. गोष्टी सांगणे? ही तर एक कलाच आहे. आणि आजच्या इंटरनेटच्या काळात मनापासून, गोष्ट समजून उमजून सांगणे जरा कठीणच झाले आहे. मात्र प्रत्येक अपवादाप्रमाणे येथे देखील एक अपवाद आहेच. हाच अपवाद म्हणजे "मेहेक मिर्ज़ा प्रभु". आपल्यापैकी अनेकांनी तिच्याबद्ल ऐकलं असेल, तिच्या बद्दल नाही तर तिच्या गोष्टी ऐकल्या असतील मात्र आज आपण जाणून घेणार आहोत की सामान्य मुलीतून एक स्टोरीटेलर कशी जन्माला आली. महाएमटीबीने संवाद साधला आहे "मेहेक मिर्ज़ा प्रभु" यांच्याशी.





तिच्या कथा इंटरनेटवर खूप प्रसिद्ध आहेत. तिच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंटला हजारो लाईक्स आहेत. तिने दिलेला "टेड टॉक" देखील अनेकांना माहीत असेलच. तिच्या आयुष्यात अनेक चढ- उतार आले. लहानपणी आई वडीलांचे निधन झाल्यानंतरची तेजल ते एका मुलीचे संगोपन करत, क्लीनिकल डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला मात देत संपूर्ण जगाला गोष्टींचे वेड लावणारी मेहेक मिर्ज़ा प्रभु असा तिचा प्रवास आहे. "परी, कैरी का अचार अशा कितीतरी कथा आहेत, ज्यांनी आजपर्यंत लाखो लोकांना अक्षरश वेड लावले आहे."

गोष्टी ऐकणं हे सगळ्यांनाच आवडतं मात्र गोष्टी सांगणं की एक कला आहे. ही कला उपजतच होती का ही कला रुजवली? मेहेक मिर्ज़ा प्रभु ही स्टोरीटेलर कशी जन्माला आली असे विचारता ती सांगते. "मेहेक जन्माला आली वयाच्या ३२व्या वर्षी. कथा आवडतात, त्या सहज भेटतात म्हणून त्या लिहील्या गेल्या. मात्र एके दिवशी आजारी असल्याने कथा न लिहीता मी ती रिकॉर्ड केली, आणि लक्षात आलं, हेच तर आपण शोधत होतो, हेच तर आपल्याला जमतं, आणि इथेच जन्म झाला मेहेक मिर्ज़ा प्रभु हिचा. मुलीला गोष्ट सांगताना तिला त्या आवडायच्या मात्र गोष्ट सांगण्याची कला केवळ लहान मुलांना गोष्ट सांगण्यापेक्षा खूप मोठी आहे, हे गोष्टी सांगताना कळलं." ती सांगते, "गोष्टींच्या शोधात आपण बाहेर पडलो तर आपल्याला गोष्टी कधीच सापडत नाहीत. त्या स्वत: येऊन आपल्याला भेटतात. अनेकदा या गोष्टी स्वप्नात देखील येऊन भेटतात. माझ्या अनेक स्वप्नांनी मला गोष्टींची भेट घालून दिली आहे." तिच्या स्वप्नांमधून मिळणाऱ्या गोष्टींनी प्रेक्षकांना देखील एक सुंदर श्रवणीय अनुभव दिला आहे.






तिचे नाव ऐकल्यावर आपल्या मनात एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. "मेहेक मिर्ज़ा प्रभु " हे काय रसायन आहे? हेच जाणून घेण्यासाठी तिला विचारले असताना ती सांगते, "माझे मूळ नाव तेजल प्रभु. मात्र वयाच्या ३२व्या वर्षी जेव्हा मी कथा लिहायला सुरुवात केली तेव्हा मला कुणी ओळखू नये यासाठी मी एक टोपण नाव घेण्याचे ठरवले. मी मुळातच "मिर्जा गालिब" यांची खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे नावात मिर्जा असावे असे वाटत होते, आणि म्हणूनच जन्म झाला "मेहेक मिर्ज़ाचा" मग प्रश्न येतो प्रभु आडनाव का तसेच ठेवले? तर मेहेकला तिच्या आयुष्याच्या प्रवासात आई वडीलांची साथ नेहमीच हवी होती म्हणून तिने प्रभु आडनाव कायम ठेवलं.


"स्टोरीटेलिंग" / गोष्ट सांगणे हे करिअरही असू शकते :

गोष्टींच्या माध्यमातून एक नवीन भावविश्व तयार करणे ही एक खूप कठीण कला आहे. सगळ्यांनाच ती जमते असे नाही, मात्र ज्याला जमतं तो व्यक्ती या कलेला 'करिअर' म्हणून देखील निवडू शकतो. मेहेकनं ही कला करिअर म्हणून का निवडली या प्रश्नाचे उत्तर देताना ती सांगते, " मी पहिल्यांदा जेव्हा लोकांना सांगितले मी करिअर म्हणून गोष्टी सांगते, तर लोकांचा पहिला प्रश्न होता, यातून तू कमावू शकतेस का? त्यावर मी उत्तर दिले त्याहून महत्वाचे आहे की माझे हे करिअर मला व्यस्त ठेवते का? जर मी माझा संपूर्ण वेळ या कलेसाठी दिला आहे, तर ते वाया नक्कीच जाणार नाही. ज्यावेळी आपण आपली संपूर्ण मेहनत आणि वेळ पणाला लावतो, त्यावेळी ती मेहनत आपल्याला खूप काही देते. जसा वेळ आणि मेहनत आपण ९-५ च्या नोकरीला देतो, तसेच येथे देखील देणे आवश्यक आहे. आज एकाने जरी म्हटले की मला गोष्टी सांगणे हे करिअर म्हणून निवडयाचे आहे, आणि ते करण्याची, त्यासाठी मेहनत करण्याची माझी पूर्ण तयारी आहे, तर याहून मोठी भेट मला मिळणार नाही."

सामाजिक विषय वेगळ्या पद्धतीने सांगण्याची अनोखी कला :

गोष्ट सांगणे म्हणजे केवळ मनोरंजन करणे किंवा विरंगुळा नाही. हे एक खूप मोठे आणि सशक्त माध्यम आहे. या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत एक मोठा संदेश देता येऊ शकतो. मेहेकच्या अनेक गोष्टी खूप गाजल्या आहेत. "आई आणि मुलीचा प्रेमळ संवाद असलेली आणि कथेच्या शेवटी थक्क करणारी "शान" असू देत, नाही तर कवितेच्या लहज्यातील "कैरी का अचार" असू देत. किंवा "परी" तिने या कथांच्या माध्यमातून समाजासाठी एक खूप मोठा संदेश दिला आहे. मग तो संदेश दिव्यांगांने स्वच्छंद जगणे असू देत, देहव्यापार असू देत नाही तर आजही मुलींना मिळणारी वागणूक. तिच्या या कलेच्या माध्यमातून तिने समाजासाठी खूप महत्वाचे आणि मोठे संदेश दिले आहेत. ती सांगते, " माझ्या कथांमधून मी कुणालाही तत्वज्ञान शिकवू इच्छित नाही. कथा सांगताना मी फक्त लोकांसमोर एक परिस्थिती ठेवते, एक आरसा ठेवते, त्यात स्वत:च प्रतिबिंब बघायचं की नाही, किंवा त्यामधून काही संदेश घ्यायचा का नाही हे प्रेक्षकांनी स्वत: ठरवायचं असतं. त्यासाठी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नसतो. मला जे वाटतं ते फक्त मी मांडण्याचा प्रयत्न करते."






कथा सांगण्याची एक आगळी वेगळी शैली :

मेहेकची कथा सांगण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ती स्वत:च तिच्या कथेतील पात्र बनते. ती ते पात्र जगते आणि आपल्याला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते. अनेक कथांमध्ये ती कवितेच्या शैलीत कथा सांगते. तिच्या आवाजातील चढ उतार, तिची बोलण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ही शैली कशी रुजवली हे विचारले असता मेहेक सांगते, "कथा जशी असेल त्यानुसार ती सांगण्याची पद्धत बदलते. एखाद्या एखाद्या कथेला पारंपारिक पद्धतीने सांगावं लागतं तर एखाद्या एखाद्या कथेतच कविता असते. एकदा एका कार्यक्रमात मला कवितेचं सादरीकरण करण्यास सांगण्यात आलं, मला खरं तर कथाच सांगायची होती, मात्र कार्यक्रमाची आवश्यकता कवितेची होती, अशा वेळी या वेगळ्या शैलीत सादरीकरण केलं. लोकांना हे आवडतंय हे बघून आनंद होतो. "




मेहेकच्या कथा हिंदी, मराठी आणि उर्दु भाषेत आहेत. तिच्या हिंदी कथांना खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तिच्या यूट्यूब चॅनलवर तिच्या काही मराठी कथा देखील आहे. तिच्या कथांमधील पात्र आपल्या आयुष्यात असल्यासारखी वाटतात. आपण याला 'रिलेट' करु शकतो असे म्हणता येईल.

हिंदी भाषेवर प्रभुत्वाचे श्रेय ती तिच्या मामीला देते. ती सांगते आई वडीलांच्या जाण्यानंतर मामा- मामींनीच माझा सांभाळ केला. त्याकाळात मामी पंजाबी असल्याकारणाने तिच्या हिंदीचे संस्कार माझ्यावर झाले आणि त्यामुळेच मी आज अत्यंत आत्मविश्वासाने हिंदी कथांचे सादरीकरण करु शकते.

सोशल मीडियामुळे नवे आयुष्य मिळतेच मात्र 'लाईव्ह' प्रेक्षकांच्या प्रतिसादाची मजाच वेगळी :


आज समाज माध्यमांमुळे मेहेक जगभरात प्रसिद्ध झाली आहे. केवळ भारतच नाही तर भारताबाहेरून देखील लोकांनी तिच्या कथांना प्रतिसाद दिला आहे. समाज माध्यम एक सशक्य माध्यम आहे. यामुळे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो, यामध्यमाकडे बघण्याचा मेहेकचा काय दृष्टीकोन आहे हे जाणून घेण्यासाठी तिला प्रश्न विचारला असता ती सांगते, " समाज माध्यमांवरुन लोकांचा मिळणारा प्रतिसाद लाख मोलाचा आहे. कमेंट्स, शेअर्स, आणि लाईक्स, व्ह्यूज बघून अनेकदा भारावून गेल्या सारखं होतं. माझ्यासाठी हे महत्वाचं आहेच. मात्र त्यासोबतच माझ्या कार्यक्रमांना, स्टॅंडअप ओपन माईकला येणारे प्रेक्षक देखील माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यांच्यातील एकाला जरी माझ्या गोष्टींच्या माध्यमातून काही मदत झाली, तर माझे कार्य सफल झाले. त्यामुळे समाज माध्यमांवर मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावून न जाता, प्रत्यक्ष मिळालेल्या "रिअॅलिटी चेक"चा विचार करणं अधिक महत्वाचं आहे, असं ती सांगते.







मेहेकच्या गोष्टी या काल्पनिक असतात, कदाचित तिला एखाद्या घटनेतून प्रेरणा मिळत असेल मात्र ती त्यांच्यातून पात्र उभे करते आणि त्यांचे एक वेगळे विश्व देखील. अनेकदा ओपन माईकच्या कार्यक्रमांमध्ये किंवा कथा सांगण्याच्या कार्यक्रमांमध्ये ती बघते की केवळ स्वत:च्या आयुष्याशी संबंधित कथाच सांगण्यात याव्या, असा नियम असतो. याबद्दल तिला वाईट वाटते ती म्हणते, अनेकदा स्वत:च्या आयुष्याशी निगडित नसून सुद्धा अनेक गोष्टी आपले आयुष्य बदलतात. त्यामुळे असा नियम असू नये.


२००१ मध्ये मेहेकच्या आईवडीलांचे आणि संपूर्ण परिवाराचे एका अपघातात निधन झाले. त्यानंतर काही काळानंतर वैयक्तिक आयुष्यात कठीण परिस्थिती आली, ती नैराश्यात गेली. मात्र या सगळ्यातून वाट काढत आज ती "मेहेक मिर्जा प्रभु : द स्टोरीटेलर" बनली आहे. हे बळ कुठून आलं आणि आपण कुणासाठी तरी प्रेरणा आहोत याची जाणीव कशी वाटते हे विचारले असता ती सांगते, " आज पर्यंत माझ्या आयुष्यात जे काही झालं ते देवाच्या इच्छेने झालं. त्यामागे माझे काहीच नाही. जे झालं त्यातही देवाची इच्छा होती आणि त्यातून सावरायला मला बळ देण्यातही. मात्र आता यापुढे मी जे काही करेन ते कुणासाठी प्रेरणा असेल तर मात्र माझे आयुष्य सफल होईल."

झुमरीतलैय्या :


मेहेक झुमरीतलैय्या या नावाने "स्टोरीटेलिंग" म्हणजेच गोष्टी सांगण्याचे, गोष्टी लिहीण्याच्या कार्यशाळा घेते. यामधून एक जरी स्टोरीटेलर निर्माण झाला तर ती आयुष्यात खूप काही मिळवेल असे ती म्हणते.







खरंय, आपण आयुष्यात जे काही करतो त्यामागे देवाची इच्छा जरी असली तरी स्वबळावर केलेल्या कार्यातून खरी प्रेरणा मिळते. कलेला वय नसतं, कलेला वेळ काळ नसते, आणि स्वत:ला घडवण्यासाठी आवश्यक असते ती मेहनत आणि आत्मविश्वास. मेहेकनं हे सिद्ध केलं आहे. स्टोरीटेलिंग हे करिअर असू शकतं हे पटवून देणारी, जिद्दीने आयुष्य हसत पुढे नेणारी, रोज नवीन भावविश्व तयार करणारी मेहेक आज अनेकांसाठी प्रेरणा आहे, यात वादच नाही.


- निहारिका पोळ


@@AUTHORINFO_V1@@