कोबान ‘इसिस’च्या ताब्यात गेल्यास तुर्की सीमा ‘इसिस’ मूलतत्त्ववाद्यांमुळे असुरक्षित झाली असती. तुर्कीने वेळप्रसंगी साहाय्य न करता तटस्थ राहिल्यामुळेच कोबान ‘इसिस’ च्या ताब्यात गेले असते तर कोबान पडण्याचा तुर्कस्तानवर ठपका ठेवला गेला असता व तुर्की कुर्दांमध्येही असंतोष पसरला असता.
कोबानच्या युद्धात सर्वात जवळ व साहाय्य-पुरवठा करण्यास उपयुक्त देश म्हणजे तुर्कस्तान. पण तरीही तुर्कस्तानची तटस्थता हा चिंतेचा विषय ठरली. कोबानला तीन दिशांनी ‘इसिस’ने वेढले होते व उत्तर बाजू तुर्कस्तानद्वारे बंद केली गेली होती. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने सीरिया-तुर्कस्तान सीमेवर ‘इसिस’विरोधात आघाडी उघडून हवाई हल्ले करण्यासाठी इनसिर्लिक हवाई तळ वापरण्यास तुर्कस्तानला विनंती केली होती, पण तुर्कस्तानने नकार दिला. उलट ऑगस्ट २०१४ पासून तुर्कस्तानने इराक व सीरियामधील कुर्दिश लढाऊ सैनिकांवर ३०० वेळा बॉम्ब हल्ले केले व ‘इसिस’वर केवळ तीन वेळा. तुर्कस्तानने आधी तुर्की कुर्दांना कोबानमधील कुर्दांना साहाय्य करण्यासाठी जाण्यास व जे सीरियन कुर्द तुर्कस्तानात पळून आले होते त्यांनाही पुन्हा सीरियामध्ये जाऊन आपल्या बांधवांना साहाय्य करायला जाण्यावरही बंदी घातली होती. तसेच तेथून कुठल्याही प्रकारचा पुरवठा करण्यावरही बंदी घातली होती. परिणामतः मुरसितपिनार येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. पण, तुर्की पोलिसांनी हिंसकरित्या आंदोलन दडपून ‘वायपीजी’ समर्थकांना जबरदस्तीने पांगवले. ३८ वर्षीय हेटीस म्हणाला, ”आमच्या विरुद्ध ते इतकी शक्ती का वापरत आहेत ? आम्ही काही वाईट करत नाही, आम्ही केवळ कोबानमधील ‘वायपीजी’ योद्धांना पाठिंबा दर्शविण्यासाठी उभे आहोत.”
तुर्कस्तानच्या दृष्टीने ‘इसिस’ व सीरियन कुर्द दोघेही शत्रूच होते, तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन यांनी इस्तंबूलला पत्रकारांना तसे स्पष्टच सांगितले की, ”त्यांना (इसिस व सीरियन कुर्द) वेगवेगळ्या दृष्टीने पाहणे चूक आहे, आपल्याला त्यांचाशी एकत्रितपणेच सामना करायला हवा.” इतकच काय, ‘इसिस’विरोधी आघाडी तयार करण्यात समाविष्ट असणार्या एका युरोपीय परराष्ट्र अधिकार्याच्या अनुसार, ”एर्दोगन सीरियन कुर्दांचा तिरस्कार करतात. त्यांच्या मते ते ‘इसिस’हूनही अधिक वाईट आहेत.”
तुर्कस्तानच्या या अलिप्ततेमुळे कुर्दांचा संताप झाला. यामुळे इस्तंबूल, अंकारा व पश्चिम युरोपासह आग्नेय भागातील डझनभर शहरात संघर्ष परिस्थिती उद्भवून यात १९ जण मृत्युमुखी पडले. कोबान पडून ‘इसिस’च्या ताब्यात गेले असते, तर तुर्कस्तानला ‘इसिस’कडून धोका निर्माण झाला असता व कुर्दांचाही रोष ओढवून घेतला असता. ६ जानेवारी २०१५ ला ‘इसिस’च्या दहशतवादी महिलेने इस्तंबूलच्या सुल्तानमेत जिल्ह्यात आत्मघाती हल्ला करून तुर्कीश पोलीस अधिकार्याचे प्राण घेतले होते. म्हणजे तुर्कस्तानसुद्धा ‘इसिस’च्या जिहादी हल्ल्यापासून सुरक्षित नव्हते. तसेच, कोबान ‘इसिस’च्या ताब्यात गेल्यास तुर्की सीमा ‘इसिस’ मूलतत्त्ववाद्यांमुळे असुरक्षित झाली असती. तुर्कीने वेळप्रसंगी साहाय्य न करता तटस्थ राहिल्यामुळेच कोबान ‘इसिस’च्या ताब्यात गेले असते तर कोबान पडण्याचा तुर्कस्तानवर ठपका ठेवला गेला असता व तुर्की कुर्दांमध्येही असंतोष पसरला असता. तुर्कस्तान लोकसंख्येच्या दीड ते दोन कोटी म्हणजे २० टक्के कुर्द आहेत. त्यामुळे २० टक्के लोकसंख्येच्या मनात देशातील सत्ताधार्यांविषयी असंतोष पसरणे तुर्कस्तानला परवडण्यासारखे नव्हते. न जाणो कदाचित कुर्दिस्तानच्या चळवळीला अजून जोर चढला असता.
या सर्व कारणांमुळे व आंतरराष्ट्रीय विशेषत: अमेरिकेच्या दबावामुळे तुर्कीने थोडी सामंजस्याची भूमिका घेऊन तुर्की कुर्दांना, एफएसए व पेशमर्गा सेनेला तुर्की सीमा ओलांडून कोबानमध्ये कुर्दांचे साहाय्य करण्यास अनुमती दिली. तुर्कस्तान संसदेतील ’HDP' या कुर्दिश अनुकूल पक्षाने कोबानमध्ये अन्न व इतर पुरवठ्यासाठी पैसा उभा करण्यासाठी त्वरित एकता कार्यक्रम आयोजित करून ते कोबानमध्ये पाठविण्यासाठीचे मार्ग शोधून जुलैच्या दुसर्या आठवड्यात साखर, दूध, तांदूळ, खजूर, ऑलिव्ह ऑईल, बल्गर गहू, पास्ता व इतर पदार्थांचे ७ ट्रक पाठवले. उर्वरित महिन्यात ३ टन खाद्यपदार्थ व वैद्यकीय साहाय्य कोबानमध्ये पाठवले आणि सर्व कुर्दिस्थानमधून स्वयंसेवकांसह २ नवीन तुकड्या स्थापन करून कोबानमध्ये धाडल्या. तसेच कोबानमधील जवळजवळ २ लक्ष कुर्दांना तुर्कस्तानात आश्रय दिला. ‘वायपीजी’ सैनिकांवर तुर्कीच्या राज्य रुग्णालयात उपचार केले.
१२ ऑक्टोबर २०१४ ला पत्रकार तराफला तुर्कस्तानातील AKP (Adalet ve Kalkınma Partisi इंग्रजीत Justice and Development Party) पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेले ’डेंगीर मिर मेहमेत फिरत’ ने सांगितले की, ”रोजावामधील घडामोडींना दुर्बल करण्यासाठी (तुर्की) सरकार धार्मिक जहाल गटांना सवलती व शस्त्रास्त्र देते.” कोलंबिया विद्यापीठाच्या Institute For The Study Of Human Rights साठी डेव्हिड फिलिप्स यांनी इसिस-तुर्की संबंधांवर एक शोधनिबंधच लिहिला आहे. त्यात वर नमूद केल्याप्रमाणे ‘इसिस’ला तुर्कीकडून मिळणार्या साहाय्याचे बरेच पुरावे दिले आहेत. त्यासोबत तुर्कीने वाहतूक व दळणवळणासाठी ‘इसिस’ला साहाय्य केले, ‘इसिस’ दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले आहे, ‘इसिस’च्या जायबंदी दहशतवाद्यांवर वैद्यकीय उपचार केले आहेत, तेल खरेदीच्या माध्यमातून ‘इसिस’ला आर्थिक साहाय्य केले आहे, ‘इसिस’मध्ये भरती होण्यासाठी साहाय्य केले आहे, इतकंच काय तुर्की ‘इसिस’सोबत लढतही आहे, अशाप्रकारचे आरोप पुराव्यासह केले आहेत.
कुर्दांचे कुर्दित्व जपले जाऊ नये, याची पुरेपूर काळजी तुर्कस्तानने घेतली आहे. इतिहासाच्या पुस्तकातून कुर्दिश वंशाविषयी उल्लेख सापडत नाही. सार्वजनिकरित्या कुर्दिश भाषा बोलण्यावर बंदी आहे व याचे उल्लंघन करणार्यांना दीर्घ कारावासाच्या शिक्षेची उपाययोजना आहे. २०१३ ला सरकार निर्बंध (कायदा) रद्द करेपर्यंत कुर्दिश वर्णमालेत येणारी पण तुर्कीत न येणारी ‘ट,’ ‘थ’ व ‘द’ ही अक्षरे वापरण्यावर बंदी होती.
तुर्कीचे इराकी कुर्दिस्तानशी बर्यापैकी चांगले संबंध आहेत मग तुर्कीचा सीरिया कुर्दांवर इतका राग का आहे? तुर्कस्तानात सर्वाधिक कुर्द राहतात म्हणून? की ओकलानच्या पूर्वीच्या हिंसक दहशतवादी कारवायांमुळे? तसेच कुर्दिस्तानच्या लढ्यातही तुर्कस्तानला इतकं महत्त्व का आहे? याची पाळंमुळं तुर्कस्तान व कुर्दिस्तानच्या इतिहासात दडलेली आहेत का? पाहूया पुढील लेखात.