आपल्या देशात निवडणूक म्हटले की अनेक लोकांमधील विविध प्रतिभा जगासमोर येतात. कुणी ही प्रतिभा साजेसे मीम्स बनवण्यात वापरतं, तर कुणी सद्य परिस्थितीशी साधर्म्य असलेल्या जुन्या घटनांना उजाळा देण्यासाठी भूतकाळात पोहोचतं. कर्नाटकातील निकाल समोर आल्यापासूनच इंटरनेटवर सगळीकडे विविध पोस्ट्सचा पाऊस पडला आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त अशा बघण्यात आलेल्या पोस्ट्स म्हणजे भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जुनी भाषणे.
ज्या लोकांनी लो काळ बघितला होता, ज्यांनी ती परिस्थिती जवळून अनुभवली होती, त्यांच्यासाठी या पोस्ट्सचे खूप महत्व आहे. तत्कालीन परिस्थितीची उजळणी करून देणारी ही भाषणं त्या पिढीच्या आता देखील लक्षात आहेत.
अटल बिहारी वाजपेयी यांनी 'त्यागपत्र' दिले त्यावेळचे ऐतिहासिक भाषण :
१९९७ च्या लोकसभा निवडणुकी अतिशय रंजक अशा होत्या. त्यावेळी केवळ १ मतानं बहुमत सिद्ध झालं नाही आणि वाजपेयी सरकार पडले. भारताच्या राजकारणासाठी, भारतीय जनता पक्षासाठी आणि एकूणच समाजासाठी ही एक अतिशय महत्वाची अशी घटना होती. या घटनेनंतर संसदेत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या प्रसिद्ध शैलीत भाषण देत आपला राजीनामा म्हणजेच "त्यागपत्र" राष्ट्रपतींना सुपूर्द केलं होतं. त्यावेळेला वाजपेयींच्या या धाडसाचं सर्व पक्षातील नेत्यांना विशेष कौतुकही वाटलं होतं आणि त्यामुळे वाजपेयींबद्दलचा आदर द्विगुणीत झाला होता. त्यानंतर आजपर्यंत गेली कित्येक दशकं हे भाषण गाजतंय. त्या पिढीतील अनेक लोक आजही हे भाषण विसरू शकत नाही. सद्य परिस्थितीत कर्नाटक येथे सुरु असलेल्या राजकीय वादळात बहुमत सिद्ध करण्यावरून भरपूर चर्चा रंगली आहे, या चर्चेच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयी यांचे हे ऐतिहासिक भाषण पुन्हा एकदा फेसबुकवर व्हायरल होत आहे.
प्रमोद महाजन यांच्या खुमासदार शैलीतील भारताची "लोकशाही" समजावून सांगणारे हे भाषण :
प्रमोद महाजन हे एक उत्तम वक्ता होते हे काही वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता नाही. २००४च्या निवडणूकीत भाजपच्या प्रचाराची आणि निवडणुकीच्या रणनीतीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषणे देत नेहमीच भारतीय जनतेची मने जिंकून घेतली आहे. संसदेतील त्यांचे हे भाषण खूप प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये त्यांनी एक घटना सांगत चीनमध्ये गेले असताना भारताची लोकशाही कशी चालते? हा प्रश्न विचारला असता अतिशय रंजक असे उत्तर दिले. ते उत्तर म्हणजे हे भाषण. कर्नाटकची सद्य परिस्थिती बघता त्यांचे हे भाषण किती चपखल बसते आणि इतक्या वर्षात भारताच्या राजकारणात फारसा बदल झाला नाही हे पुन्हा एकदा जाणवते. आवर्जून ऐकावे असे हे भाषण.
प्रमोद महाजन यांचे अविश्वास ठरावावरील भाषण :
१९९७ साली काँग्रेसविरोधात अविश्वास ठराव मांडतानाचे हे भाषण खूप गाजले होते. आजही हे भाषण पुन्हा एकदा फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. एकूणच देशाची सद्य राजकीय परिस्थिती बघता, आणि जुनी भाषणे बघता, भारताच्या राजकारणाविषयी खूप कुतुहल निर्माण होतं. नवीन पिढीतील नागरिकांना देखील ही भाषणे खूप आवडतायेत याची प्रचिती फेसबुक आणि ट्विटर्सच्या शेअर्स वरून येते.
गेल्या अनेक दशकांमध्ये भारताच्या राजकारणाची परिस्थिती निश्चित बदलली आहे. सराकार अनेकदा बदलले, गेल्या ४-५ वर्षांत देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली, मोठे बदल झाले, मात्र काही गोष्टी ज्या बदलल्या नाहीत त्याची एक झलक या भाषणांमधून मिळते. तसेच आज जर हे दिग्गज नेते हयात असते, किंवा राजकारणात सक्रीय असते तर त्यांची काय प्रतिक्रिया असती असे वाटल्या खेरीज राहत नाही. इतिहास पुनर्घटित होतो असे म्हणतात, मात्र ही भाषणे ऐकून पुढे काय होते, आताची परिस्थिती देखील अशीच असणार का? असे कुतूहल नक्कीच निर्माण होते.
गेल्या २-३ वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर विविध राजकीय पक्ष अधिक सक्रीयपणे करतायेत. गेल्या १ वर्षात आता विरोधकांकडून याचा वापर अधिकच मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. राहुल गाँधी, नवज्योतसिंह सिद्धू, नरेंद्र मोदी तसेच यांच्यासह अनेक दिग्गज नेते ज्यांनी एकेकाळी भारतीय राजकारण गाजवलंय, त्यासगळ्यांची जुनी भाषणे अचानक कशी काय समोर यायला लागली असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच उपस्थित झाला असणार. त्याचं कारण सोशल मीडियाची ताकत आणि २०१९च्या निवडणुका. "तुमच्याच नेत्यांनी आधी काय भाषण केले आणि आता तुम्ही काय करत आहात हे जाणून घ्या" असा संदेश लोकांना देण्यासाठी सगळेच पक्ष या जुन्या भाषणांचा वापर करतायेत. विरोधी पक्षांकडून तर आता हे मोठ्या प्रमाणात होतंय त्यामुळे आता पुढे आणखी कुणाची भाषणे येणार, सोशल मीडियावर व्हायरल होणार याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
- निहारिका पोळ