चिह्न निमित्त – निमित्त चिह्न भाग - ६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018   
Total Views |
 


भारतीय चिह्नसंस्कृतीचा आलेख फार प्राचीन आणि अर्थातच फार व्यापक आहे. पारंपारिक भारतीय चित्रकला, शिल्पकला आणि मूर्तिकलेत, देवी-देवतांच्या संयुक्त प्रतिमेत; पक्षी, प्राणी, कीटक असे सजीव, पाने, फुले, झाडे, आयुधे, शस्त्रे, वाद्ये, पुस्तक, जपमाळ अशा निर्जीव वस्तू आणि सूर्य, चंद्र, तारे अशी खगोलीय चिह्न अंकित केलेली दिसतात. ही सर्व चिह्ने वास्तव आहेत. या सर्व सजीव, निर्जीव, आकाशस्थ ग्रह-ताऱ्यांचे चिह्नसंकेत फार सखोल, वैश्विक, चिरंतन आहेत. 
 
यातील सजीव पक्षी, प्राणी, कीटक यांचा सखोल अभ्यास आपल्या पूर्वजांनी केला. अशा प्रत्येक सजीवाचे निसर्ग साखळीतील विशिष्ट काम, स्वभावधर्म, रूप, आवाज, गुणवत्ता, निसर्गातील जीवनशैली, प्रजासंगोपन आणि निसर्गदत्त कौशल्य याच्या एकत्रित अभ्यासातून निर्माण होणारे प्रत्येक सजीवाचे संकेतमूल्य, रूपकमूल्य (allegorical value) निश्चित केले. निर्जीव वस्तूंचा, अवजार-आयुधे-शस्त्रांचा दैनंदिन जीवनातील उपयोग, त्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक कौशल्य, निर्मिती मूल्य याचा सखोल अभ्यास केला. खगोलीय अभ्यासातून अशा ग्रह-ताऱ्यांचा विज्ञाननिष्ठेने निरीक्षण अभ्यास नोंदवला.

मानवी जीवनशैली, मनोधारणा, स्वभावधर्म, कुटुंब आणि समाज व्यवस्था यांची मूल्यनिश्चिती केली. अशा बहुउद्देशी, बहुआयामी अभ्यासाचा वापर त्यांनी दृष्टांत, उपमा, रूपक, तुलना, भेद, साधर्म्य, अन्योक्ती अशा माध्यमातून प्रगती, आनंद, श्रद्धा-भक्ती आणि मानवी मूल्यवृद्धीसाठी केला. संशोधन, व्यासंग आणि अभ्यासाने प्राचीन ग्रंथात नोंदवलेली देवी-देवतांची श्राव्य आणि अक्षर व्यष्टि (फक्त त्यांची) वैशिष्ट्ये, त्यांचा महिमा, चित्र,शिल्प, मूर्ती अशा वास्तव माध्यमातून सूचित करताना सूक्ष्मार्थाचा वापर आपल्या विद्वान पूर्वजांनी निश्चितपणे केला, त्याची ही अगदी संक्षिप्त नोंद. अशा वास्तव माध्यमांच्या निर्मितीमुळेच, हे ज्ञान, हि विद्या, हे कौशल्य एका पिढीतून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत राहिले.

संवेदनशील तरीही संशयी आणि चंचल असा मोराचा स्वभावधर्म आहेच. याबरोबरच मोराचे सौंदर्य आणि त्याची बुद्धिमत्ता हे दोन्ही, सजीवांच्या, विशेष करून अशाच सुंदर आणि बुद्धिवान स्त्रियांच्या आणि यशस्वी राज्यकर्त्यांच्या गर्वाचे प्रतीक मानले गेले. देवी सरस्वतीच्या प्रतीमेतील मोराचे सानिध्य खूप सुसंगत चिह्नसंकेत आहे. देवीच्या सानिध्यातील ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानवृद्धीमुळे अशा सजीवांची चंचलता प्रमाणात मर्यादेत रहावी, संशयी स्वभावाचे - उत्कंठा आणि जिज्ञासेत परिवर्तन व्हावे. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सत्ता यामुळे निर्माण होणाऱ्या अशा सजीवांच्या गर्वभावनेवर सार्वभौम-सर्वशक्तिमान अशा देवी सरस्वतीचे नियंत्रण रहावे असा हा सूक्ष्म चिह्नसंकेत आहे.





पाण्यात मान घालून अन्न शोधण्याची हंसाची नैसर्गिक प्रवृत्ती, असे अन्न पाण्यापासून वेगळे करून खाण्याची त्याची क्षमता आणि गुणवत्ता, देवीच्या प्रतिमेत खूप संयुक्तिक आणि सार्थ आहे. शिकत असलेल्या ज्ञानशाखेतील योग्य ते निवडून ज्ञानसमृद्ध कसे व्हावे, योग्य तेच निवडण्याची विवेकवृत्ती कशी प्राप्त करावी याचा प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेला हा सल्ला आहे. ज्ञानसाधना करताना त्या प्रयत्नात हंसासारखे एकनिष्ठ राहावे असा हंसाचा या संयुक्त प्रतिमेतील विलक्षण चिह्नसंकेत.

मोर आणि हंस या दोन्ही पक्षांची गुणवत्ता आणि स्वभाव वैशिष्ठ्ये, स्वतंत्र अभ्यासात एक दृष्टांत देतात आणि देवी सरस्वतीच्या संयुक्त प्रतिमेतील त्यांचा चिह्नसंकेत संदर्भ खूपच वेगळा असतो. अशी ही संपूर्ण विज्ञाननिष्ठ भारतीय चिह्नसंस्कृती, त्याचे समृद्ध चिह्नसंकेत आणि सूक्ष्म-गूढ तरीही संपूर्ण चिह्नार्थ...!!

पांढरा रंग हे सामन्यत: ज्ञान, विचार-आचार यांचे पावित्र्य, उच्च नीतिमत्ता, शुचिता, निर्मळता, शुद्धता, निष्कपट निरागसता या सर्व मानवी भावना-धारणा-गुणवत्तांचे प्रतीक मानले जाते. पांढऱ्या रंगाच्या संदर्भातली हि संकल्पना वैश्विक आहे. भारतासह जगभरातील अन्य सर्व संस्कृतींमधे स्वीकृत आहे. हंस पक्षाचा पांढरा रंग, देवीचे श्वेतपद्मासन अर्थात पांढरे कमळ आसन आणि देवीचे शुभ्र वस्त्र अर्थात तिची पंढरी साडी या तिन्हीमधे साधर्म्य आहे. अज्ञानरूपी चिखलातून उगवलेले आणि पाण्यावर सहज तरंगणारे शुभ्र कमळ फुल, त्यावर विराजमान देवी सरस्वती, हे तिचे स्थान, निसंशय या भौतिक जगात सर्वश्रेष्ठ आहे. विद्याभ्यास करून ज्ञानसाधना आणि ज्ञानप्राप्तीने, चिखलरुपी अज्ञानातून मार्ग काढून प्रकाशाकडे-प्रगतीकडे जाण्यासाठी देवी आपल्याला सतत प्रोत्साहन देत असते.

देवी सरस्वतीच्या मानवरूपी प्रत्यक्ष प्रतिमेचा अभ्यास आणि त्यातून उलगडत जाणारे संकेत खूप सखोल आणि समृद्ध आहेत. आपल्या रोजच्या पहाण्यात असलेली आणि आठवणीत असणारी शाळेतील देवीची प्रतिमा नेहमीच चतुर्भुज आहे...चार हात असलेली आहे. देवीची दोन हातांची पारंपारिक प्रतिमा सुद्धा प्रचलित आहे. वेदांची माता-गायत्री...हे सुद्धा देवी सरस्वतीचे एक रूप आहे. या रूपांत तिची प्रतिमा दशभुजा म्हणजे दहा हातांची आहे. तिच्या या प्रत्येक हातात एक आयुध अथवा शस्त्र आहे.





देवी सरस्वतीची द्विभुज मूर्ती - बाली, इंडोनेशिया.


देवीचे चार हात, भौतिक जगातील तिच्या सर्वव्यापक उपस्थितीचे आणि “ज्ञान” या आभासी - काल्पनिक तरीही वास्तविक अशा वैश्विक संकल्पनेतील तिच्या सर्वशक्तिमान – सार्वभौमित्वाचे संकेत प्रतीक आहेत. वीणा धारण केलेले देवीचे पुढचे दोन हात तिच्या भौतिक – वास्तव जगातील अस्तित्वाचे संकेत देतात. देवीचे मागचे किंवा वरचे दोन हात...तर्कसंगत-आत्मिक-अध्यात्मिक-पारलौकिक अशा देवीच्या वैश्विक अस्तित्वाचा - ज्ञानाचा संकेत संदर्भ आहेत. देवीचे हे चार हात, प्रत्येक सजीवाच्या मूलतत्व किंवा मूळ घटकांची प्रतीके आहेत आणि यांचा सूक्ष्मार्थ खूप प्रगल्भ आहे. वीणा धारण करणारा पुढचा उजवा हात हे सजीवांच्या मनाचे (मानस) प्रतिक आहे आणि हा हात प्रत्येक सजीवाच्या मन आणि बुद्धीच्या क्रियाशील सातत्याचे संकेत देतो. वीणा धारण करणारा तिचा पुढचा डावा हात सजीवांच्या बुद्धिमत्तेचे प्रतिक आहे आणि हा हात तिच्या सहृदयतेचे आणि सजीवसृष्टीतील प्राणीमात्रांवरील असलेल्या तिच्या प्रेमाचे संकेत देतो.

प्रत्येकाच्या वैयक्तिक – कौटुंबिक – सामाजिक व्यवहारामधे सुसंगती असावी ही आपल्या सर्वांची स्वाभाविक अपेक्षा आहे. मन आणि बुद्धीला म्हणजे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या चित्त आणि वृत्तीनां एका तालात-एका लयीत येण्यासाठी, प्राप्त झालेल्या विद्या-ज्ञान-कला यांचा उपयोग मुक्तहस्ते करण्याचा संकेत देवीच्या हातातील वीणा सतत देत असते.

ओंजळीत पुस्तक घेतलेला देवीचा वरचा डावा हात, प्रत्येक सजीवाच्या – विशेषकरून मानवाच्या संस्कारक्षम आणि संस्कारित चेतना अथवा चित्त संवेदनेचे प्रतिक आहे. प्राप्त झालेले ज्ञान, प्रेम-कारुण्य आणि वत्सलभावनेने सर्व सजीवांच्या भौतिक आणि आत्मिक प्रगतीसाठी वापरावे असा संकेत, देवीच्या वरच्या डाव्या हातातील ओंजळीत धरलेले पुस्तक सूचीत करत असते.

अंगठा आणि चाफेकळी या दोन बोटांत धरलेली जपमाळ धारण केलेला देवीचा वरचा उजवा हात हे प्रत्येक सजीवाच्या अहंकाराचे आणि अस्तित्वाचे प्रतिक मानले गेले. ज्ञानसाधनेसाठी मानवसृष्टीला आवश्यक अशी एकाग्रता, चिंतन-मनन आणि ध्यानमग्न वृत्तीचे संकेत देवीच्या जपमाळ घेतलेल्या वरच्या उजव्या हातातून प्रसारित होतात. प्रत्येक सजीवाने, श्रद्धेने आणि समर्पित भावनेने मिळवलेले सत्य, योग्य आणि वास्तव ज्ञान, त्याला स्वतःचा अहंकार विसर्जित करून अंतिम मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतो असा अचंबित करणारा सूक्ष्मसंकेत देवीच्या हातातील जपमाळ देत असते.

- अरुण फडके
@@AUTHORINFO_V1@@