इमोशनल इंटेलिजन्स एक्सपर्ट

    11-May-2018   
Total Views | 43


मोबाईल विकत घेऊ न दिल्याने नागपूरमधल्या नववीत शिकणार्‍या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या. मुलाचे आई-बाबा हातमजुरी करून पोट भरणारे. क्लासमधला अभ्यास न केल्याने शिक्षा होईल, या भीतीने जळगावातील 13 वर्षीय विद्यार्थ्याची तोंडावर रुमाल धरून आत्महत्या. ‘आई रागावली म्हणून मुलाची आत्महत्या’ असे गुगलवर सर्च केले असता पहिल्याच पानावर तब्बल नऊ वेगवेगळ्या बातम्या पाहावयास मिळतात.


‘उद्याची पिढी’ असं म्हणविणारी ही मुलं टोकाची भूमिका घेण्याइतपत एवढी भावनिक का झाली? का जीव त्यांना नकोसा झाला? या तर फक्त शाळेत शिकणार्‍या मुलांच्या बातम्या आहेत. पण, आज प्रत्येक वयोगटातील स्त्री असो वा पुरुष, काही ना काही मानसिक कारणाने त्रस्त आहे. ज्याचा पारा फुटतो तो आत्महत्या करतो, पण ज्यांचा पारा फुटत नाही ते आयुष्यभर कुढत असतात. आपल्यापैकी अनेकांनी असे लोक पाहिले असतील.

‘त्यांनी’ सुद्धा असे लोक आजूबाजूला पाहिले, पण ‘ते’ त्या लोकांना पाहून थांबले नाही तर अशा लोकांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने ‘त्यांनी’ समुपदेशनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यातून उभी राहिली ’अर्हम इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’ नावाची संस्था. ही संस्था मानसिकदृष्ट्या लोकांना कणखर बनविण्याचे धडे देते. त्यांना निर्णय घेण्यास कार्यक्षम बनविते. ही इन्स्टिट्यूट उभारणारे इमोशनल इंटेलिजन्स एक्स्पर्ट आहेत विजय सोनावणे.

विजय सोनावणेंचे आजोबा रामचंद्र सोनावणे यांचा येवल्याला बांधकामाकरिता मजूर पुरविण्याचा मोठा व्यवसाय होता. 1965 साली ते 30 हजार रुपयांची रक्कम महिन्याला पगार म्हणून मजुरांना वाटत. त्याकाळी सोन्याचा भाव 71 रुपये तोळा इतका होता. यावरून रामचंद्र सोनावणे यांच्या व्यवसायाची व्याप्ती लक्षात यावी. रामचंद्रांचा येवल्याला टोलेजंग वाडा होता. मात्र, दुर्दैव असे की, रामचंद्र यांच्याएवढी त्यांची दोन्ही मुले कर्तबगार निघाली नाही. त्यांनी वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याऐवजी नोकर्‍या पत्करल्या. त्यांना नोकर्‍यासुद्धा रामचंद्रांनीच मिळवून दिल्या. एकेकाळी सोन्या-चांदीने भरून जाणारं घर आता लंकेच्या पार्वतीसारखं झालं होतं. 1969 साली याच घरात विजयचा जन्म झाला. घरी आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने विजयचं बालपण राहत्याला, त्याच्या आजोळी गेलं. विजयचं आजोळसुद्धा तसंच तालेवार होतं. त्यामुळे पाचवीपर्यंत राहता, सहावी-सातवी जालना आणि आठवी ते दहावी नाशिक असं विजयचं शिक्षण झालं.

पुढे दहावीनंतर विजयने इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. पैसे कमावणे गरजेचे होते म्हणून तो एका मित्रासोबत कॉम्प्युटरच्या फ्लॉपी डिस्क आणि इतर ऑफिसला लागणार्‍या वस्तू विकायला लागला. अंबड आणि सातपूर एमआयडीसी विजय पायी हिंडून काढायचा. अंबडला पायी फिरत असताना गाडीतून जाणार्‍या कंपन्यांच्या मालकांना पाहून विजयच्या मनात प्रश्न यायचा, आपण कधी असे गाडीतून फिरणार? पोरसवदा दिसणार्‍या विजयला एका कंपनी मालकाने त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी विचारली. ”निव्वळ डिप्लोमाने काही होणार नाही, तू डिग्री मिळव,” असा प्रेमळ सल्ला त्यांनी दिला. त्यांचा सल्ला मानून विजयने भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये बीएस्सीला प्रवेश घेतला. खरंतर त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं. मात्र, तेवढे गुण नसल्याने बीएस्सीचा प्रवेश निश्चित झाला. कॉलेजमध्ये शिकत असताना बसस्टॉपवर त्याला एक मित्र भेटला. कामाची विचारपूस करून तो थेट त्याला नाशिकच्या ग्लोबल टेलिसिस्टिम लिमिटेडमध्ये घेऊन गेला. तेथील अधिकार्‍याने त्याला लगेच कामावर यायला सांगितलं. तेथून खर्‍या अर्थाने विजय सोनावणेंचा कॉर्पोरेट प्रवास सुरू झाला. जीटीएलनंतर अनेक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. इन्शुरन्स, फायनान्स, लॉजिस्टिक असे सर्वच विषय हाताळायची संधी त्यांना मिळाली.


कॉर्पोरेटमध्ये असताना विजय यांच्या हाताखाली शेकडो कर्मचारी काम करायचे. इतरांच्या तुलनेत हे कर्मचारी विजय यांच्यासोबत काम करण्यास जास्त उत्सुक असत. कारण विजय त्यांना सहकारी म्हणून वागणूक देत. त्यांना सतत प्रोत्साहन देत, त्यांना समजून घेत असत. परिणामी, आपल्या सहकार्‍यांकडून काम करवून घेणे त्यांना सोपे जायचे. आजोबा हे विजयसाठी नेहमीच प्रेरणास्थान होते. आजोबांसारखा व्यवसाय करावा, असं त्यांना नेहमी वाटायचं. कॉर्पोरेटमध्ये त्यांना जाणवलं की, ते एक उत्तम समुपदेशकाचं काम करू शकतात. कोचिंग आणि करिअर मार्गदर्शनसुद्धा करू शकतात. सोबतच त्यांनी हेदेखील पाहिलं की, कॉर्पोरेटमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे खूपजण आहेत, पण शैक्षणिक क्षेत्रात मात्र कोणीच नाही. ती उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी एप्रिल 2014 साली ’अर्हम इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’ नावाची संस्था सुरू केली. ’अर्हम’ हा जैन धर्मातील शब्द आहे याचा अर्थ होतो, ‘प्रत्येक गोष्ट योग्य सांगणारा तो.’ अर्हमने आतापर्यंत पाच हजार विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाचे धडे दिले आहेत. महाराष्ट्रात ‘अर्हम’च्या 16 शाखा आहेत.

स्वत:ला अद्ययावत ठेवण्यासाठी विजय सोनावणे यांनी कौन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. करिअर गाईडन्स विषयात देखील अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा केला. ‘इमोशनल इंटेलिजन्स’चा परदेशातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम केला.

विजय सोनावणे यांच्या मते विद्यार्थ्यांमध्ये मूल्यमापन करण्याची विचारसरणी, अडचणी सोडविणे, सर्जनशीलता, नवीन शोध घेणे, सुसंवाद, नेतृत्व यांची उणीव जाणवते. ती भरून काढणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ही पिढी ताण सहन करू शकणार नाही. ताण सहन न करू शकणारे मधुमेह, रक्तदाब इतकंच काय पण कर्करोग यासारख्या आजाराला सामोरे जातात. याला वेळीच पायबंद घालण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं जमलं पाहिजे. हे नियंत्रण ठेवण्याचं प्रशिक्षण ’इमोशनल इंटेलिजन्स’मध्ये दिलं जातं. सोनावणे यांना सन 2030 पर्यंत 1 लाख विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या कणखर बनवायचं आहे.

दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथील कार्यालयीन कामकाज सांभाळणारे 60 टक्के कर्मचारी ताणतणावाने ग्रस्त आहेत, असं एका अहवालात नुकतंच स्पष्ट झालं आहे. हाच तणाव हृदयविकाराचे कारण ठरतो. 1,750 रुपये महिना पगार ते 38 लाख रुपये वार्षिक मिळकत या सर्वांवर पाणी सोडत निव्वळ समाजाला मानसिकदृष्ट्या कणखर करण्याचं व्रत विजय सोनावणेंनी घेतलं आहे. आताच्या या तणावग्रस्त वातावरणात विजय सोनावणेंसारख्या ‘इमोशनल इंटेलिजन्स एक्स्पर्ट’ची आवश्यकता खर्‍या अर्थाने समाजाला आहे.


- प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

लेखक ‘युक्ती मीडिया कन्स्लटन्सी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून २०१० साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी संज्ञापन व पत्रकारिता विषयात मास्टर्स केले आहे. ते ‘डिक्की’चे सदस्य असून उद्योग, उद्योजकता यांचा गाढा अभ्यास व त्यासंबंधी लिखाणात त्यांचा हातखंडा आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121